पुणे : पोलिसांच्या वेशात परप्रांतीय रेल्वे प्रवाशांची लुट करणा-या नकली पोलिसांना असली पुणे पोलिसांच्या पथकाने ताब्यात घेत कारवाई केली आहे. पोलिसांचा गणवेश परिधान करुन प्रवाशांची लुट करणा-या टोळीचा पर्दाफाश झाला आहे. मुख्य आरोपीस पुणे लोहमार्ग पोलिसांनी अटक केली असून फरार पाच साथीदारांचा शोध सुरु आहे. रेल्वे स्टेशनवरील पोलिस बंदोबस्त कमी झाल्यानंतर नकली पोलिसांची टोळी प्रकट होत असे. या प्रकाराची लोहमार्ग पोलिस अधिक्षक सदानंद वायसे यांनी दखल घेत कारवाई केली आहे.
पुणे रेल्वे स्थानकावर असलेल्या सर्व प्लॅटफॉर्मवर 72 सीसीटीव्ही कॅमेरे कार्यरत आहेत. या सीसीटीव्हीचे फुटेज तपासण्यासाठी लोहमार्ग पोलिसांचे एकुण सात पथके कार्यरत करण्यत आली होती. या तपासणीअंती दोन नकली पोलिसांच्या हालचाली दिसून आल्या. ते असली पोलिस आहेत काय? याची अगोदर शहानिशा करुन घेण्यात आली. ते असली पोलिस नसल्याचे निष्पन्न झाल्यानंतर कारवाईला वेग देण्यात आला.
सध्या सुरु असलेल्या लॉकडाऊन काळात परप्रांतीय कामगार आपल्या घरी जात आहेत. त्यांचे साहित्य तपासणी करण्याच्या बहाण्याने हा प्रकार सुरु होता. तुम्ही गांजा लपवला आहे तो आमच्या ताब्यात द्या अशी दमबाजी करुन त्यांच्याकडील रोख रक्कम लुटली जात होती. याशिवाय गाडीचे तिकीट व बसायला जागा मिळवून देण्याच्या नावाखाली देखील लुट सुरु होती. याबाबत तक्रारी आल्या होत्या. ताब्यातील आरोपींनी ज्या टेलरकडून पोलिसांचा गणवेश शिवला होता त्याची देखील माहिती घेण्यात आली आहे.