मुंबई : प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या बंगल्याबाहेर स्कॉर्पिओ वाहनात आढळून आलेल्या स्फोटकाप्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून (एनआयए) मुंबई पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना येत्या काही दिवसात चौकशीकामी बोलावले जाणार असल्याचे म्हटले जात आहे.
सहआयुक्त मिलिंद भारंबे, प्रकाश जाधव आणि अजून काही अधिका-यांना एनआयएकडून बोलावले जाणार असल्याची शक्यता आहे. मुंबई पोलिस दलात अनेक वरिष्ठ अधिकारी असतांना या स्फोटकाचा तपास सहायक पोलिस निरिक्षक दर्जाच्या अधिका-याकडे का सोपवण्यात आला याची माहिती एनआयएला हवी असल्याचे देखील म्हटले जात आहे.
आपल्याला पुर्वीची प्रसिद्धी आणि पत मिळवायची होती व त्यासाठीच अंबानी यांच्या बंगल्याबाहेर स्फोटके ठेवल्याचा बनाव केल्याची माहिती सचिन वाझे यांनी एनआयए ला दिली होती. मात्र या गोष्टीवर एनआयएचा विश्वास नसून सर्व शक्यतांची पडताळणी केली जाण्याचा अंदाज आहे. सध्या एनआयएचे अधिकारी विक्रम खलाटे यांच्या अख्त्यारीखाली तपासाची सुत्रे हाताळली जात आहे. या तपासाच्या चौकशीत मुंबई पोलिस दलातील एका बड्या अधिका-याचे नाव वाझे यांनी घेतल्याची चर्चा आहे. बड्या पदावरील अधिका-याचे नाव घेतल्यामुळे एनआयए चे अधिकारी विक्रम खलाटे यांच्यावर कदाचीत दडपण येऊ शकते असे देखील बोलले जात आहे.