एक दिवसाच्या नातूची मृत्यूशी झुंज – मुलासह वडिलांचा मृत्यू

On: April 20, 2021 9:09 AM

गोंदेगाव ता.सोयगाव (वार्ताहर) : हसत्‍या खेळत्‍या परिवाराला कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने गाठले आणि कुटुंबावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला. एकुलत्या एक मुलासह वडिलांचा मृत्यू, तर एका दिवसांचा जन्मलेला मुलगा मृत्यूशी झुंज देत असल्याची मन सुन्न करणारी घटना तितुर (ता.सोयगाव) येथे रविवारी (18 एप्रिल) घडली. वडील भगवान पंडीत खैरनार (56), मुलगा राहुल भगवान खैरनार (30) रा.तितुर अशी मृतांची नावे आहेत. या घटनेने गावावर शोककळा पसरली आहे. सोयगाव तालुक्यात कोरोनाचे संक्रमण वाढत असून दिवसेंदिवस रुग्णांमध्ये वाढ होत आहे. या तालुक्यातील रुग्णसंख्येने तिनशेचा टप्पा पार केला असून मृत्यूदर देखील वाढला आहे. गोंदेगाव येथील चौघे तर हनुमंतखेडा येथील आठ जणांचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाला आहे.

तितुर येथील एकाच कुटुंबातील दोघा जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. तितुर येथील भगवान पंडीत खैरनार (55) यांना कोरोनाची लागण झाल्याने त्यांना वैद्यकीय उपचारार्थ पाचोरा येथील कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले होते. परंतु दोन दिवसांपुर्वी त्याचे निधन झाले. त्यानंतर संसर्गामुळे मुलास देखील कोरोना झाला. त्याला प्रथम उपचारासाठी पाचोरा व नंतर चाळीसगाव येथे दाखल करण्यात आले. परंतु प्रकृती जास्त खराब असल्याने औरंगाबाद येथे घेऊन जात असताना सोमवारी (19 एप्रिल) पहाटे राहुलचा देखील मृत्यु झाला. अवघ्या दोन दिवसांत पिता पुत्राचा कोरोनाने बळी घेतल्याने खैरनार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

त्यातच राहुलच्या पत्नीस रविवारी (18) प्रसुतीसाठी पाचोरा येथील दवाखान्यात दाखल करण्यात आले असता एका गोंडस मुलास जन्म दिला. परंतु नियतीला काही वेगळेच मान्य होते. मुलास जन्मताच ऑक्सिजन पुरवठा आवश्यक होता. मात्र पाचोरा येथील एकाही रुग्णालयात ऑक्सिजन सिलेंडर उपलब्ध नसल्याने नजीकच्या चाळीसगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिथे एक दिवसाचे बाळ मृत्यूशी झुंज देत आहे. तर सासरा, पती आणि मुलाच्या विरहाने पत्नीची देखील तब्येत खालवली असुन तिच्यावर उपचार सुरु आहेत. तितुर येथे गेल्या वर्षी अवघे तीन जण कोरोना बाधित होते. तर दुसऱ्या लाटेने तर संपुर्ण गावावर वर्कदुष्टी पडली पडल्याने सात जणांचा मृत्यु झाला असून पन्नास जण कोरोनाशी झुंज देत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment