मुंबई : अँटिलिया बंगल्यासमोर स्फोटकांनी भरलेले वाहन आणि त्या वाहनाचे मालक मनसुख हिरेन यांच्या मृत्यूप्रकरणी वादात सापडलेले व निलंबीत करण्यात आलेले स.पो.नि. सचिन वाझे यांचा भाऊ सुधर्म वाझे यांनी उच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली आहे. आपल्या भावाला बेकायदेशीर अटक करण्यात आल्याचे सुधर्म वाझे यांनी याचिकेत म्हटले आहे. स.पो.नि. सचिन वाझे यांना उच्च न्यायालयात हजर करण्याकामी त्यांनी हेबीयस कॉर्पस दाखल केली आहे.
स्कॉर्पिओ मालक मनसुख हिरेन यांच्या मृत्यूमागे सचिन वाझे यांचा हात असल्याचा भाजपाचा आरोप आहे. या आरोपाच्या गदारोळात स.पो.नि. सचिन वाझे यांची दोनवेळा बदली करण्यात आली. त्यानंतर अटक व आता निलंबन करण्यात आले. तसेच सलग अकरा तास एनआयएच्या चौकशीला सामोरे जावे लागले. ठाणे न्यायालयाने त्यांचा अटकपुर्व जामीन देखील फेटाळला आहे. या सर्व घडामोडीनंतर आता त्यांचा भाऊ सुधर्म वाझे यांनी उच्च न्यायालयात धाव घेत हेबियस कॉर्पस दाखल करत त्यांच्या अटकेवर हरकत घेतली आहे. स.पो.नि. सचिन वाझे यांना न्यायालयात हजर करुन त्यांची सुटका करण्याची मागणी त्यांनी केली आहे. मनसुख हिरेन यांच्या पत्नीच्या मदतीने राजकीय क्षेत्रातील नेत्यांनी सचिन वाझे यांचा बळी देण्याचा प्रकार केला जात असल्याचा आरोप या याचिकेच्या माध्यमातून केला आहे. सचिन वाझे यांना अटक करतांना 41(ए) अंतर्गत नोटीस देण्यात आली नसून प्रथम खबरी अहवाल देखील देण्यात आला नसल्याचे याचिकेत सुधर्म वाझे यांनी याचिकेत म्हटले आहे. त्यांना अटकेचे कारण सांगण्यात आलेले नाही.