वाशिम : फिर्याद देणारी सुन सासूची मारेकरी असल्याचे वाशिम जिल्ह्यातील खूनाच्या घटनेत उघड झाले आहे. जमीनीच्या वादाची किनार या हत्येला आहे. सुनेने सासूचा गळा आवळून केलेल्या हत्येचा तपास बारा तासात पुर्ण झाला. मालेगाव (जिल्हा वाशीम) पोलिसांचे परिश्रम या तपासात दिसून आले.
सासूची हत्या केल्यानंतर सूनेनेच पुढाकार घेत पोलिस स्टेशनला येऊन फिर्याद दाखल केली. वाशिम जिल्ह्याच्या मालेगाव पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या नगरदास परिसरात हा खूनाचा प्रकार घडला. रेखा विजय देवळे असे आरोपी सुनेचे नाव आहे. 9 मार्चच्या सकाळी साडेसातच्या सुमारास सासू प्रमिलाबाई देवळे यांचा खून झाल्याची प्रथम तक्रार सुन रेखा हिने पोलिसात दिली होती. पोलिस निरिक्षक आधारसिंग सोनवणे यांनी आपल्या पथकासह घटनास्थळी भेट देत पाहणी केली होती. मयत सासूच्या गळ्यभोवती दोरी आवळून खून करण्यात आल्याचे दिसून आले होते.
श्वान पथकाच्या वारंवार सुन रेखाकडे घुटमळण्यामुळे पोलिसांना तिच्यावर संशय आला. मालेगाव पोलिसांनी तिची सखोल चौकशी केली असता तिनेच हा खून केल्याचे उघड केले. सासू प्रमिलाबाई केशव देवळे हिच्या नावे शेतजमीन होती. काही महिन्यापुर्वी सुन रेखाचा पती विजय देवळे याची देखील हत्या झाली होती. त्या शेतजमीनीची रेखा विजय देवळे ही एकमेव वहीवाटदार होती. सदर जमीन आपल्या नावावर करुन घेण्यासाठी सुन रेखा प्रयत्नशील होती. त्यातून हा खूनाचा प्रकार घडला. मयत सासू प्रमिला देवळे गावालगत असलेल्या जागेत शौचास गेली असता तिचा रेखाने दोरीने गळा आवळून खुन केला. याकामी तिला मदत करणा-या डिगंबर अवधून देवळे याला देखील अटक करण्यात आली आहे. दोघा आरोपींविरुद्ध भा.द.वि. 302 नुसार अटक करण्यात आली आहे.