पुणे : लॉकडाऊन काळात प्रत्येक शहरात नाकाबंदी करण्यात आली आहे. कोरोनाचा वाढता प्रभाव कमी करण्यासाठी संचारबंदीचे नियम राबवण्यासाठी पोलिस रस्त्यावर उतरले आहेत. या तणावाच्या वातावरणात पुणे येथे दोघा पोलिसात तुंबळ हाणामारी प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या भोसरी पोलिस स्टेशन हद्दीत हा प्रकार घडला आहे.
दापोडी हॅरिश पुलाजवळ नाकाबंदी सुरु होती. या नाकाबंदीच्या वेळी पोलिस कर्मचारी सुरज पवार आलेले नव्हते. त्यामुळे ड्युटीवरील कर्मचारी किसन गराडे यांनी सुरज पवार या कर्मचा-यास फोन करुन नाकाबंदीसाठी येण्यास सांगितले. त्यावेळी पलीकडून सुरज पवार यांनी फोन करणारे किसन गराडे यांना अतिशय उद्धट भाषेत शिवीगाळ सुरु केली. तु माझा बाप आहेस का? तु मला सांगणारा कोण आहे. अशी भाषा सुरज पवार या कर्मचा-याने सुरु केली. काहीवेळाने सुरज पवार हा कर्मचारी नाकाबंदीच्या ठिकाणी हातत गज घेऊन आला. त्याने हातातील गजाने किसन गराडे यास मारहाण करत खाली पाडले व लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. या प्रकरणी सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी सुरज पवार याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.