जळगाव : काकांच्या घरात नेहमी 30 ते 40 लाख रुपये असतात व त्या रकमेची लुट केली तर आपली आर्थिक चणचण दुर होईल व चांगला लाभ होईल या कुविचारातून टाकण्यात आलेल्या दरोड्यातील पाच आरोपी स्थानिक गुन्हे शाखेने निष्पन्न केले. यातील मुख्य सुत्रधार आरोपी हा सनी इंदरकुमार साहित्या रा. सिंधी कॉलनी हा असल्याचे निष्पन्न झाले आहे. सर्व संशयीत आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस पथकाने ताब्यात घेत त्यांना अटक केली आहे.
सिंधी कॉलनी परिसरातील रहिवासी सनी इंदरकुमार साहित्या याचे काका प्रकाश साहित्या आहेत. काकांच्या घरात नेहमी लाखो रुपये असल्याचा सनी साहित्या याचा समज झाला होता. त्यामुळे त्याने आपले साथीदार राकेश शिवाजी सोनवणे (35) रा.देवपुर धुळे, उमेश सुरेश बारी (25) रा.चर्चच्या मागे जळगाव, मयुर अशोक सोनार (35) रा.जळगाव व नरेंद्र उर्फ योगेश अशोक सोनार (34) रा.जामनेर यांच्या मदतीने लुटीचा कट रचला होता. त्या कटानुसार सर्व प्रकारचे नियोजन करण्यात आले होते. त्यात लुट करायच्या काकांच्या घराची व घराकडे जाणा-या व येणा-या रस्त्यांची इत्यंभुत माहिती व रंगीत तालीम करण्यात आली होती.
त्यानुसार 17 मार्च रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास सुत्रधार सनी साहित्या याच्या अख्त्यारीखाली इतर सर्व आरोपींनी स्कॉर्पिओ गाडीने येऊन काका प्रकाश साहित्या यांच्या घरात अनाधिकारे प्रवेश केला. घरातील सदस्यांना पिस्तुलचा धाक दाखवत घरातील सोने व रकमेची मागणी करण्यात आली होती. घरातील सर्व कपाट आलेल्या आरोपींनी उघडून पाहिले. मात्र त्यांच्या हाती काहीच लागले नाही. त्यामुळे आलेले सर्व जण रिकाम्या हातांनी दरवाज्याला कडी लाऊन निघून गेले होते.
या घटने प्रकरणी आरोपींचे वर्णन लक्षात घेत वंशिका प्रकाश साहित्या (35) रा.प्लॅट नं. 1 पहीला मजला, स्वामी टॉवर,ईच्छा देवी चौक, सेवा मंडल यांनी जिल्हापेठ पोलिस स्टेशनला फिर्याद दाखल केली होती. सदर गुन्हा भाग 5 गु.र.न. 94/21 भा.द.वि. 393 नुसार दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे व्यापारी वर्गात दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. गुन्ह्याच्या तपासकामी स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली तपास यंत्रणा कामाला लागली होती. सर्व प्रकारचे पुरावे, सीसीटीव्ही फुटेज व खब-यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे तपास पुढे पुढे सरकत होता.
अखेर या गुन्ह्याप्रकरणी नात्यातील मुख्य सुत्रधार सनी इंदरकुमार साहीत्या याचा व त्याच्या साथीदारांचा सहभाग निष्पन्न झाला. त्याच्यासह राकेश शिवाजी सोनवणे, उमेश सुरेश बारी, मयुर अशोक सोनार, नरेंद्र उर्फ योगेश अशोक सोनार यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांनी आपला गुन्हा कबुल केला. पोलिस अधिक्षक डॉ.प्रविण मुंढे, अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले व त्यांचे सहकारी स.पो.नि. स्वप्निल नाईक, सहायक फौजदार अशोक महाजन, विजय पाटील, विजयसिंग पाटील, सुधाकर अंभोरे, जितेंद्र पाटील, सुनिल दामोदरे, नरेंद्र वारुळे, राहुल पाटील,नितीन बाविस्कर, प्रितम पाटील, दिनेश बडगुजर, श्रीकृष्ण पटवर्धन, संदीप सावळे, प्रदीप पाटील, जयंत चौधरी, भगवान पाटील,नंदलाल पाटील, किरण धनगर, प्रमोद लाडवंजारी, मुरलीधर बारी, दर्शन ढाकणे यांनी तपासकामी सहभाग घेतला.