नंदुरबार : चारा वाहून नेणा-या वाहनात अडीच लाख रुपयांच्या दारुसाठ्याची वाहतुक केल्याप्रकरणी चाळीसगावच्या चालकास नंदुरबार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. उल्हास गोसावी असे अटकेतील चालकाचे नाव आहे.
नंदुरबार येथील धुळे चौफुलीवर उल्हास गोसावीच्या ताब्यातील ट्रकची तपासणी केली असता हा प्रकार उघडकीस आला. चा-याच्या ट्रकमधे अवैधरित्या वाहून नेत असलेल्या या दारु साठ्याची किंमत 8 लाख 49 हजार 600 रुपये एवढी आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजयसिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली सायंकाळी पाच वाजता सदर कारवाई करण्यात आली. संशयास्पदरित्या आढळून आलेल्या या ट्रकमधे 1 लाख 77 हजार 216 रुपये किंमतीच्या 180 मि.ली. च्या 3 हजार 408 टॅन्गो पंच देशी दारुच्या बाटल्या, 72 हजार 384 रुपये किंमतीच्या 1 हजार 392 संत्रा देशी दारुच्या बाटल्या असा मुद्देमाल आढळून आला. वाहनासह दारुचा साठा असा एकुण 2 लाख 49 हजार 600 रुपये किमतीच्या मुद्देमालासह चालक उल्हास गोसावी यास नंदुरबार शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. त्याच्या विरुद्ध शहर पोलिस स्टेशनला रितसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.