ग्राहक महिलेचा आधी खून नंतर बलात्कार तपासात गजाआड झाला विकृत दुकानदार

बुरखाधारी संशयित आरोपी व तपास पथक

मयत नगिना

नालासोपारा :  कोरोना विषाणूसोबत लढण्यासाठी सरकारने लॉकडाऊनची प्रक्रीया राबवली. अजूनही देशाच्या विविध भागात कमी अधिक प्रमाणात लॉकडाऊन सुरुच आहे. कोरोनासोबत लढता लढता अनेकांचा रोजगार हिरावला गेला आहे. त्यामुळे साहजीकच मनुष्याचे मानसिक संतुलन बिघडून तो कमी अधिक प्रमाणात चिडचिड करु लागला आहे. त्याच्या हातून काही दुर्दैवी घटना देखील घडत आहेत.

लॉकडाऊनमुळे आर्थिक स्थिती दोलायमान झालेल्या मनुष्याला कुणी डिवचले तर त्याचा कधी कधी तोल देखील जातो. मनस्थिती बिघडलेल्या मनुष्याच्या जागी कधी कधी हैवान तयार होतो. हा हैवान मनुष्याला चुकीचे कृत्य करायला देखील भाग पाडतो.

दुकानदार आणि ग्राहक यांच्यात आर्थिक व्यवहाराचे नाते असते. किमतीवरुन घासाघीस होण्याचा प्रकार दुकानदार आणि ग्राहक यांना नवा नसून तो जगजाहीर आहे. नालासोपारा (पुर्व) येथील झालावाड पार्क येथे गेल्या महिन्याच्या अखेरीस दुकानदाराकडून एका ग्राहक महिलेचा खून झाला.

कॉस्मेटीक दुकानात खरेदीसाठी आलेल्या महिलेचा दुकानदारासोबत किमतीवरुन वाद झाला. हा वाद वाढत गेला. त्यामुळे ग्राहक महिला व दुकानदार यांच्यात शाब्दिक चकमक झाली. दुकानदार ग्राहक महिलेवर प्रचंड चिडला. संतापाच्या भरात त्याने तिचे केस धरुन तिला दुकानाच्या आतील आडोशाकडे फरफटत नेले.

गळा दाबून चाकूचे वार करत त्याने तिची हत्या केली. तो एवढ्यावरच थांबला नाही तर मृत महिसेसोबत त्याने रात्रभर लैंगीक अत्याचार देखील केला. मन सुन्न करणा-या खूनाच्या या घटनेने वसई, विरार व नालासोपारा परिसरात खळबळ माजली होती.

नालासोपारा येथील संयुक्त नगर परिसरात नगीना आशिष जाधव ही महिला रहात होती. 26 जून रोजी ती कॉस्मेटीक सामान व मुलांसाठी खेळणी खरेदीसाठी घरातून बाहेर पडली होती. घरातून बाहेर गेलेली नगीना त्यानंतर घरी परतलीच नाही.

त्यामुळे दुध विक्रेता असलेला तिचा पती हवालदिल झाला. सर्वत्र शोधाशोध केल्यानंतर देखील तिचा शोध लागला नाही. अखेर त्याने नजिकचे तुळींग (नालासोपारा पुर्व) पोलिस स्टेशन गाठले. ती हरवल्याबाबत त्याने  मिसींग दाखल केली. या मिसींगचा तपास सुरु होता, मात्र तिचा कुठेही शोध लागत नव्हता. तिचा पती व नातेवाईक देखील आपल्या पातळीवर बेपत्ता नगीनाचा शोध घेतच होते.

दरम्यान 28 जून रोजी चंदन नाका भागातील एका बंद पिक अप टेंपोत प्लास्टीकच्या पोत्यात एका महिलेचा मृतदेह आढळून आला. दोन दिवसांनी या टेंपोमधून दुर्गंधी पसरण्यास सुरुवात झाली. टेंपो मालकाने ही बाब टेंपो युनीयनचे अध्यक्ष श्रीधर पाटेकर यांना कळवली. त्यांनी लागलीच पोलिसांना कळवले.

पोलिसांनी घटनास्थळी येवून पाहणी व कायदेशीर कारवाईला सुरुवात केली. टेंपो मालकाचा शोध घेवून त्यास विचारणा करण्यात आली. त्याने पोलिसांना सांगीतले की हा टेंपो गेल्या खुप दिवसांपासून शेडमधे रिकामा उभा आहे. त्यामुळे आपल्याला या मृतदेहाबद्दल काही सांगता येणार नाही. 

वसई युनिट पालघर क्राईम ब्रॅंचने समांतर पातळीवर या गुन्हयाचा तपास सुरु केला होता. या मृतदेहाबाबत घटनेचा कुठलाही पुरावा नव्हता. मृत महिलेचे वर्णन तुळींग पोलिस स्टेशनला दाखल मिसींग मधील महिलेच्या वर्णनासोबत तंतोतंत जुळत होते. त्यामुळे आढळून आलेल्या महिलेचा मृतदेह तिच्या पतीला दाखवण्यात आला.

त्याने ती आपली पत्नी नगीना असल्याचे ओळखले. मयत महिलेची ओळख पटली होती व मिसींगचा तपास देखील लागला होता. मात्र नगिनाची हत्या कुणी व का केली याचा तपास लागणे बाकी होते. पोलिसांनी मोठ्या शिताफीने कुठलाही ठोस पुरावा नसतांना या गुन्हयाची उकल करण्यात यश मिळवले.

हे ही वाचा सहकारी महिलेस लग्नाचे अमिष दाखवत लैंगिक अत्याचार

पोलिसांनी नालासोपारा परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यात प्रेम नॉव्हेल्टी कॉस्मेटीक गिफ्ट या दुकानाचे लोकेशन उघड झाले. त्या अनुशंगाने या दुकानाचा मालक शिवा चौधरी यास चौकशीकामी ताब्यात घेण्यात आले. सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे देण्यास सुरुवात केली.

मात्र त्याला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने आपला गुन्हा कबुल केला. गुन्हा कबुल केल्यानंतर त्याला अटक करण्यात आली.

घटनेच्या दिवशी नगिना जाधव ही महिला या दुकानात कॉस्मेटीक खरेदीसाठी गेली होती. वस्तूच्या किमतीवरुन तिचा शिवा चौधरी या दुकानदारासोबत वाद व घासाघिस झाली. हा वाद आणि घासाघिस वाढत गेली. त्यामुळे चिडलेल्या शिवाने नगिनाचे केस धरुन तिला दुकानाच्या आतील स्पेस मधे ओढत नेले. त्याने तिचा अगोदर गळा दाबला.

त्यानंतर तिच्यावर चाकूचे वार करत तिला जिवे ठार केले. चिडलेला शिवा चौधरी एवढ्यावरच थांबला नाही. त्याने मृत नगीनावर बलात्कार देखील केला. हे दुष्कृत्य केल्यावर त्याने तिचा मृतदेह प्लास्टीकचा पोत्यात भरुन परिसरातील पार्कींगमधील एका टेंपोमधे नेवून टाकला. शव विच्छेदन अहवालात मयत नगीनावर बलात्कार झाल्याचे उघडकीस आले.

अशा प्रकारे शिवा चौधरी याने आपला गुन्हा कबुल करतांना सर्व घटनाक्रम पोलिसांजवळ कथन केला. या प्रकरणी तुळींग पोलिस स्टेशनचे पोलिस अधिकारी व कर्मचारी तपास करत आहेत.    

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here