जळगाव : जुन्या वादाचा राग मनात ठेवत तरुणासह त्याच्या साथीदाराने एकावर प्राणघातक हल्ला व त्याच्यासोबत असलेल्या साथीदाराला लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा घडल्यापासून फरार असलेल्या दोघा हल्लेखोरांना एमआयडीसी पोलिसांनी भोलाणे येथून ताब्यात घेत अटक केली आहे. राहुल रामचंद्र ब-हाटे(32) आणि निलेश उर्फ बाबा संजय अहिराव (दोघे रा. रामेश्वर कॉलनी जळगाव) अशी अटकेतील दोघा हल्लेखोरांची नावे आहेत. यातील राहुल ब-हाटे याच्याविरुद्ध गंभीर स्वरुपाचे विविध गुन्हे पोलिस दफ्तरी दाखल आहेत.
संतोष सुभाष कोळी व त्याचा मित्र सागर दादाभाऊ केदार असे दोघे जण 7 फेब्रुवारी रोजी एमआयडीसी परिसरात मोटारसायकलने कामानिमीत्त जात होते. त्यावेळी पलीकडून राहुल रामचंद्र ब-हाटे व निलेश संजय अहिराव असे दोघे जण त्यांच्या ताब्यातील मोटारसायकलने येत होते. संतोष कोळी याने राहुल ब-हाटे याच्याविरुद्ध यापुर्वी गुन्हा दाखल केला आहे. तो राग मनात असल्यामुळे राहुल ब-हाटे याने संतोष कोळी याच्या पाठीवर चाकूने हल्ला केला. त्यात संतोष जखमी होत जमीनीवर कोसळला. जमीनीवर पडलेल्या संतोष यास त्याच्यासोबत असलेल्या सागरने उचलण्याचा प्रयत्न केला होता. दरम्यान निलेश अहिराव याने संतोष व सागर या दोघांना लाथाबुक्क्याने मारहाण केली होती. घटनेनंतर गर्दी जमल्यामुळे दोघे हल्लेखोर तेथून फरार झाले होते. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात संतोष कोळी याच्या फिर्यादीनुसार दोघांविरुद्ध रितसर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
घटना घडल्याच्या दिवसापासून दोघे हल्लेखोर फरार होते. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली दोघा हल्लेखोरांना आज भोलाणे येथून सहायक फौजदार आनंदसिंग पाटील, पोलिस कर्मचारी गोविंदा पाटील व योगेश बारी यांनी दोघांना अटक केली आहे. पुढील तपास स.पो.नि.अमोल मोरे व त्यांचे सहकारी रतीलाल पवार करत आहेत. अटकेतील दोघांना उद्या न्यायालयात हजर केले जाणार आहे.