जळगाव : जळगाव शनीपेठ पोलिस स्टेशन हद्दीतील चौगुले प्लॉट परिसरात दोन गटातील वादातून गोळीबाराची घटना घडली होती. या घटनेप्रकरणी शनीपेठ पोलिस स्टेशनला आर्म अॅक्टसह विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेत गोळीबार करणारा विजय जयवंत शिंदे हा पोलिसांना हवा होता. पोलिस पथक त्याच्या मागावर होते.
स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली हे.कॉ. विजयसिंग पाटील, सुधाकर अंभोरे, जितेंद्र पाटील, पो.नाईक नितीन बाविस्कर, राहुल पाटील, प्रितम पाटील, पितांबर पाटील यांनी अमोदा, घार्डी, मितावली, भोकर, पाळधी, अशा विविध भागात त्याचा माग काढला. अखेर तो पाळधी येथील साईबाबा मंदीर परिसरात लपून बसला असल्याच्या गुप्त माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला शिताफीने ताब्यात घेत अटक करण्यात यश मिळवले. पळून जाण्याच्या बेतात असलेला विजय शिंदे यास वेळीच ताब्यात घेतल्यानंतर पथकाने त्याला पुढील तपासकामी शनीपेठ पोलिस स्टेशनच्या ताब्यात दिले आहे.