जळगाव : मध्यप्रदेशातील बालसुधारगृहातून पळून जाण्यात यशस्वी झालेल्या अल्पवयीन आरोपीस जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. त्याची स्थानिक बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे. पोटदुखीच्या बहाण्याने मध्यप्रदेशातील बालसुधारगृहातून पळून जाण्यात यशस्वी झालेला अल्पवयीन आरोपी अट्टल घरफोड्या असून त्याच्यावर मोटारसायकल चोरीचे देखील गुन्हे आहेत. धरणगाव आणी एरंडोल येथील मोटार सायकल चोरीच्या गुन्ह्याची त्याने कबुली दिली आहे. याशिवाय धुळे व शिरपुर येथे देखील घरफोडी व मोटार सायकल चोरीचे गुन्हे केले असल्याचे त्याने चौकशीत कबुल केले आहे.
मध्य प्रदेशातील बालसुधारगृहातून पळून गेल्यामुळे दोन पोलिस कर्मचा-यांना निलंबीत होण्याची वेळ आली होती. मध्यप्रदेशातील झाबुआ कोतवाली पोलिस स्टेशनला त्याच्या पळून जाण्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तो चोपडा येथे वास्तव्याला असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. किरणकुमार बकाले यांना समजली होती. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने त्याला चोपडा शहरातून ताब्यात घेतले. त्याच्या ताब्यातून चोरीच्या दोन मोटारसायकली हस्तगत करण्यात आल्या आहेत.
या तपासकामी स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि.किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ. अश्रफ शेख, इद्रीस पठाण, दत्तात्रय बडगुजर, किरण चौधरी, दिपक शिंदे, भारत पाटील यांनी सहभाग घेतला.







