पाचोरा (प्रतिनिधी) : मध्यरात्री कुरंगी हनुमंतखेडा सिम गिरणानदी पात्रात अवैध वाळू वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर सरपंच पती तथा गिरणा बचाव मोहीमेतील तरुणांनी पकडले. पकडण्यात आलेले दोन्ही ट्रॅक्टर पाचोरा महसुलचे नांद्रा मंडळ अधिकारी व त्यांच्यासोबत आलेल्या तलाठ्यांच्या ताब्यात देण्यात आले.
याबाबत सविस्तर माहिती अशी की गिरणा नदीपात्रात 13 मार्चच्या मध्यरात्री अडीच वाजता एका ट्रॅक्टरमधे अवैध वाळू भरल्यानंतर दुसरे ट्रॅक्टर भरण्यासाठी येत असल्याची गोपनीय माहिती गिरणा बचाव मोहीमेतील तरुणांनी सरपंचांसह उपसरपंच आणि सदस्यांना कळवण्यात आले. याबाबत माहिती मिळताच सरपंच पती गणेश संतोष पाटील, योगेश ठाकरे, नगराज पाटील, अरुण कोळी, दिपक मोरे, भागवत पाटील, संजय भोई, पिंटू कोळी यांच्यासह गिरणा बचाव मोहीमेतील तरुणांनी घटनास्थळी दाखल होत वाळूचे ट्रॅक्टर पकडले.
पाचोरा प्रांताधिकारी, तहसिलदार, मंडळ अधिकारी, तलाठी यांना लागलीच माहिती देण्याचा प्रयत्न करण्यात आला. यापैकी कुणीही फोन उचलला नाही. अखेर सकाळी पाच वाजता मंडळ अधिकारी प्रशांत पगार यांनी फोन उचलला. त्यांनी तातडीने कारवाईकामी तलाठी गायकवाड, दवंगे व कोतवाल विजय कोळी घटनास्थळी रवाना केले. गिरणानदी पात्रात सकाळी साडेपाच वाजता विना क्रमांकाचे दोन्ही ट्रॅक्टर महसुलच्या ताब्यात देण्यात आले.