पिंपरी : पिंपरी चिंचवड येथील शिवसेनेचे माजी शाखा प्रमुख विजय सर्जेराव सुर्वे (40) रा. चिंचवड यांच्या खून प्रकरणी पोलिसांकडून खुलासा करण्यात आला आहे. विजय सुर्वे हे क्रिकेट या खेळावर सट्टा घेत होते. त्यांनी आरोपीला या सट्ट्यासाठीच मोठे कर्ज दिले होते. त्यातूनच हा खून झाल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे.
पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी याबाबत माहिती दिली आहे. हर्षद अशोककुमार राठोड (29), रा. निगडी याला 11 मार्च रोजी तर त्याचा साथीदार महंमद इकलाख महंमद इद्रिस (33) रा. दिल्ली याला 15 मार्च रोजी अटक करण्यात आली आहे. विजय सुर्वे यांचा मृतदेह मुळशी खुर्द येथे सापडला होता. याप्रकरणी सुरुवातीला पौड पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद करण्यात आला होता. त्यानंतर हा गुन्हा पिंपरी पोलिस स्टेशनला वर्ग करण्यात आला.
क्रिकेटवर बेटींग करणा-या विजय सुर्वे यांना आरोपी हर्षद याच्याकडून बेटींगवरील 18 ते 20 लाख रुपये घेणे होते. सुर्वे यांनी आरोपी हर्षदकडे या रकमेसाठी तगादा लावला होता. जमीन दाखवण्याच्या बहाण्याने आरोपी हर्षद आणि इद्रिस या दोघांनी मिळून सुर्वे यांना काळभोरनगर चिंचवड येथून कारने ताथवडे येथील मोकळ्या जागेत नेले. त्याठिकाणी सुर्वे यांच्यावर कठीण वस्तूने मारहाण करुन जखमी करत त्यांची हत्या केली. पुरावा नष्ट करण्यासाठी सुर्वे यांचा मृतदेह पौड पोलीस स्टेशनच्या हद्दीत टाकून देण्यात आला होता.