औरंगाबाद : औरंगाबाद येथील सरकारी दवाखान्यातील रेमडेसिवीर इंजेक्शनची चोरी करुन जादा दराने खरेदी विक्री करणा-या तिघा भामट्यांना पुंडलीक नगर पोलिसांच्या पथकाने शिताफीने अटक केली आहे. या टोळीत दवाखान्यातील शिपायाचा देखील सहभाग असल्याचे उघड झाले आहे. चोरुन लपून रेमडेसिवीर इंजेक्शनच साठा गायब करुन तो काळ्या बाजारात जादा दराने विक्री करणारी टोळी असल्याचे या निमीत्ताने उघड झाले आहे.
चोरी केलेले रेमडेसिवीर इंजेक्शन खरेदी करणा-या दोघा मेडीकल दुकानदारांचा या तिघांमधे समावेश आहे. एक इंजेक्शन 15 हजार रुपयांना काळ्या बाजारात विक्री होत असल्याची माहीती पुढे आली आहे. सापळा रचून तिघांच्या टोळीला शिताफीने अटक करण्यात पोलिस पथकाला यश आले आहे. डॉक्टरांचे कुठलेही प्रिस्क्रीप्शन नसतांना हा प्रकार सुरु होता. अनिल बोहते असे अटक करण्यात आलेल्या घाटी रुग्णालयातील चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्याचे नाव असून त्याच्यासह मंदार भालेराव आणि अभिजीत तौर या दोघा मेडिकल चालकांना अटक करण्यात आली आहे.