सोन्याच्या नकली नाण्यांचे आमीष देत गंडवणा-या टोळीचा पर्दाफाश

खामगाव : सोन्याची नाणी कमी किंमतीत देण्याचे आमिष दाखवत नकली नाणी देऊन सौदा ठरवणाऱ्या आणि सौद्यानंतर ग्राहकांना मारहाण करणाऱ्या टोळीचा खामगाव पोलिसांनी आज पहाटे पर्दाफाश केला आहे. 15 लाखाच्या या फसवणूक प्रकरणी परिस्थितीजन्य पुराव्याच्या आधारे आज पहाटे उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल कोळी यांच्या पथकाने अंत्रज येथे कोंबींग ऑपरेशन राबवले. या ऑपरेशन दरम्यान 25 संशयीतांसह दोन देशी कट्टे, शस्त्रात्र आणि नकली सोन्याची नाणी असा एकुण 31 लाख 79 हजार 650 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ताब्यातील टोळीने 5 मे रोजी औरंगाबाद येथील एका व्यापाऱ्याची फसवणूक केली होती. याप्रकरणी तपास सुरु होता. याप्रकरणी मिळालेली गोपनीय माहिती व परिस्थितीजन्य पुरावे यांची सांगड घालत उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल कोळी यांनी आपल्या अख्त्यारीतील पोलिस अधिका-यांसह कर्मचारी वर्गाच्या मदतीने गुरुवारी पहाटे चिखली रस्त्यावरील अंत्रज येथे कोंबींग ऑपरेशन राबवले. या कारवाईत शहर पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक सुनिल अंबुलकर, शिवाजी नगरचे पोलिस निरिक्षक सुनिल हुड, शेगाव शहर पोलिस स्टेशनचे निरिक्षक संतोष टाले, गौरव सराग यांच्यासह पोलिस अधिकारी व कर्मचा-यांचे पथक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

वारंवार सोन्याच्या नाण्यांचे आमिष दाखवत नकली सोन्याचे नाणे देऊन फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करणारी टोळी उघडकीस आणल्याबद्दल जिल्हा पोलीस अधिक्षक अरविंद चावरीया यांनी पथकाचे अभिनंदन केले आहे. याप्रकरणी ग्रामीण पोलीस स्टेशनला गु.र.न.163/21 भा.द.वि. 395, 397, 420, 120 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here