जळगाव : एमआयडीसी परिसरातील फातेमा नगर परिसरातील चिकन दुकानाजवळ आग लावल्याच्या संशयातून मध्यरात्री दोन गटात जबर मारहाण व पाईप कंपनीची तोडफोड करण्याचा प्रकार घडला. या घटनेप्रकरणी दोन्ही गटाकडून एमआयडीसी पोलिस स्टेशनला परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
एमआयडीसी परिसरातील सेक्टर एस 52 येथे नरेंद्र मानसिंग पाटील यांच्या मालकीची शुभसखी पीव्हीसी पाईप कंपनी आहे. या कंपनीत सतीष सुनील पाटील हा तरुण कामाला आहे. त्याने दिलेल्या फिर्यादीनुसार तो आणी त्याचे सहकारी पवन गणेश पाटील व अविनाश सुभाष पाटील असे तिघे जण रात्री दहा वाजता कुसुंबा येथे जेवणाचा डबा घेण्यासाठी गेले होते. परत येतांना वाटेत त्यांना फातेमा नगर येथील चिकन दुकानाजवळ आग लागल्याचे दिसले. आगीचे दृश्य बघण्यासाठी तिघे जण थोडा वेळ उभे राहिले. त्यावेळी पांढ-या रंगाच्या कारमधून काही लोक तेथे आले. सदर आग या तिघा तरुणांनी लावली असल्याचा कारमधील उपस्थीतांना संशय आला. काहीवेळाने तिघे तरुण त्यांच्या ताब्यातील मोटारसायकलने आपल्या कंपनीत जाऊ लागले. तिघा तरुणांनी आग लावल्याच्या संशयातून कारमधील मंडळी व काही तरुण त्यांच्या मागे मागे कंपनीत आली. भितीपोटी तिघा तरुणांनी कंपनीचे शटर आतून बंद करुन घेतले. जमावातील काही जणांनी सक्तीने शटर उघडून आतील कामागारांना मारहाण सुरु केली. आत आल्यावर जमावाने सामानाची तोडफोड सुरु केली.
या घटनेची माहिती मिळताच कंपनी मालक नरेंद्र पाटील मोटारसायकलने घटनास्थळी हजर झाले. त्यांच्या मोटार सायकलचे देखील जमावाने नुकसान केले. त्यात त्यांचा मोबाईल गहाळ झाला. कंपनी मालक नरेंद्र पाटील यांच्यासह पवन गणेश पाटील, अविनाश सुभाष दांडगे, मंगेश सुभाष पाटील, प्रविण प्रल्हाद कुंभार, नितीन विठ्ठल पाटील, अशांना दगड व लोखंडी रॉड ने मारहाण केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. दरम्यान घाबरुन पळून गेलेल्या प्रविण कुंभार या तरुणाला रस्त्यात गाठून मारहाण झाली. मारहाण करणारे शनीपेठ येथील रहिवासी रेहान अब्दुल करिम सालार, साजिद अब्दुल हाजी सालार व डॉ. आमीर अब्दुल रज्जाक (तिघे रा. शनीपेठ असे असल्याचे तक्रारदार कामगार सतिष पाटील यास समजले. या तिघांविरुद्ध एमआयडीसी पोलिस स्टेशनला रितसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुस-या बाजुने रेहान अब्दुल करीम सालार यांनी एमआयडीसी पोलिस स्टेशनला परस्परविरोधी तक्रार दाखल केली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार रेहान व साजिद असे दोघे जण फातिमा नगर येथील त्यांच्या काकूच्या घरी भेट घेण्यासाठी गेले होते. शनीपेठ येथे परत येत असतांना वाटेत जमावाने त्यांच्यावर दगडफेक करत काठ्यांनी हल्ला केला. त्यावेळी पाठीमागून त्यांचा भाऊ डॉ. आमीर अब्दुल रज्जाक सालार येत होता. त्याने उतरुन दोघांची विचारपुस केली. दरम्यान जमावाने त्यांच्या गाडीवर देखील दगडफेक केली. नंतर सर्व जण शुभसखी या कंपनीत पळून गेले असल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे.
या घटनेतील नरेंद्र मानसिंग पाटील, अविनाश दांडगे, मंगेश पाटील, सतिष पाटील, पवन पाटील, मनोज पाटील या सहा जणांवर प्रतिबंधक कारवाई करण्यात आली असून आमीर अब्दुल रज्जाक सालार व साजीद अब्दुल हाजी सालार या दोघांना अटक करण्यात आली आहे. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि. अमोल मोरे, पो.उ.नि.रामकृष्ण पाटील, सहायक फौजदार अतुल वंजारी, आनंदसिंग पाटील, इमरान सैय्यद, रतीलाल पवार, गोविंदा पाटील, सुधीर साळवे, साईनाथ मुंडे, संदिप धनगर, दिपक चौधरी, योगेश बारी, चेतन सोनवणे, पोलिस चालक इम्तीयाज खान यांनी अथक परिश्रम घेत घटनेवर नियंत्रण मिळवले. आरोपींचा शोध घेत त्यांना ताब्यात घेतले आहे.
पुढील तपास सुरु आहे.