चारित्र्याचा संशय गडद झाला फार! गळा आवळताच दिलीप झाला गार!!

जळगाव : दिलीप सोनवणे याची आई त्याच्या बालपणीच वारली होती. आईचे निधन झाल्यानंतर दिलीपच्या वडीलांनी दुसरे लग्न केले. आईचे निधन झाल्यानंतर मातृछत्र हरपलेल्या दिलीपला सावत्र आईचे छत्र मिळाले खरे मात्र सख्ख्या आईची सर त्याला सावत्र आईपासून काही लाभली नाही. कालांतराने त्याच्या वडीलांचे देखील निधन झाले. अशाप्रकारे आईवडीलांचे छत्र हरपलेला दिलीप काळानुरुप तरुण झाला. जळगाव जिल्ह्याच्या जामनेर तालुक्यातील गोंडखेल या ग्रामीण भागात राहणारा दिलीप रोजगार शोधू लागला. पोटापाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी तो ट्रॅक्टर  चालवण्यास शिकला.

सुमारे सहा वर्षापुर्वी तारुण्याच्या लाटेवर स्वार झालेला दिलीप अविवाहीत होता.  ट्रॅक्टर चालवून तो आपला पोटापाण्याचा प्रश्न सोडवत होता. आता तो लग्नायोग्य झाला होता. सन 2015 मधे जामनेर तालुक्यात पाटबंधारे विभागाच्या पाटाचे काम सुरु होते. त्या साईटवर ट्रॅक्टरने खडीची वाहतुक करण्याचे काम दिलीप करत होता. या पाटाच्या साईटवर एक देखणी मजुर तरुणी कामाला होती. तिचे नाव संगिता होते. संगिता दिसायला देखणी असल्यामुळे साहजीकच अविवाहीत दिलीप तिच्याकडे आकर्षित झाला. दिलीप आणि संगिता दोघे तरुण आणी अविवाहीत होते. खडीची ट्रॅक्टरद्वारे वाहतुक करत असतांना दोघांची दररोज नजरानजर होत गेली. या नजरेच्या खेळात दिलीपने बाजी मारली. त्याची एक नजर संगिताला घायाळ करुन सोडत होती. त्याच्या नजरेच्या खेळात मजुरीचे काम करणारी संगिता लज्जेने चुर होत असे. तिच्यासोबत काम करणा-या इतर महिला दोघांच्या इश्काचा खेळ समजून चुकल्या होत्या. कामावरील इतर मजूर महिला तिला दिलीपच्या नावाने टोमणे मारुन जणूकाही दोघांच्या इश्काच्या खेळाला बढावा देत होत्या. दुपारी जेवणाच्या वेळी सर्व पुरुष व महिला मजूर एकत्र येत असत. सर्व मजुर जेवणाला एकत्र बसल्यानंतर दिलीप आणि संगिता हे दोघे देखील सोबत जेवणाला बसत  होते. दिलीप हळूच त्याच्या डब्यातील पदार्थ तिला देत असे. ती देखील तिच्या डब्यातील पदार्थ त्याला देत होती. अशा प्रकारे पदार्थांची आदानप्रदान करता करता दोघे एकमेकांना घास भरवण्यास देखील मागेपुढे बघत नव्हते. बघता बघता दोघे इश्काच्या खेळात न्हाऊन निघाले. दोघांनी प्रेमविवाह करण्याचे ठरवले. पाटबंधारे विभागाची पाट तयार करण्याची साईट त्यांचे प्रेम जुळण्यास महत्वाची ठरली.  संगिता व दिलीप एकमेकांवर प्रेम करत असून लवकरच लग्न करण्याच्या तयारीत असल्याची माहिती तिच्या घरी समजली. दिलीपसोबत लग्न करण्यास तिच्या घरच्यांचा कडाडून विरोध होता.  संगिताच्या घरची मंडळी आपल्या लग्नाला समर्थन देणार नाही हे लक्षात आल्यानंतर दोघांनी पळून जावून लग्न करण्याचे ठरवले.

एके दिवशी हे दोघे प्रेमी रफूचक्कर झाले. दोघे प्रेमी पद्मालय येथील गणपती मंदीरात गेले. तेथेच त्यांनी एकमेकांच्या गळ्यात फुलांचे हार घालत गणपती बाप्पाला साक्षी ठेवत लग्न केले. त्या दिवसापासून दोघे पती पत्नी झाले. प्रेमी जिवांचे रुपांतर पती पत्नीत झाले होते. लग्नाच्या आधीपासून दिलीप यास दारु पिण्याचे व्यसन होते. त्याचे दारुचे व्यसन संगिताला माहिती होते. लग्नानंतर संगिता घरीच राहू लागली. आपल्या देखण्या पत्नीवर कुणाची नजर पडू नये, कुणी तिला प्रेमाचे इशारे करु नये या उद्देशाने त्याने तिला लग्नानंतर कामावर जाण्यास मज्जाव केला. तरीदेखील घर खर्चाला काही प्रमाणात हातभार लागावा म्हणून तिने पावसाळ्यात शेतात मजुरी करण्यास जाण्याची त्याला गळ घातली.

दोघांच्या प्रेम विवाहानंतर काळ पुढे सरकू लागला. दोघांच्या संसार वेलीवर एक मुलगा व एक मुलगी अशी गोंडस मुले व देवाघरची फुले उमलली.  ट्रॅक्टर चालवून मिळणा-या उत्पन्नातून तो आपल्या परिवाराचा चरितार्थ चालवत होता. तसे बघता दिलीपचे एक सुखी चौकोनी कुटूंब होते. पत्नी संगितासह एक मुलगा व एक मुलगी असा त्याचा सुखी परिवार होता. “हम दो हमारे दो” या घोषवाक्याप्रमाणे सुखी संसाराचा गाडा ओढण्यासाठी दोघे पती पत्नी मोलमजुरी करत होते.

सर्व काही सुरळीत सुरु असतांना का कुणास ठाऊक, दिलीप यास काय अवदसा आठवली कोण जाणे? तो पत्नी संगीतावर चारित्र्याचा संशय घेऊ लागला. पत्नी संगिताचे कुणासोबत तरी अफेयर असल्याची त्याला शंका येऊ लागली. ती शेजारी कुणाकडे बसली तरी त्याला तिच्या चारित्र्यावर संशय येऊ लागला. ती फोनवर बोलतांना दिसली तरी त्याच्या मनात तिच्या चारित्र्याविषयी शंका येऊ लागली. त्याच्या या शंकेचे समाधान काही केल्या होत नव्हते. त्याच्या शंकेचे रुपांतर गडद संशयात होण्यात वेळ लागला नाही. संशयाला औषध नसते असे म्हणतात. संशयी व्यक्तीला कुणी कितीही समजावले वा त्याच्या मनातील संशयाचे भुत काढण्याचा प्रयत्न केला तरी ते भुत सहजासहजी आपली जागा सोडत नाही. पत्नी संगीताच्या चारित्र्याबाबतच्या संशयाने त्याच्या मनात घर निर्माण केले होते. संशयाच्या भुताने त्याचे मन दिवसेंदिवस पोखरुन निघाले. दिवसरात्र त्याच्या मनात संशयाचे विचार थैमान घालत होते. ट्रॅक्टरवर कामाला गेल्यानंतर त्याच्या मनात घरी संगिता काय करत असेल? ती कुणासोबत बोलत असेल? हेच विचार त्याच्या मनात घोळत होते. संशयाच्या नजरेतून संगिताकडे बघणा-या दिलीपला तिच्या वागण्यासह बोलण्यात बदल जाणवत होता. आधीच दारुचे व्यसन असलेला दिलीप या संशयातून जास्त प्रमाणात दारु प्राशन करु लागला. दारुच्या नशेत तो तिच्यासोबत वाद घालत असे. दोन्ही निरागस मुले आईबापाचा रोजचा वाद बघण्याशिवाय काही करु शकत नव्हती. दारुच्या नशेत घरी आल्यावर दिलीपने संगिताला मारहाण करण्यास सुरुवात केली होती.

अखेर दिलीपच्या जिवनातील ती काळरात्र आली. या काळरात्री दिलीपच्या जिवनाचा अंत समीप आला. पत्नीच्याच हातून रात्रीच्या वेळी त्याचे मरण लिहीले होते. नेहमीप्रमाणे 6 एप्रील रोजी दिलीप घरी आला. घरी येतांना त्याने पिण्यासाठी सोबत दारु आणली होती. घरी आल्यानंतर त्याने संगिताच्या चारित्र्यावर शाब्दिक चिखलफेक करण्यास सुरुवात केली. त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत संगिताने स्वयंपाक तयार केला. दरम्यान दारु प्राशन केल्यानंतर सर्वजण जेवण करण्यास बसले. जेवण सुरु असतांना देखील तो तिच्या चारित्र्यावर संशय घेत  वाद घालत होता. अर्धे जेवण बाकी असतांना तो संतापाच्या भरात ताटावरुन उठला व त्याने हात धुतला. तिला शिवीगाळ करत त्याने तिच्या मानेवर लाथ मारुन त्याने तिला मारुन टाकण्याची धमकी देत मारहाण सुरु केली. या रात्री दोघा पती पत्नीत कडाक्याचे भांडण सुरु झाले. रात्रीचे साडे अकरा वाजले तरी चारित्र्याच्या संशयावरुन दिलीप त्याची पत्नी संगितासोबत वाद घालतच होता. संगीता आपला बचाव करण्यासाठी त्याचे आरोप फेटाळून लावत होती. दोघांचा नेहमीचा वाद समजून बिचारी दोन्ही मुले झोपी गेली.

दारुच्या नशेत बराच वेळ वाद घातल्यानंतर दिलीप खाटेवर झोपला. दिलीप व त्याची दोन्ही मुले झोपली असली तरी संगिता मात्र जागीच होती. तिच्या मनात दिलीप विषयी चिड निर्माण झाली होती. चारित्र्याचा झालेला आरोप तिला काही केल्या झोपू देत नव्हता. झोप तिच्यापासून शेकडो मैल दुर पळाली होती. दिलीप दारुच्या नशेत असल्यामुळे आज झोपेतच त्याच्या जिवनाचा शेवट करायचा हे तिने मनाशी ठरवले. दिलीप कायमचा झोपला म्हणजे आपल्यावर होणा-या रोजच्या आरोपाला पुर्णविराम लागेल असे तिने मनाशी ठरवले. त्यादृष्टीने ती कामाला लागली. दिलीप झोपेत असल्याची संधी साधत तिने घरातील दोरी बाहेर काढली. त्या दोरीने त्याच्या गळ्याला करकचून फास देण्यास तिने सुरुवात केली. बघता बघता दोरीचा फास जसा त्याच्या गळ्याभोवती आवळला गेला तसतसा तो यमाच्या दाराजवळ जाऊ लागला. गळा आवळला जात असतांना त्याचा श्वास कोंडला गेला. त्यामुळे होणा-या यातना त्याला अस्वस्थ करु लागल्या. जिवाच्या आकांतामुळे तो जोरजोरात पाय झटकत आरडाओरड करु लागला. गळा आवळला जात असल्यामुळे त्याच्या हातांची प्रतिकारशक्ती देखील क्षीण झाली. अखेर त्याने आपला जिव सोडला. त्याची आरडाओरड व हालचाल पुढील काही क्षणात कायमची थांबली.

दिलीप कायमचा देवाघरी गेल्याचे लक्षात आल्यानंतर संगिताने ती दोरी लागलीच लपवली. या घटनेच्या वेळी दिलीपची जिवाच्या आकांताने होणारी आरडाओरड व हालचाल बघून व ऐकून दिलीपचा पाच वर्षाचा मुलगा यश जागा झाला होता. समोरचे दृश्य बघून तो मनातून पार हादरला. त्याची आई संगिता दोरीने दिलीपचा गळा आवळत होती. काही वेळातच दिलीपची तडफड शांत झाली. आपल्या आईनेच आपल्या वडीलांचा जिव घेतल्याचा घटनेचा पाच वर्षाचा यश साक्षीदार होता. दिलीप कायमचा झोपला मात्र संगिताची झोप मात्र पार उडाली होती. ती जागीच होती. आपल्या वडीलांची आपल्या नजरेसमोर झालेली हत्या बघून यश मनातून खुप घाबरला होता. हा प्रसंग त्याच्या जिवनातील एक दुर्दैवी क्षण होता. तो प्रसंग त्याच्या मनात कायमचा कोरला गेला.

दिलीप मरण पावल्यानंतर संगिताने जोरजोरात रडण्यास सुरुवात केली. शेजारी पाजारी राहणा-या महिलांना व नातेवाईकांना तिने आपला पती अजिबात हालचाल करत नसल्याचे सांगत रडण्यास सुरुवात केली. तिच्या जोरजोरात रडण्यामुळे गावातील शेजारीपाजारी राहणा-या महिला व काही लोक दिलीपच्या घराजवळ एकत्र जमले. दरम्यान गावातील शंकर या नातेवाईकाने हा प्रकार त्याची बहिण कल्पना जाधव हिला कळवला. मयत दिलीप हा नात्याने कल्पना जाधवचा भाचा होता. आपल्या भाच्याला काय झाले हे बघण्यासाठी ती तातडीने भाऊ शंकरसोबत दिलीपच्या घरी पोहोचली. 

7 तारखेच्या सुरुवातीला मध्यरात्री जवळपास दीड वाजता भाचा दिलीप यास बघण्यासाठी कल्पना जाधव त्याच्या घरी आली. गावातील इतर महिलांनी त्याठिकाणी गर्दी केली होती. कल्पना जाधव या महिलेने गावातील इतर महिलांसह दिलीपच्या जवळ जाऊन त्याला हाक मारली. दिलीप उठ…. दिलीप काय झाले तुला………असे म्हणत तिने पालथा पडलेल्या दिलीपला उठवण्याचा प्रयत्न केला. मात्र तिचा भाचा दिलीप कायमचा देवाघरी गेला होता. दिलीपला साप चावला असेल अशी मनाची समजूत करत ती घराबाहेर आली.

त्यावेळी दिलीपचा पाच वर्षाचा मोठा मुलगा यश याने कल्पना जाधवचा हात धरुन तिला म्हटले की पप्पांना साप चावला नसून आईनेच त्यांचा दोरीने गळा आवळला आहे. त्यामुळे पप्पांचा मृत्यू झाला आहे. आपल्या भाच्याचा दोरीने गळा आवळल्याने मृत्यू झाला असल्याचे समजताच कल्पना जाधव संतापली. ती पुन्हा इतर महिलांसह घरात गेली. तिने दिलीप यास निरखून पाहिले असता त्याच्या गळ्याजवळ आवळल्याचे व्रण दिसून आले. त्याच्या कानातून रक्त वहात असल्याचे दिसून आले. तिने संगिताला खडसावत स्पष्टपणे विचारले की खरा प्रकार काय आहे ते आम्हाला सांग.  त्यावर काही प्रमाणात नरमलेल्या संगिताने संतापलेल्या कल्पना जाधवला सांगितले की माझा नवरा दिलीप मला नेहमी पाप लावत असे. माझ्या चारित्र्यावर संशय घेत माझ्याशी भांडण करत होता. काल रात्री देखील आमच्यात कडाक्याचे भांडण झाले. भांडणानंतर दारुच्या नशेतील दिलीप झोपल्याचे बघून मी सहज त्याचा दोरीने गळा आवळला. त्यात तो मरण पावल्याचे संगिताने कल्पना जाधवला सांगितले.

या घटनेप्रकरणी कल्पना जाधव हिने दिलेल्या फिर्यादीनुसार संगिता दिलीप सोनवणे हिच्याविरुद्ध जामनेर पोलिस स्टेशनला खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. सदर गुन्हा भाग 5 गु.र.न.108/21 भा.द.वि. 302 नुसार दाखल करण्यात आला. चारित्र्याचा संशय घेणा-या पतीचा दोरीने गळा आवळून खून केल्याचा आरोप असलेल्या संगिताला अटक करण्यात आली. संशयीत संगिताला न्या. एम. एम. चितळे यांच्या न्यायालयात हजर केले असता एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. सरकारतर्फे कृतिका भट यांनी न्यायालयीन कामकाज पाहिले. पाचोरा उप विभागाचे डिवायएसपी भरत काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि. प्रताप इंगळे व त्यांचे सहकारी हे.कॉ. रमेश कुमावत, पोलिस नाईक हंसराज वाघ, विलास चव्हाण, महिला पोलिस कर्मचारी अलका माळी, नन्नवरे, आदींनी तपासकामात सहभाग घेतला.   

पोलिस कोठडीत असतांना संशयीत संगीताने आपला गुन्हा कबुल केला. या घटनेमुळे दिलीप व संगिता यांची दोन्ही मुले उघड्यावर पडली आहेत. वडील देवाघरी तर आई जेलमधे गेल्यामुळे दोन्ही मुलांच्या भवितव्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सध्या दोन्ही मुलांचा सांभाळ नातेवाईक करत असल्याचे समजते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here