मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी आता मुंबई उच्च न्यायालयात न्यायाची मागणी करण्यासाठी धाव घेतली आहे. गृहमंत्री अनिल देशमुखांवर सिंग यांनी निलंबीत स.पो.नि. सचिन वाझे यांच्यामार्फत शंभर कोटी रुपयांच्या वसुलीसह स्वत:च्या बदलीबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाने त्यांना उच्च न्यायालयात जाण्याचा आदेश दिला. त्यानुसार त्यांनी आता मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी प्रमुख तिन मागण्या याचिकेत केल्या आहेत. गृहमंत्री अनिल देशमुख यांची सीबीआय चौकशी व्हावी. मुंबई पोलिस आयुक्तपदावरुन झालेली त्यांची बदली बेकायदेशीर ठरवावी. तसेच पुढील कारवायांपासून संरक्षण मिळावे. शंभर कोटी रुपयांच्या वसुली प्रकरणी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरुद्ध करण्यात आलेल्या आरोपांच्या चौकशीची मागणी भाजपकडून देखील होत आहे. त्यावर गृहमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रात आपल्यावरील आरोपांची चौकशी लावून सोक्षमोक्ष लावावा असे म्हटले आहे.