जळगाव : जळगाव जिल्हयासह उत्तर महाराष्ट्रात चैन स्नॅचिंगचे गुन्हे करणा-या तौफिक हुसेन जाफर हुसेन (18) रा.खानका मदरसा जवळ, भुसावळ व चोरीच्या सोन्याच्या चेन विकत घेणारा भुसावळ येथील सराफ व्यावसायीक हरीचंद्र दत्तात्रय इखणकर (25) रा.हनुमान मंदीराजवळ,सराफ गल्ली,भुसावळ या दोघांना जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेत अटक केली आहे. जळगाव जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सदर माहिती देण्यात आली. तौफिक हुसेन याचा साथीदार सोहेल अली युसुफ अली (इराणी मोहल्ला भुसावळ) हा फरार असून पोलिस पथक त्याच्या मागावर आहे.
जळगाव जिल्ह्यात चेन स्नॅचिंगच्या गुन्ह्यांची उकल करण्याकामी स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. किरणकुमार बकाले यांनी आपल्या सहका-यांच्या मदतीने मोहीम हाती घेतली होती. त्याकामी तयार करण्यात आलेल्या पथकात स.फौ.अशोक महाजन, शरीफ काझी, पोना.युनुस शेख, किशोर राठोड, रणजित जाधव, विनोद पाटील, सचिन महाजन, योगेश वराडे, पो.हे.कॉ. महेश महाजन, वसंत लिंगायत, इंद्रीस पठाण, मुरलीधर बारी, अशोक पाटील यांचे पथक तयार करण्यात आले होते.
भुसावळ शहरातील तौफिक हुसेन जाफर हुसेन व सोहेल अली युसुफ अली हे दोघे जण जळगाव जिल्हयासह संपुर्ण महाराष्ट्रात चैन स्नॅचिंगचे गुन्हे करत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. किरणकुमार बकाले यांना समजली होती. दोघे आरोपी चेन स्नॅचींग करण्याकामी भुसावळ येथून मोटार सायकलने पाचोरा मार्गे मालेगाव येथे जात होते. मालेगाव तालुक्यात चैन स्नॅचिंगचे गुन्हे करुन ते पुढे लासलगाव, निफाड, कळवण इत्यादी ठिकाणी चैन स्नॅचिंगचे गुन्हे करत होते. गुन्हे केल्यानंतर ते काही दिवस परळी बैजनाथ येथे मुक्कामी रहात होते. तौफिक हुसेन जाफर हुसेन व सोहेल अली युसुफ अली यांचे नातेवाईक मालेगाव, परळी वैजनाथ व भुसावळ येथे रहात असल्याने ते गुन्हे केल्यानंतर मोटार सायकलसह नातेवाईकांकडे लपून मुक्काम करत होते.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने वेळोवेळी मालेगाव, परळी वैजनाथ व भुसावळ येथे दोघा आरोपींचा शोध घेतला. मात्र ते हाती लागत नव्हते. यातील तौफीक हुसेन हा भुसावळ शहरात आला असल्याची गोपनीय माहिती पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना समजली. त्यानुसार सापळा रचून त्याला ताब्यात घेत अटक करण्यात आली. त्याने दिलेल्या कबुलीनुसार भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशन हद्दीतील दोन व भुसावळ शहर पोलिस स्टेशन हद्दीतील एक अशा एकुण तिन गुन्ह्यांची कबुली दिली आहे. दोघांनी चोरीच्या सोनसाखळ्या भुसावळ येथील सराफ व्यावसायीक हरिचंद्र दत्तात्रय इखनकर यास विकल्याची देखील कबुली दिली. त्यानुसार सराफ व्यावसायीक हरिचंद्र दत्तात्रय इखनकर यास मुद्देमालासह अटक करण्यात आली आहे. आरोपी तौफीक याने गुन्ह्यात वापरलेली मोटार सायकल तपासकामी हस्तगत करण्यात आली आहे. अटकेतील तौफिक हुसेन जाफर हुसेन (खानका मदरसा भुसावळ व त्याचा फरार साथीदार सोहेल अली युसुफ अली (रा.इराणी मोहल्ला, भुसावळ) तसेच अरबाज अली युसुफ अली (इराणी मोहल्ला, भुसावळ) यांनी मालेगाव, लासलगाव, निफाड, सिन्नर ( नाशिक जिल्हा ), शिरपुर (धुळे जिल्हा), नंदुरबार, चाळीसगाव येथे चैन स्नॅचिंगचे खालील गुन्हे केलेले आहेत.