केईएमचा डॉक्टर अडकला हनी ट्रॅपमधे

काल्पनिक छायाचित्र

मुंबई : इन्स्टाग्रामवरून मैत्रीच्या जाळ्यात ओढून केईएम रुग्णालयातील डॉक्टरची  तब्बल सव्वा दोन लाख रुपयात फसवणूक झाल्याचा प्रकार उघड झाला आहे. याप्रकरणी भोईवाडा पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बिड जिल्हयातील 28 वर्षाचा तरुण डॉक्टर केईएम रुग्णालयात सेवेत असून तेथील होस्टेलमधे वास्तव्यास आहे. या डॉक्टरची ओळख इंस्टाग्रामच्या माध्यमातून एका तरुणीसोबत झाली. ओळखीनंतर दोघांचे मोबाईलवर चॅटींग सुरु झाले.

हळूहळू दोघांच्या मोबाईलवरील गप्पा वेग घेत होत्या. दरम्यान तरुणीने डॉक्टरला एक पार्सल पाठवल्याचा संदेश पाठवला. संदेशात म्हटल्यानुसार डॉक्टर ते पार्सल सोडवण्यासाठी विमानतळावरील कस्टम कार्यालयात जावून 36 हजार रुपये भरण्यास तयार झाले.

काही वेळाने एका अनोळखी व्यक्तीने डॉक्टरांना फोन करुन आपण कस्टम अधिकारी बोलत असल्याचे सांगितले. पैसे पाठवण्यासाठी पलीकडून बोलणा-या व्यक्तीने त्याच्या बॅंक खात्याचा तपशील दिला. त्या खात्यावर डॉक्टरने 36 हजार रुपये जमा केले.

त्यानंतर कस्टम क्लियरंस साठी अजून 1 लाख 99 हजार रुपये भरावे लागतील असे सांगण्यात आले. इकडून तिकडून व्यवस्था करत डॉक्टरांनी मैत्रीणीच्या आग्रहाखातर ती रक्कम देखील जमा केली. तरी देखील पार्सल आले नसल्यामुळे आपली फसवणूक झाल्याची डॉक्टरांची खात्री झाली.

दरम्यान आणखी एका अनोळखी व्यक्तिने त्यांना फोन करुन 49 हजार 500 रुपये जमा करण्यास सांगितले. त्यास डॉक्टरांनी स्पष्ट नकार दिला.याप्रकरणी पोलीस स्टेशनला तक्रार दिल्यानंतर तपासाला सुरुवात करण्यात आली आहे. पुणे येथील एका महिलेची फेसबुकवरील मैत्रीतून एकाने अशाच प्रकारे फसवणूक झाली होती.



LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here