जळगाव : जळगाव येथील रामानंद नगर पोलिस स्टेशनला दाखल गुन्ह्यातील संशयीत आरोपी व नंदुरबार पोलिस दलात कार्यरत महिला पोलिस कर्मचा-याचा कोरोना पॉझीटीव्ह अहवाल आला आहे. असे असतांना देखील सदर महिला पोलिस कर्मचा-याने मुक्त संचार केल्याबाबत एकाने विचारणा केली असता उलट त्यालाच शाब्दीक फटकेबाजी करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सदर व्यक्तीने याप्रकरणी नंदुरबार शहर पोलिस निरीक्षकांकडे तक्रार केली आहे. कोरोना पॉझीटीव्ह अहवाल असतांना अशा प्रकारे मुक्तपणे वावर केल्यामुळे समाजात चुकीचा संदेश जात असल्याचे या निमीत्ताने म्हटले जात आहे.
जळगाव येथील एका तरुणीचा नंदुरबार येथील तरुणासोबत सन 2018 मधे विवाह झाला होता. लग्नानंतर सदर विवाहीत तरुणी नंदुरबार येथे नांदण्यास गेली होती. दरम्यान आपल्या पतीचे या महिला पोलिस कर्मचा-यासमवेत प्रेमसंबंध असल्याचे तिला समजले. या विषयावरुन पती पत्नीत वाद निर्माण झाले. याप्रकरणी जळगाव रामानंद नगर पोलिस स्टेशनला रितसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील आरोप असलेली नंदुरबार पोलिस दलातील महिला पोलिस कर्मचा-याचा अहवाल कोरोना पॉझीटीव्ह आला असतांना नंदुरबार शहरात मुक्त संचार कसा काय होतो याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.