बीड : लसीकरणासाठी जिल्हा रुग्णालयात आलेल्या तरुणांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्यामुळे त्यांना पोलिसांनी समजावण्याचा प्रयत्न केला. या घटनेत तरुणांच्या गटात व पोलिसांमधे धक्काबुक्की झाली. सदर घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून पोलिस गर्दी पांगवण्याच्या प्रयत्नात असतांना आलेल्या जेष्ठ नागरिकांची मोठ्या प्रमाणात धावपळ झाली. या घटनेमुळे रुग्णालय परिसरात मोठ्या प्रमाणात गोंधळ उडाला होता.
दुपारी बारा वाजेच्या सुमारास बिड शहरातील जिल्हा रुग्णालयात हा राडा झाला. लसीकरणासाठी आलेल्या नागरिकांनी शिस्तीत बसण्याच्या सुचना पोलिसांनी दिल्या. काही तरुणांनी मात्र मुद्दाम हुज्जतबाजी करण्यास सुरुवात केली. येथूनच गदरोळाला व धक्काबुक्कीला सुरुवात झाली. हा गदारोळ मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे बिडचे पोलिस उप अधिक्षक संतोष वाळके यांना देखील काही प्रमाणात दुखापत झाली. पोलिसांना सौम्य प्रमाणात लाठीचार्ज करण्याची वेळ आली. या प्रकरणी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.