मुंबई : एनआयए अर्थात राष्ट्रीय तपास यंत्रणेनंतर आता ईडी स्वत:हून शंभर कोटी रुपयांच्या वसुलीप्रकरणी चौकशी करणार असल्याचे समजते. मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्र्यांच्या भ्रष्टाचाराचा उल्लेख असणारे एक पत्र मुख्यमंत्र्यांना पाठवून खळबळ उडवून दिली आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी निलंबीत स.पो.नि. सचिन वाझे यांना दरमहा शंभर कोटी रुपयांच्या वसुलीचे टार्गेट दिले असल्याचा या पत्रात उल्लेख केला होता.
या रकमेची व्याप्ती बघता ईडी स्वत:हून या प्रकरणी चौकशी करणार असल्याचे म्हटले जात आहे. या प्रकरणी ईडीने चौकशी सुरु केल्यास गृहमंत्री अनिल देशमुख अजून अडचणीत येणार असल्याचे देखील म्हटले जात आहे. या शंभर कोटी रुपयांच्या लेटर बॉम्बचा तपास माजी आयपीएस अधिकारी ज्युलियो रिबेरो यांनी करावा असे रा.कॉ. सुप्रिमो शरद पवार यांनी सुचवले होते. याप्रकरणी तसा प्रस्ताव आला तरी आपण तपास करणार नसल्याचे ज्युलियो रिबेरो यांनी म्हटले आहे. हा गुंता राजकारण्यांनी स्वत:च सोडवावा असेदेखील रिबेरो यांनी एका वृत्त वाहिनीशी बोलतांना म्हटले आहे. आता आपले वय वर्ष 92 असून आपल्याकडे तपासकामाची उर्जा नाही. अंगात तेवढी उर्जा असती तरी देखील याप्रकरणी चौकशी आपण केली नसती असे देखील रिबेरो यांनी एका वृत्त वाहिनीसोबत बोलतांना म्हटले आहे. या प्रकरणी अत्यंत खालच्या दर्जाचे राजकारण केले जात असल्याची प्रतिक्रिया माजी आयपीएस अधिकारी ज्युलियो रिबेरो यांनी दिली आहे.