नकली पोलिसाने विवाहितेवर केला सतत अत्याचार! असली पोलिसांनी कोठडीत घेतला त्याचा समाचार!!

अहमदनगर : बोलणा-याचे खडे देखील विकले जातात आणि न बोलणा-याचे गहू देखील विकले जात नाही असे म्हणतात. चिंध्या पांघरुन सोने विकण्यासाठी बसले तर ग्राहक राजा चालत येत नाही. मात्र सोने पांघरुन चिंध्या विकण्यासाठी बसले तर ग्राहक राजा पळत येतो असे देखील म्हटले जाते. बोलबच्चन आणि भुलभुल्लैय्या केल्यानंतर भोळेभाबडे लोक फसतात. जेव्हा विस्तवरुपी वास्तवाची ओळख होते तेव्हा पुलाखालून बरेच पाणी वाहून गेलेले असते. चकाचक कपडे परिधान करुन चकाचक गाडीवर गॉगल लावून फिरणा-या तरुणांची भुरळ आजदेखील ग्रामीण भागातील काही तरुणींना व विवाहीतांना पडते हे वास्तव आहे.

काबाडकष्ट करणारा प्रामाणिक पती लाभला तरी काही विवाहीत महिलांना भुलभुल्लैया आणि दिखावागिरीच्या दुनियेत हिरोप्रमाणे वावरणा-या तरुणाईची क्रेझ लग्नानंतर देखील कायम राहते. अशा महिला आपल्या पतीची तुलना इतरांसोबत करण्यात मश्गुल असतात. “भला उसकी कमीज मेरे कमीजसे सफेद क्यो”? या वाक्याचा वापर केलेल्या जाहिरातीनुसार जेथे तुलना आली तेथे दुख: ओघाने आलेच म्हणून गृहीत धरावे लागते.

पतीच्या जेमतेम उत्पन्नावर घरखर्च चालवणारी गुड्डी (काल्पनिक नाव) शिर्डी येथे पती व तिन वर्षाच्या मुलासमवेत संसार करत होती. सन 2016 मधे विवाह झाल्यानंतर ती पतीसमवेत शिर्डी येथे सासरी राहण्यास आली. तिचा संसार व्यवस्थित सुरु होता. तिच्या संसार वेलीवर एका पुत्र रत्नाचे आगमन देखील झाले. संसाराला हातभार लागावा म्हणून ती ऑनलाईन प्रॉडक्ट विक्रीचा व्यवसाय एका अ‍ॅपच्या माध्यमातून करु लागली. या व्यवसायाच्या माध्यमातून तिची अनेकांसोबत ओळख निर्माण झाली. या ऑनलाईन व्यवसायाच्या माध्यमातून तिची ओळख किरण महादेव शिंदे या तरुणासोबत देखील झाली. शिर्डी येथील शिवाजीनगर भागातील साईनिवास येथे रहात असल्याचे त्याने तिला चॅटींग करतांना सांगीतले. आपण पोलिस असल्याचे त्याने तिला खोटे सांगितले. शिर्डी पोलिस स्टेशनला आपण नेमणूकीला असल्याचे किरण शिंदे या थापाड्याने तिला सांगितले व तिला देखील ते खरे वाटले.

पोलिस या शब्दाचे ग्लॅमर विवाहीत गुड्डीच्या अवतीभोवती फिरु लागले. पोलिसाचा या दुनियेत एक वेगळाच रुबाब असतो असे ती मनाशी म्हणू लागली. पोलिसासोबत आपली ओळख झाल्याचे समजून ती वेगळ्याच दुनियेत वावरु लागली. मला देखील पोलिस व्हायचे आहे असे ती त्याला चॅटींग करतांना सांगू लागली. आता हे पाखरु आपल्या जाळ्यात फसणार असे तो मनातल्या मनात म्हणू लागला. चॅटींग दरम्यान इकडच्या तिकडच्या गप्पा करतांना मला पोलिस होण्यासाठी मदत करा असे ती त्याला म्हणू लागली. मग हळूच त्याने तिच्यापुढे प्रेमाचा आणि लग्नाचा प्रस्ताव ठेवला. त्यावर तिने त्याला म्हटले की मी अगोदरच विवाहीत आहे. आपण मला पोलिस होण्याकामी मदत करा.   

आतापर्यंत तिच्याशी चॅटींग करणारा नकली पोलिस किरण शिंदे तिला प्रत्यक्षात भेटू लागला. दरम्यानच्या काळात सर्वत्र लॉकडाऊन सुरु झाले. या लॉकडाऊन काळात तिच्या वडीलांचे निधन झाले. त्यामुळे माहेरी कसे जायचे? हा तिच्यापुढे प्रश्न होता. याकामी त्याने तिला मदत करण्यास सुरुवात केली. किरण शिंदे नावाचा पोलिस माझा परिचीत असून तो मला माहेरी जाण्यास मदत करत असल्याचे तिने पतीला सांगितले. तिच्या पतीने देखील तिला माहेरी जाण्याकामी आडकाठी आणली नाही. भंडारा जिल्ह्यातील गावात तिचे माहेर होते. या गावी तो स्वत: तिला घेऊन गेला. आपण पोलिस आहोत, आपल्याला कुणी अडवणार नाही असे म्हणत तिच्याशी लाडीगोडी लावत तो तिला अहमदनगर येथून खासगी ट्रॅव्हल्स बसने तिच्या माहेरी घेवून गेला. रात्रीचा प्रवास त्यात खिडकीतून येणारा गार वारा अशा वातावरणात तो तिच्या अगदी जवळ जावून लाडीक संभाषण करु लागला. तो तिला म्हणाला की तुझ्या पतीपेक्षा अधिकचे सुख मी तुला देईन. तु मला आवडतेस. मला तुझ्यासोबत लग्न करायचे आहे. मी तुझ्या मुलाचा सांभाळ करेन. आपल्यासोबत असलेला किरण शिंदे हा पोलिस असल्यामुळे तो आपले सर्व प्रकारे रक्षण करण्यास सक्षम असल्याचे गुड्डी मनातल्या मनात समजत होती.

तिच्या वडीलांच्या निधनानंतर इतर आर्थिक प्रश्न मार्गी लावण्याकामी तोतया पोलिस किरण शिंदे याने गुड्डीला मदत केली. या कालावधीत तो तिच्या अधिक संपर्कात आला. या संपर्कातून त्याने तिच्यासोबत सर्व प्रकारचे संबंध प्रस्थापित केले. मला पुणे येथे बदली करुन घ्यायची आहे असे सांगत तो तिला तिच्या माहेरुन परस्पर पुणे येथे घेवून आला. पुणे येथील एका अपार्टमेंटमधे त्याने तिची राहण्याची व्यवस्था केली.  या कालावधीत त्याने तिच्यासोबत सर्व प्रकारचे संबंध अव्याहतपणे प्रस्थापित केले होते.

या कालावधीत आपल्या पत्नीला किरण शिंदे या गावाहून त्या गावाला घेवून फिरत असल्याचे गुड्डीच्या पतीच्या लक्षात आले. त्याने त्याला फोन करुन संगितले की तु माझ्या पत्नीला परत शिर्डी येथे पाठवून दे, तु कशासाठी आमचा सुरु असलेला सुखाचा संसार मोडण्याचा प्रयत्न करत आहेस. मी तुझ्या विरुद्ध पोलिस स्टेशनला तक्रार दाखल केली आहे. गुड्डीच्या पतीचे असे बोलणे ऐकून तो मनातून घाबरला. रुमवर परत आल्यावर गुड्डीने त्याला विचारले की तुमचा पोलिस युनिफॉर्म कुठे आहे? त्यावर नकली ओळखपत्र दाखवत तो तिला म्हणाला की मला युनिफॉर्मची आवश्यकता नाही. मी कार्यालयीन कामकाज बघतो. खोटेनाटे बोलून बतावणी करत तो तिला या गावाहून त्या गावाला घेवून फिरवत होता. दरम्यान तिला पतीपेक्षा किरण शिंदे जवळचा वाटत होता. त्यामुळे तिने तिच्या पतीकडे घटस्फोटाची मागणी केली. या कालावधीत तिच्या पतीने वारंवार किरण शिंदे यास फोन करुन हैरान करुन सोडले होते.

त्यामुळे त्याने तिला म्हटले की आपले मोबाईलचे सिमकार्ड बंद करुन टाकू. आपल्याला पुणे सोडावे लागेल. नाहीतर पोलिस आपल्याला पकडतील. तुझ्या पतीने माझ्याविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर त्याने तिला नागपुरला आणले. त्याने तिला नागपूरला एक भाड्याचे घर मिळवून दिले. त्याच्या अशा बोलण्यामुळे, वागण्यामुळे व पोलिसाचा युनीफॉर्म नसल्यामुळे तिला त्याची शंका येवू लागली. तिने त्याला थेट प्रश्न केला की तु पोलिस नाही, तु खोटे बोलत आहेस.  

तिच्या थेट आरोपामुळे तो मनातून हादरला. आता तो तिला आता म्हणू लागला की माझी बदली भंडारा येथे होणार आहे. तो कधी पुणे येथे बदली होणार असल्याचे तर कधी भंडारा येथे बदली होणार असल्याचे तिला सांगत होता. त्याच्याकडे खाकी युनीफॉर्म नसल्यामुळे देखील तिला त्याची शंका येत होती. इतके दिवस पोलिस दलाच्या नोकरीत सुटी कशी काय मिळू शकते? असे एक ना अनेक प्रश्न तिच्या मनाला भेडसावत होते. आता तर तो तिला शिवीगाळ व धमकी देत होता. आपली फसगत होत असल्याची तिला शंका येऊ लागली. यापेक्षा आपला पती चांगला होता असे तिला मनातल्या मनात वाटू लागले.

पतीसोबत फोनवर बोलणे टाळणारी, त्याच्याशी घटस्फोटाची भाषा करणारी गुड्डी आता स्वत;हून पतीला फोन करु लागली. माझ्या जिवाला किरणपासून धोका आहे. तुम्ही मला घ्यायला या असे ती पतीसोबत फोनवर बोलू लागली. गुड्डी आपल्या पश्चात पतीसोबत बोलत असल्याचे किरणच्या लक्षात आले. त्याने पुन्हा राहण्याची जागा बदलण्याचे मनाशी  ठरवले.  

यावेळी त्याने मोहाडी तालुक्यातील खापा येथे भाड्याची खोली घेतली. याठिकाणी त्याने तिची राहण्याची व्यवस्था केली. मला भंडारा येथे बदली करायची आहे, त्यासाठी मी डीजी कार्यालयात मुंबई येथे जावून येतो असे म्हणत त्याने तेथून आपली सुटका करुन घेतली. त्याच्या गैरहजेरीत तिने शिर्डी पोलिस स्टेशनला संपर्क साधला. किरण शिंदे नावाचा कुणी पोलिस कर्मचारी शिर्डी पोलिस स्टेशनला नेमणूकीस आहे का? अशी तिने विचारणा केली. आमच्याकडे किरण शिंदे नावाचा कुणी कर्मचारी नेमणूकीला नाही असे तिला उत्तर मिळाले. आजपर्यंत पोलिस असल्याची बतावणी करत आपला उपभोग घेणारा किरण शिंदे हा नकली पोलिस असल्याचे तिच्या लक्षात आले. किरण शिंदे नकली पोलिस असल्याचे समजताच तिच्या पायाखालची वाळू सरकली. तिच्या मनात खळबळ माजली. आपला पतीच चांगला होता याची पुन्हा एकवेळा तिला जाणीव झाली. या फसव्या जगात वाट चुकल्याची तिला जाणीव झाली. बदलीसाठी डी.जी. कार्यालयात गेला असल्याची बतावणी करणा-या किरण शिंदेच्य गैरहजेरीत ती तिच्या पतीकडे गेली. तिने पतीला सर्व हकीकत कथन केली.  

3 मार्च रोजी तिने पतीसह राहता पोलिस स्टेशन गाठले. पो.नि. सुभाष भोये यांची भेट घेत तिने आपली कथा आणी व्यथा त्यांच्याजवळ कथन केली. पो.नि. सुभाष भोये यांनी देखील तिची दर्दभरी दास्तान व्यवस्थीत ऐकून घेतली. तिच्या फिर्यादीनुसार किरण महादेव शिंदे याच्याविरुद्ध राहता पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला. सदर गुन्हा भाग 5 गु.र.न. 44/21 भा.द.वि.376, 419, 420, 170, 171, 323 नुसार दाखल करण्यात आला. पो.नि.सुभाष भोये यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि.प्रशांत कंडारे, उपनिरीक्षक संतोष पगारे, हेड काँस्टेबल सुरेश गागरे, बाबासाहेब सांगळे, पोलीस नाईक दिपक उर्फ राजू कदम, सुनील मालनकर, किरण’माळी यांच्या पथकाने तपासाला सुरुवात केली. पिडीत व फिर्यादी गुड्डीला तोतया पोलिस व आरोपी किरण शिंदे याला फोन करण्यास व त्याच्याशी लाडीक शब्दात बोलण्यास सांगण्यात आले. त्याच्याशी बोलण्यात गुंग राहण्यास व त्याला बस स्थानकावर बोलावून घेण्यास तिला सांगण्यात आले. ती देखील पोलिस पथकाच्या सांगण्यानुसार त्याच्याशी बोलण्यात मग्न झाली व त्याला राहता बस स्थानकावर येण्यास सांगीतले. तो राहता बस स्थानकावर बस मधून उतरु लागताच पोलिस पथकाने त्याच्यावर झडप घातली. त्याला अटक करण्यात आली. त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने सुरुवातीला त्याला पोलिस कोठडी सुनावली. सध्या तोतया पोलिस व आरोपी किरण महादेव शिंदे सध्या न्यायालयीन कोठडीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here