जळगाव : जळगाव औरंगाबाद महामार्गावरील पुलाचे बांधकाम करणाऱ्या परप्रांतीय ठेकेदाराची लुट केल्याप्रकरणी जळगाव एमआयडीसी पोलिस स्टेशनला रितसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुधीर व्यंकटेश्वर रखीपती (40) रा. नेल्लूर वेदायपाडम ता.जि.नेल्लूर आंध्रप्रदेश ह मु.नेरी ता. जामनेर जि. जळगांव असे लुट झालेल्या ठेकेदाराचे नाव आहे.
उमाळा येथून सहा मजुरांना पुल निर्मितीच्या साईटवरील कुसुंबा येथे सोडून ठेकेदार सुधीर रखीपती त्यांच्या चारचाकी वाहनाने 3 एप्रिलच्या रात्री अकरा वाजता नेरी गावाच्या दिशेने परत येत होते. त्यावेळी वाटेत एकाने त्यांना थांबवून लिफ्ट मागितली.त्या इसमास आपल्या वाहनात बसवल्यानंतर त्याचे दोन साथीदार वाटेत पुढे दुचाकीसह उभे होते.त्या दोघांनी चारचाकी वाहन अडवून लूटमार केली.
या लुटमारीच्या घटनेत ठेकेदार सुधीर रखीपती यांच्या गळ्यातील 16 ग्रॅम वजनाची 56000 रुपये किंमतीची सोन्याची चैन जबरदस्तीने तोडून काढून घेतली. या प्रकारास ठेकेदार सुधीर रखीपती यांनी विरोध केला असता लाकडी दांड्याने मारहाण करण्यास सुरुवात केली. वाहनात बसण्यासाठी लिफ्ट मागणाऱ्या तरुणाने रखीपती यांच्या हातातील एमआय कंपनीचा दहा हजार रुपये किमतीचा मोबाईल व 3500 रुपये किमतीच्या सोन्याच्या दोन अंगठ्या व बाराशे रुपये जबरदस्तीने हिसकावून घेतले. याशिवाय गुगल पे चा पासवर्ड जबरीने विचारून घेतला. त्यानंतर तिघांनी तेथून पोबारा केला. या घटनेनंतर भेदरलेल्या ठेकेदाराने आपल्या सहका-यासह एमआयडीसी पोलीस स्टेशन गाठत फिर्याद दाखल केली.