बुलढाणा : नांदुरा येथील तलाठी अनिल अंभोरे यांनी आज सकाळी नऊ वाजता तहसील कार्यालयाच्या बाथरुममधे गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार तलाठी अनिल अंभोरे हे आज सकाळी विमनस्क अवस्थेत घराबाहेर पडले होते. एका वाहन चालकास त्यांनी चाकूचा धाक दाखवत थांबवून नांदुरा तहसील कार्यालयात पोहचवण्यास भाग पाडले. त्या वाहन चालकाने त्यांना तहसील कार्यालयाच्या मुख्य गेटपर्यंत पोहचवले. सकाळची वेळ असल्यामुळे कर्मचा-यांची संख्या अतिशय कमी होती. तलाठी अंभोरे यांनी आल्या आल्या थेट तहसीलदारांच्या केबीनमधील बाथरुममधे प्रवेश केला. सोबत आणलेल्या दोरीचे एक टोक खिडकीला व दुसरे टोक स्वत:च्या गळ्याला बांधून आत्महत्या केली.
दरम्यान या घटनेचे वृत्त समजताच नांदुरा शहरात खळबळ माजली. मयत तलाठी अनिल अंभोरे यांच्याबद्दल कामाच्या बाबतीत शेतकरी वर्गाच्या ब-याच तक्रारी असल्याचे लोकांच्या चर्चेतून उघड झाले. जनतेच्या कामात ते दुर्लक्ष करत होते असे समजते. भाड्याच्या घरात राहणारे अंभोरे यांचे मुळगाव घाटबोरी ता. मेहकर होते.