लातूर : पुर्वजांनी कष्टाने घेतलेली व कसलेली शेतजमीन नंतर येणा-या पिढीसाठी कित्येकदा वादाचे कारण होत असते. शेतजमीनीची वाटणी हा मुद्दा कित्येकदा भाऊबंदकीत उफाळून येत असतो. या वादातून अनेक ठिकाणी खूनाच्या घटना घडलेल्या आहेत.
लातूर जिल्हयाच्या चाकुर तालुक्यातील लातूर रोड येथे पंचायत समितीचे माजी सभापती चंद्रकांत मारापल्ले यांची गेल्या महिन्यात त्यांच्याच मुलाने निर्घृण हत्या केली. या हत्येने चाकुर तालुक्यात मोठी खळबळ माजली होती. शेतीचा वाद हे या खूनामागचे मुख्य कारण होते.
चाकूर तालुक्यातील लातूर रोड भागात चंद्रकांत मारापल्ले हे आपल्या कुटूंबासह रहात होते.त्यांना धनंजय व रवी ही दोन मुले आहेत. रवी हा शिक्षकी पेशा करत असून बाहेरगावी राहतो तर धनंजय हा गावातच रहात होता. धनंजय व रवी या दोन्ही मुलांची लग्न चंद्रकांत मारापल्ले यांनी थाटामाटात केली होती.
चंद्रकांत मारापल्ले यांचे राजकारणात काही वर्षापुर्वी चांगले वलय होते. त्या वलयाच्या आधारे त्यांनी पंचायत समितीचे सभापतीपद भुषवले होते. एक मन मिळावू नेता म्हणून त्यांनी समाजात ओळख निर्माण केली होती.
घरात सुखाची सर्व साधने उपलब्ध असतांना चंद्रकांत मारापल्ले यांचा मुलगा धनंजय यास मद्यपानाचे व्यसन जडले होते. लग्नानंतर त्याचा संसार सुखात सुरु होता. मात्र त्याला दारु पिण्याचे व्यसन जडल्यामुळे त्याचा मानसिक तोल कधी कधी ढळत असे.
दारुच्या नशेत तो आपल्या वडीलांना जमीनीच्या हिस्से वाटणीची मागणी करु लागला.वडील चंद्रकांत मारापल्ले यांनी सुरुवातीला त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले. मात्र त्याची जमिनीच्या हिस्से वाटणीची मागणी वाढतच होती. त्यामुळे त्यांनी त्याला समजावण्यास सुरुवात केली.
तुझा भाऊ बाहेरगावी नोकरीला आहे. तु मात्र येथेच आहे. त्यामुळे तुला हिस्से वाटणीची गरज काय? हे सर्व तुच बघतो आहे. तरी देखील धनंजय ऐकून घेण्याच्या तयारीत नव्हता. त्याला जमीनीची हिस्से वाटणीच हवी होती. तो म्हणाला की मी वेगळा राहतो. मला वाटणी करुन द्या.
त्याच्या या तगाद्यामुळे घरात बाप लेकात कित्येकदा वाद झाले. शेताची वाटणी करुन देत नसल्यामुळे त्याच्या मनात वडीलांविषयी रागाची भावना निर्माण झाली होती. मला वाटणी द्या नाहीतर मी तुम्हाला जिवे ठार करेन अशी धमकी देण्यापर्यंत धनंजयची मजल गेली होती. तो दररोज दारु पिवून आल्यावर वडीलांसोबत शेताच्या हिस्से वाटणीवरुन वाद घालत असे.
अखेर 19 जूनचा तो काळा दिवस उजाडला. सकाळी 11 वाजता चंद्रकांत मारापल्ले नेहमीप्रमाणे शेतात आले. त्यावेळी धनंजय याने वडीलांना गाठले. मला आत्ताच्या आत्ता शेताचा हिस्सा हवा असा त्याने हट्टच धरला. सुरुवातीला चंद्रकांत मारापल्ले यांनी त्याच्या बोलण्याकडे काही प्रमाणात दुर्लक्ष केले. मात्र धनंजयच्या मनात संताप मावत नव्हता. पिता पुत्रात शाब्दिक चकमक वाढत गेली.
संतापाच्या भरात धनंजयने जवळच पडलेली फरशी उचलली. बेसावध असलेल्या चंद्रकांत मारापल्ले यांच्या डोक्यात त्याने ती फरशी हाणली. फरशीचा घाव वर्मी लागताच चंद्रकांत मारपल्ले खाटेवर कोसळले. ते जागीच बेशुद्ध झाले. आपले पिताश्री जमीनीवर कोसळताच तो जगाला ओरडून सांगू लागला की मी माझ्या बापाला मारले आहे. दरम्यानच्या काळात मारेकरी धनंजय पसार देखील झाला होता.
या घटनेची माहीती मिळताच त्यांची पत्नी व इतर नातेवाईक व शेतकरी घटनास्थळी धावून आले. नातेवाईकांनी जखमी चंद्रकांत मारापल्ले यांना वैद्यकीय उपचारासाठी चाकूर येथील एका खाजगी दवाखान्यात आणले.
तेथील डॉक्टरांनी त्यांच्यावर प्राथमिक उपचार केले. मात्र त्यांची अवस्था गंभीर असल्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी लातूर येथे घेवून जाण्याचा सल्ला दिला. लातूर येथील सहयाद्री रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान 20 जून रोजी त्यांचा मृत्यू झाला.
या प्रकरणी मयत चंद्रकांत मारापल्ले यांचा भाऊ उत्तम मारापल्ले यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार धनंजय मारापल्ली याच्या विरुद्ध गु.र.न. 208/20 भा.द.वि.302 कलमानुसार गुन्हा नोंद करण्यात आला.
जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र माने, अप्पर पोलिस अधीक्षक हिम्मत जाधव, चाकूर उपविभागीय पोलिस अधीकारी यांच्या मार्गदर्शनाखाली चाकूर पोलिस स्टेशनचे पो.नि.जयवंत चव्हाण यांनी तपास सुरु केला. फरार धनंजय मारापल्ले याच्या मागावर पोलिस पथक रवाना करण्यात आले.
या पथकात पोलिस उप निरीक्षक निलम घोरपडे, पो.कॉ. हनुमंत आरदवाड, गोरोबा जोशी, पोलिस नाईक बाळू आरदवाड, दत्ता थोरमोटे, मारूती तुडमे यांना सामिल करण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार लातुर रोड परिसरात आलेल्या धनंजय यास सापळा रचून पकडण्यात आले. त्याला चाकूर पोलिस स्टेशनला पो.नि.जयवंत चव्हाण यांच्यासमोर हजर करण्यात आले. चौकशी दरम्यान त्याने आपल्या गुन्हयाची कबुली दिली.
वडील जमीनीचा हिस्सा देत नसल्यामुळे आपण त्यांची हत्या केल्याची त्याने कबुली पोलिसांना दिली. त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला सुरुवातीला पोलिस कोठडी सुनावली. पोलिस कोठडी दरम्यान त्याने गुन्हयत वापरलेली फरशी व रक्ताने माखलेले कपडे काढून दिले. तो मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी पुढील तपास चाकूर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक जयवंत चव्हाण करत आहेत.