पाचोरा (प्रतिनिधी) : पाचोरा जळगाव रस्त्यालगत प्रेम नगर परिसरात समर्थ किशोर चौधरी या तेरा वर्षाच्या बालकाचा सोळा चाकी ट्रॉलाखाली आल्याने दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मृत बालक किशोर चौधरी हा ट्रान्सपोर्ट चालकाचा मुलगा असून अपघातग्रस्त वाहनाचा चालक फरार झाला आहे. मृत समर्थ आणी वाहन चालक हे दोघेजण एकाच परिसरात राहतात.
परिसरातील तरुणांनी मृत समर्थ यास तातडीने डॉ भूषण मगर यांच्या विघ्नहर्ता हॉस्पीटलमधे दाखल केले. तत्पुर्वीच त्याचे निधन झाले होते. प्रत्यक्षदर्शीनी दिलेल्या माहितीनुसार हा अपघात अतिशय भिषण आणि भयावह होता. मृत बालक अवजड वाहनाच्या चाकात अडकून पडल्याने त्याचे शरीर गोळा झाले होते. त्याला जेसीबीच्या मदतीनेच काढावे लागले. घटनास्थळी पोलिसांनी धाव घेत अपघातग्रस्त वाहन ताब्यात घेतले आहे. बालकाचे शव विच्छेदनकामी पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असून पुढील तपास सुरु आहे.







