जळगाव : शेव चिवडा आणि जलेबी तयार करुन विक्री करणारा देवीदास नामदेव श्रीनाथ हा हलवाई होता. जळगाव नजीक कुसुंबा या गावी तो राहण्यास आला होता. शेगाव येथील मुळ रहिवासी असलेल्या देवीदासवर शेगाव येथे फसवणूकीचा गुन्हा दाखल असल्याचे समजते. शेगाव सोडून आलेला देवीदास कमी अधिक प्रमाणात गुन्हेगारी प्रवृत्तीचा असल्याचे त्याची देहबोली सांगत असे. जळगाव नजीक कुसुंबा या गावी जलेबी आणि शेवचिवडा विक्री करुन तो आपल्या परिवाराचा चरितार्थ चालवत होता. देवीदास जलेबीवाला या नावाने तो परिसरात प्रसिद्ध होता.
तो रहात असलेल्या कुसुंबा या गावातच अरुणा गजानन वारंगणे ही महिला रहात होती. ती देवीदासकडे शेव चिवडा विकत घेण्यासाठी नेहमी येत होती. काही दिवसातच ती त्याची नियमीत ग्राहक झाली. तिच्या नेहमीच्या शेवचिवडा खरेदीमुळे देवीदासचा तिच्यासोबत चांगला परिचय झाला होता. या परिचयातून त्याने तिला बहिण मानली. या परिचयातून दोघांमधे लवकरच घरोब्याचे संबंध निर्माण झाले.
अरुणाप्रमाणेच एक महिला देखील देवीदासकडे शेवचिवडा व जलेबी घेण्यासाठी नियमीतपणे येत होती. ती महिला देखील देवीदासची नियमीत ग्राहक झाली होती. त्या ग्राहक महिलेचा एक प्रियकर होता. सुधाकर रामलाल पाटील असे त्याचे नाव होते. त्या ग्राहक महिलेच्या माध्यमातून जलेबीवाला देवीदास श्रीनाथ याचा सुधाकर पाटील सोबत देखील परिचय झाला. जलेबी विक्रीच्या माध्यमातून देवीदासचा अरुणाबाई वारंगणे व सुधाकर पाटील या दोघांसोबत चांगला परिचय झाला व संपर्क देखील वाढला.
अरुणा वारंगणे हिच्या ओळखीची एक विवाहीत महिला होती. आशा मुरलीधर पाटील असे तिचे नाव होते. आशा पाटील व तिचा पती मुरलीधर पाटील हे दोघे एमआयडीसी परिसरातील ओमसाई नगरात असलेल्या स्वामी समर्थ शाळेच्या मागे एका दुमजली इमारतीत रहात होते. पाटील दाम्पत्यावर माता लक्ष्मीची असिम कृपा होती. त्यामुळे त्यांचेकडे धनसंचय चांगल्या प्रमाणात जमला होता. आशा पाटील या महिलेच्या अंगावर सोन्याच्या दागिन्यांची रेलचेल रहात होती. जणूकाही एखाद्या महाराणीप्रमाणे तिची वट अर्थात थाट होता. व्याजाने पैसे देण्याचे काम ती करत होती. कुणी व्याजाचा हप्ता वेळेवर दिला नाही म्हणजे तिच्या मुखाचा पट्टा सुरु होत असे. कधी कधी ती बळाचा देखील वापर करत असे. त्यामुळे तिच्याकडून व्याजाने पैसे घेऊन जाणारे शक्यतो तिचा हप्ता तिला वेळेवर देऊन टाकत होते. तिचा पती एका इस्टेट ब्रोकर कडे कामाला होता. त्याला त्या ब्रोकरच्या माध्यमातून कमीशनचे चांगले पैसे मिळत होते. एकंदरीत या पाटील दाम्पत्याचे बरे चालले होते. भव्य आणि टोलेजंग दुमजली इमारतीत हे पाटील दाम्पत्य रहात होते. त्यांच्या दोघा मुलींचे लग्न झाल्यामुळे त्या आपल्या सासरी सुखाने रहात आहेत.
सुधाकरच्या प्रेयसीने आशाबाईकडून काही रकमेचे कर्ज घेतले होते. त्या कर्जाची परतफेड करण्यात त्याची प्रेयसी मागे पडली होती. त्यामुळे आशाबाईने तिला एकदा मारहाण केली होती. तिने हा प्रकार सुधाकरच्या कानावर टाकला होता. आपल्या प्रेयसीवर हात उचलणा-या आशाबाईबद्दल सुधाकरच्या मनात चिड निर्माण झाली होती. त्यामुळे आशाबाईला कधी संधी मिळाली तर चांगली अद्दल घडवायची असे सुधाकरने ठरवले होते.
अरुणा वारंगणे हिने देखील आशाबाईकडून लाखो रुपयांचे कर्ज मासिक व्याजाने घेतले होते. अरुणा ही आशाबाईचे दोन लाख रुपये देणे लागत होती. दोन लाख रुपयांची परतफेड करतांना कधी कधी अरुणाला नाकेनऊ येत होते. कर्जाचा हप्ता देण्यास गेली म्हणजे तिला आशाबाईच्या अंगावरील सोन्याच्या दागिन्यांची रेलचेल दिसून येत होती. त्यामुळे तिच्या मनात त्या दागीन्यांची लालसा निर्माण झाली होती. आशाबाईला ठार केले व तिच्या अंगावरील दागीन्यांची लुट केली तर आपली कर्जातुन मुक्तता होईल व शिवाय दागिने व तिच्या घरातील रोकड देखील आपल्यास मिळेल असा कुविचार अरुणाच्या मनात चमकून गेला.
एके दिवशी नेहमीप्रमाणे ती जिलेबीवाला हलवाई देवीदास श्रीनाथ कडे गेली. तिने त्याच्यावर मोहाचा सापळा फेकला. हे बघ देवीदास भाऊ ……मी ज्या आशाबाईकडून कर्ज घेतले आहे तिच्या अंगावर भरपूर दागिने आहेत. शिवाय तिच्या घरात देखील मोठ्या प्रमाणात माल (रोकड) आहे. आपण तिला व तिच्या पतीला मारुन टाकू. दोघे पती पत्नी ठार झाले म्हणजे आपण मालामाल होऊन जाऊ. मला देखील कर्जातून मुक्ती मिळेल व मला देखील त्या मालातील हिस्सा मिळेल. त्यात माझा व तुझा दोघांचा फायदा आहे. बघ विचार कर….. असे म्हणत मोहाचा सापळा फेकून अरुणा त्याच्याकडून निघून गेली.
जिलेबी विक्रीचा चांगला सुखाचा व्यवसाय सुरु असतांना निव्वळ मोहाच्या सापळ्यात अडकून देवीदासने दुखा:कडे वाटचाल सुरु केली. त्याच्या मनात आशाबाई व तिचा पती मुरलीधर पाटील यांच्या हत्येसह लुटीचा विचार घोंघाऊ लागला. त्याच्या मनाची सुखाकडून दुखा:कडे वाटचाल सुरु झाली होती. त्याला अरुणा कारणीभूत असली तरी “मनाचा ब्रेक – उत्तम ब्रेक” हे घोषवाक्य देवीदास विसरला. दिवसरात्र त्याच्या मनात आशाबाई व मुरलीधर यांची हत्या, दागिने व पैसे हेच विचार सुरु होते. त्याचे जलेबी विक्रीच्या व्यवसायात मन लागत नव्हते. तो पुर्णपणे मोहाच्या सापळ्यात अडकला होता.
असाच मोहाचा सापळा अरुणाने सुधाकर पाटीलकडे देखील फेकला होता. आशाबाईकडे मोठ्या प्रमाणात माल (पैसे आणि दागिने) आहे. आपण तिला व तिच्या पतीला या जगातून बाद केले तर आपल्याला मोठ्या प्रमाणात माल मिळेल. यात अरुणाचा स्वार्थ असा होता की तिला आशा पाटीलचे कर्ज फेडण्याची कटकट बंद करायची होती. शिवाय तिला आशाबाईचे पैसे आणि दागिने देखील हवे होते. त्यामुळे तिने देवीदास व सुधाकर या दोघांना लाखो रुपयांसह दागदागीन्यांच्या मोहजालात फसवून आपला स्वार्थ साधण्याचा डाव आखला होता. सुधाकरच्या प्रेयसीने देखील आशा पाटील हिच्याकडून काही रकमेचे कर्ज घेतले होते. त्या कर्जाचा हप्ता चुकल्यामुळे आशाने तिला मारहाण देखील केली होती. त्यामुळे सुधाकरच्या मनात आशाबाईविषयी राग होताच. अशा प्रकारे अरुणाने देवीदास व सुधाकर या दोघांना मोहाच्या जाळ्यात अडकवून पाटील दाम्पत्याला ठार करुन लुटीचे नियोजन करण्याकामी जुंपले.
देवीदास व सुधाकर या दोघांनी अरुणाच्या मदतीने आशाबाई व मुरलीधर पाटील या दोघांना वेळोवेळी ठार करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यात त्यांना यश आले नाही. एके दिवशी संतापाच्या भरात अरुणाने देवीदास याला म्हटले की तुला काम जमत नाही. तुझ्याकडून काही काम होणार नाही असे मला एकंदरीत दिसते. त्यावर देवीदासने तिला म्हटले की होईल काम जरा धीर धर. अखेर तो दिवस जवळ आलाच ज्या दिवशी आशा पाटील व मुरलीधर पाटील यांची ती रात्र काळरात्र ठरली.
21 एप्रिल रोजी नेहमीप्रमाणे अरुणाचे टोमणे ऐकून त्रस्त झालेल्या देवीदासने तिला आज रात्री आपण जाऊ आणि काम करुनच टाकू असे म्हटले. फोनवर बोलणे झाल्याप्रमाणे अरुणा व देवीदास असे दोघे जण रात्री नऊ वाजता रायपूर फाट्याजवळ भेटले. रायपूर फाट्याजवळ भेटल्यानंतर दोघे जण मोटारसायकलने आशाबाईच्या घराकडे निघाले. रात्रीच्या वेळी आशाबाईच्या घराजवळ एक मोटारसायकल उभी असल्याचे दोघांनी पाहिले. आशाबाईला भेटण्यासाठी कुणीतरी आले असल्याचे दोघांनी ओळखले. त्यामुळे ती मोटारसायकल जाण्याची वाट बघत दोघे जण अंधारात आडोशाला लांब व निर्जन ठिकाणी उभे राहिले. मी सुधाकरला घेऊन येतो असे म्हणत अरुणाला अंधारात उभे करुन देवीदास निघून गेला. त्यावेळी सुधाकर घरीच होता. सुधाकरला जवळ बोलावून घेत देवीदासने त्याला म्हटले की आशाबाईकडे कुणीतरी आले आहे. तु अर्ध्या तासाने आशाबाईकडे ये. एवढे सांगून देवीदास पुन्हा अरुणाकडे आला. अरुणा अजुन अंधारातच आडोशाला ताटकळत उभी होती. ती मोटारसायकल आशाबाईच्या घराजवळ उभीच होती. त्यामुळे ती मोटारसायकल जाईपर्यंत दोघेजण ताटकळले होते. खुप वेळ वाट पाहिल्यानंतर एक जण आशाबाईच्या घरातून निघाला. त्याने ती मोटारसायकल घेत तेथुन प्रस्थान केले. त्यानंतर नियोजनानुसार अगोदर अरुणा एकटीच आशाबाईकडे गेली.
थोड्या वेळाने सुधाकर पाटील हा देखील आशाबाईच्या घराबाहेर त्याच्या मोटारसायकलने आला. आता ठरल्यानुसार देवीदास दुस-या क्रमांकाने आशाबाईच्या घरात गेला. त्यावेळी आशाबाई, तिचा पती मुरलीधर व अरुणा असे तिघे जण स्वयंपाक खोलीत गप्पा करत होते. देवीदास घरात आल्यानंतर आशाबाईचा पती मुरलीधर घराच्या गच्चीवर एकटाच निघून गेला. मुरलीधर गच्चीवर गेल्यानंतर देवीदास देखील त्याच्यापाठोपाठ गच्चीवर गेला. गच्चीवर मुरलीधर यास बोलण्यात गुंतवून ठेवत देवीदास मनातल्या मनात सुधाकर येण्याची वाट बघू लागला.
गच्चीवरुन सुधाकरच्या मोटारसायकलच्या हेडलाईटचा उजेड बघताच देवीदास पटकन खाली उतरला. दरम्यान मुरलीधर हा गच्चीवर एकटाच होता. त्याचवेळी सांडपाणी फेकण्यासाठी आशाबाई बाहेर आली असता तिचे लक्ष सुधाकरकडे गेले. तिने अरुणाला विचारले की हा इथे कशासाठी आला एवढ्या रात्री? त्यावर अरुणाने आशाबाईला खुलासा केला की त्याला व्याजाने पैसे हवे आहेत. सांडपाणी फेकल्यानंतर लागलीच आशाबाई घरात गेली. आशाबाई घरात जाताच देवीदासने सुधाकरला इशारा करत जिन्यातून गच्चीवर जाण्यास सांगितले. त्यावेळी घरातील स्वयंपाकघरात आशाबाई व अरुणा या दोघी जेवण करण्यास बसल्या होत्या. जेवणाची वेळ झालेली असल्यामुळे आशाबाईनेच अरुणाला जेवण करण्यास बसवून घेतले होते.
दरम्यान सुधाकरने आणलेली दोरी देवीदासने शिताफीने जिन्यात लपवली. पाण्याची बाटली सोबत घेत देवीदास गच्चीवर गेला. गच्चीवर तिघांचा मद्यप्राशनाचा कार्यक्रम असेल असे समजून आशाबाईने देवीदासकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर गच्चीवर मुरलीधरला गप्पा करण्यात व्यस्त ठेवत देवीदास हळूच जिन्यात आला. सुधाकरने आणलेली व जिन्यात लपवून ठेवलेली दोरी घेत देवीदास पुन्हा गच्चीवर आला. गच्चीच्या भिंतीवर दोरी ठेवल्यानंतर पुन्हा मुरलीधर यास गप्पा करण्यात गुंतवून ठेवण्यात आले.
थोड्या वेळाने काहीतरी निमीत्त करत अरुणा गच्चीवर आली. आता मुरलीधरला गच्चीवरुन थेट देवाघरीच पाठवायचे होते. अरुणा आल्याबरोबर मुरलीधरसोबत लाडाने बोलू लागली. त्याच्या गळ्यात हात टाकून पाहुणा ….पाहुणा असे म्हणत मी तुम्हाला फाशी देऊ का? असे अती लाडाने व गमतीने म्हणू लागली. अरुणाने मुरलीधरच्या गळ्यात हात टाकला असतांना हळूच त्याच्या गळ्याभोवती दोरीचा फासदेखील टाकण्यात आला. खालच्या घरात आशाबाई एकटी असतांना सर्वजण गच्चीवर होते. अरुणाच्या मदतीला देवीदास व सुधाकर हजर होते. बघता बघता अरुणाने मुरलीधरच्या गळ्याभोवती दोरीचा फास करकचून आवळण्यास सुरुवात केली. जसजसा मुरलीधरच्या गळ्याभोवती दोरीचा फास आवळण्यास सुरुवात झाली तसतसा मुरलीधर तडफडू लागला. जिवाच्या आकांताने त्याची तडफड पराकोटीला गेली असली तरी त्याचे मृत्यूपुढे काहीच चालले नाही. याचे कारण म्हणजे यमाच्या रुपात तिघे जण त्याचा दोरीने गळा आवळण्यास बसले होते. अखेर मुरलीधरची हालचाल शांत झाली. तो गच्चीवरुन थेट देवाघरी गेला. त्याच्य घराची गच्ची हेच त्याच्या जिवनाचे अंतिम स्थान ठरले होते. त्यानंतर काही झालेच नाही अशा अविर्भावात आशाबाईजवळ अरुणा येऊन थांबली. त्यावेळी आशाबाई मोबाईलवर कुणाशीतरी बोलत होती. त्याचवेळी सुधाकर हा स्वयंपाक खोलीच्या दरवाज्याजवळ लपला. आशाबाई मोबाईलवर बोलत असतांना देवीदासने अरुणाला गुपचूप दोरी दिली. अरुणाने ती दोरी हातात पाठीमागे लपवली.
स्वयंपाक खोलीत कोण आहे हे बघण्यासाठी आशाबाई बघण्याचा प्रयत्न करत असतांना अरुणाने तिच्या गळ्याभोवती दोरीचा फास टाकला. एकाच दोरीने पती पत्नीला मृत्यूच्या दाराशी नेण्याचा प्रयत्न तिघांनी सफल केला. गळ्याभोवती दोरीचा फास पडताच आशाबाईचा जिव गुदमरला. जिव वाचवण्यासाठी आशाबाई तडफड करु लागली. आशाबाईची तडफड लवकर शांत करण्यासाठी सुधाकरने तिच्या तोंडाशी उशी कोंबली. श्वास घेण्याची कोंडी झाल्यामुळे आशाबाईने देखील आपले प्राण सोडले. ती देखील पती मुरलीधर प्रमाणेच देवाघरी गेली.
अशा प्रकारे 21 व 22 एप्रिलच्या मध्यरात्री हा खूनी थरार झाला. आशाबाईची हालचाल कायमची शांत झाल्याचे लक्षात आल्यानंतर तिच्या कानातील सोन्याचे अलंकार, हातातील बांगड्या कटरने तोडून काढण्यात आल्या. घरातील कपाटातून सोन्याचा गळ्यातील हार व रोकड असा ऐवज तिघांनी काढून घेतला. आता आशाबाईच्या कर्जाचा हप्ता देण्याची अरुणाला आवश्यकता नव्हती. शिवाय या लुटीतील रकमेची व सोन्याच्या दागिन्यांचे हिस्से पडल्यानंतर आपल्याला लाभ होणार असल्याचे अरुणा मनातल्या मनात म्हणत होती.
दोघांची दोरीने गळा आवळून हत्या केल्यानंतर देवीदासने अरुणाला आपल्या मोटार सायकलवर बसवून घेतले. सुधाकर त्याच्या मोटारसायकलवर बसला. तिघांनी क्षणाचाही विलंब न करता मोटार सायकलने नेरी मार्गे चिंचखेडा गाठले. त्यावेळी 22 एप्रिलची सुरुवात झाली होती. चिंचखेडा गावातील एका केळीच्या शेतात अंधारातच तिघांनी रोख रकमेचे व सोन्याच्या दागिन्यांचे हिस्से वाटे केले. त्यानंतर सुधाकर पाटील त्याच्या मोटारसायकलने त्याच्या गावी चिंचखेडा येथे निघून गेला. देवीदासने अरुणाला सोबत घेत कुसुंबा गाठले.
मुरलीधर व आशाबाई या दाम्पत्यांचा गळा दाबून खून झाल्याची घटना 22 एप्रिलच्या सकाळी कुसुंबा गाव परिसरात पसरण्यास वेळ लागला नाही. या दुहेरी खूनाच्या घटनेची माहिती मिळताच पोलिस प्रशासन तात्काळ सतर्क झाले. पोलिस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे यांनी स्वत: लक्ष घालत अप्पर पोलिस अधिक्षक चंद्रकांत गवळी, सहायक पोलिस अधिक्षक कुमार चिंता, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले आदींना घटनास्थळी रवाना केले. घटनास्थळी श्वान पथकाला पाचारण करण्यात आले.
याप्रकरणी संतोष पुंडलीक पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार एमआयडीसी पोलिस स्टेशनला खूनासह जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. सदर गुन्हा एमआयडीसी पोलिस स्टेशनला भाग 5 गु.र.न. 240/21 भा.द.वि. 302, 392, 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा पुढील तपास एमआयडीसी पोलिस स्टेशनच्या अधिकारी कर्मचारी वर्गासह स्थानिक गुन्हे शाखेकडे समांतररित्या देण्यात आला.
दाम्पत्याच्या दुहेरी खूनासह जबरी चोरीचा तपास जणूकाही जळगाव पोलिस दलासाठी एक प्रतिष्ठेचा विषय झाला होता. हा तपास काहीही करुन लवकरात लवकर लागलाच पाहिजे या उद्देशाने स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. किरणकुमार बकाले व त्यांचे सहकारी लागले होते. एमआयडीसी पोलिस पथक देखील याप्रकरणी कसून कामाला लागले होते. स्थानिक गुन्हे शाखेचे जवळपास सात ते आठ पथके या कामी दिवसरात्र मेहनत घेत होते. प्रत्येक पथकाला वेगवेगळी तपास कामगीरी सोपवण्यात आली होती. त्यानुसार तपास करुन सायंकळी वा रात्री वरिष्ठांना अहवाल सादर केला जात होता. त्या अहवालानुसार तपासाची पुढील दिशा ठरवली जात होती.
स्थानिक गुन्हे शाखेसह एमआयडीसी पोलिसांचे पथक गोपनीय माहिती, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, रेकॉर्डवरील गुन्हेगार यासह तांत्रीक माहिती संकलीत करत होते. मयताची पार्श्वभुमी काय होती. मयताला अखेरचे कोणकोण भेटले होते. मयतांच्या संपर्कात कोण कोण होते? अशा एक ना अनेक बाबींची माहीती जमा करुन त्याची गोळाबेरीज करत करत तपास पुढे पुढे सरकत होता. अखेर स्थानिक गुन्हे शाखेसह एमआयडीसी पोलिसांच्या तपास पथकाने हाती घेतलेले काम प्रगतीपथावर जाऊ लागले. त्यामुळे वरिष्ठ पोलिस अधिका-यांच्या मनावर समाधानाची लकेर उमटण्यास सुरुवात झाली. पोलिस अधिक्षक डॉ. प्रविण मुंडे यांनी तपास पथकाला व्हेरी गुड असा मारलेला तोंडी शेरा तपास पथकाला हुरुप मिळवून देत होता.
अखेर सर्व तपासकामाचा लेखाजोखा केल्यानंतर देवीदास नामदेव श्रीनाथ (40) गुरुदत्त कॉलनी कुसुंबा, अरुणाबाई गजानन वारंगणे (30) रा. कुसुंबा ता.जि. जळगाव आणि सुधाकर रामलाल पाटील (45) रा. चिंचखेडा ता. जामनेर यांच्यावर तपास स्थिरावला. तिघांना क्रमाक्रमाने ताब्यात घेण्यात आले. अरुणाबाईने दिलेल्या कबुली जवाबानुसार तिने मयत आशाबाईकडून व्याजाने पैसे घेतले होते. सुधाकर पाटील हा देखील आर्थिक अडचणीत होता. मयत आशाबाईकडे मोठ्या प्रमाणात रोकड व सोन्याचे दागीने असल्यामुळे तिघांनी अगोदर मुरलीधर पाटील यास दोरीने गळा आवळून ठार केले. त्यानंतर आशाबाईला गळा आवळून ठार केले. त्यानंतर त्यांच्याकडील सोन्याचे दागिने, रोकड तसेच आशाबाईच्या अंगावरील दागीने घेत पोबारा केला. वाटेत तिघांनी रक्कम व दागीने वाटून घेतले. तिघांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना सुरुवातीला 1 मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावली. पोलिस कोठडीची मुदत संपल्यानंतर त्यांना पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्याचे आदेश दिले.
या गुन्ह्याच्या तपासकामी स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार विजय पाटील, अशोक महाजन, मिलींद केदार, पो.हे.कॉ. विजयसिंग पाटील, संजय हिवरकर, राजेश मेंढे, सुनिल दामोदरे, रवी नरवाडे, जितेंद्र पाटील, सुरज पाटील, सुधाकर अंभोरे, जयंत चौधरी, प्रदीप पाटील, नरेंद्र वारुळे, हे.कॉ. अनिल देशमुख, अश्रफ शेख, कमलाकर बागुल, संतोष मायकल, संदिप साळवे, पो.नाईक नंदलाल पाटील, प्रितम पाटील, किरण धनगर, प्रमोद लाडवंजारी, राहुल पाटील, नितीन बाविस्कर, विजय शामराव पाटील, पो.कॉ. भगवान पाटील, अविनाश देवरे, पंकज शिंदे, सचिन महाजन, सविता परदेशी, अभिलाषा मनोरे, सहायक फौजदार रमेश जाधव, पो.ना. दर्शन ढाकणे, हे.कॉ. इद्रीस पठाण, भारत पाटील, राजेंद्र पवार, पो.ना. अशोक पाटील, एमआयडीसी पोलिस स्टेशनचे पोलिस उप निरीक्षक विशाल सोनवणे, रामकृष्ण पाटील, सहायक फौज्दार अतुल वंजारी, आनंदसिंग पाटील, हे.कॉ> राजेंद्र कांडेकर, जितेंद्र राजपूत, विजय नेरकर, पोलिस नाईक दिपक चौधरी, सचिन मुंडे, इमरान सैय्यद, पो.कॉ. हेमंत कळसकर, मुकेश पाटील, गोविंदा पाटील, चंद्रकांत पाटील, आसिम तडवी, मुदस्सर काझी, योगेश बारी आदींनी तपासकामी सहकार्य केले.