मालमत्तेच्या विषयाने घेतले हिंसक वळण!———. कु-हाडीच्या घावात संपवले वादाचे दळण!!

जळगाव : लोटन सोनार आणि प्रमिलाबाई सोनार या दाम्पत्याला मुकेश आणि दिपक अशी दोन मुले होती. लोटन सोनार यांनी आपल्या पारंपारिक सराफी व्यवसायात आपले आयुष्य घालवले आणी घडवले होते. मोठा मुलगा मुकेश यास लोटन सोनार यांनी हळूहळू आपल्या सराफी व्यवसायात पारंगत केले. सराफी व्यवसायात मुकेश सज्ञान आणि पारंगत झाल्यानंतर त्यांनी त्याचा विवाह देखील करुन दिला. वडनेरे परिवारातील योगिता पती मुकेश सोबत विवाहबद्ध झाली आणि सोनार परिवारात नांदण्यास आली. पुर्वाश्रमीची योगिता वडनेरे आता योगिता सोनार झाली होती.

लोटन सोनार यांचा लहान मुलगा दिपक मात्र खासगी नोकरी करु लागला. जळगाव शहरातील जैन इरिगेशन कंपनीत ऑपरेटर म्हणून त्याला सन 2013 मधे जॉब लागला. एकंदरीत लोटन सोनार यांची दोन्ही मुले कमावती आणि सज्ञान झाली होती. लग्नानंतर मुकेश आणि योगिता या दाम्पत्याच्या संसारवेलीवर एका पुत्ररत्नाचे आगमन झाले. त्यांनी त्याचे नाव आर्यन असे ठेवले. एकंदरीत सोनार परिवारात सर्व काही सुरळीत सुरु होते.

yogita sonar

लोटन सोनार व त्यांची दोन्ही मुले अशा तिघांनी आपल्या जमापुंजीच्या आधारे एकत्रीतपणे सन 2007 मधे जळगाव शहराच्या पिंप्राळा या उप नगरातील मयुर कॉलनीत एक प्लॉट विकत घेतला. त्या प्लॉटवर दिपकने महाराष्ट्र ग्रामीण बॅंकेच्या गणेश कॉलनी शाखेतून तिन लाख रुपयांचे कर्ज काढले. कर्जाच्या रकमेतून त्या प्लॉटवर बांधकाम करण्यात आले.  सन 2009 पासून लोटन सोनार, त्यांची पत्नी प्रमिलाबाई सोनार, मुकेश – योगिता व त्यांचा मुलगा आर्यन तसेच दिपक असे सर्वजण मयुर कॉलनीतील नव्या वास्तूत राहण्यास आले.

मयुर कॉलनीतील नव्या वास्तूत राहण्यास आल्यानंतर सुरुवातीचे काही दिवस सर्वांना चांगले गेले. मात्र काही दिवसांनी सासू सुनेचे पटेनासे झाले. काही ना काही कारणावरुन योगिताचे घरात सासू प्रमिलाबाई व दिर दिपक यांच्यासोबत काही केल्या पटत नव्हते. किरकोळ कारणावरुन योगिताचे सासुसोबत वाद होत असत. ज्या घरात सासु आणि सुना खळखळून हसतात त्या घरात वास्तुदोष निवारण यंत्राची अजिबात गरज भासत नाही असे म्हटले जाते.

 योगिता कधी कधी केवळ पती मुकेश व मुलगा आर्यन यांचाच स्वयंपाक करत होती. तर सासु प्रमिलाबाईला पती लोटन पाटील व मुलगा दिपक यांचा स्वयंपाक करावा लागत होता. एकाच घरात सासू सुनेचे उत्तर आणि दक्षीण ध्रुवाप्रमाणे राहणे कौटूंबिक वातावरण बिघडण्यास कारणीभूत ठरत होते.  एके दिवशी तर संतापी योगिताने आपल्या सासूच्या कानशिलात लगावल्याची घटना घडल्याचे सांगितले जाते. या घटनेमुळे त्यावेळी घरात मोठ्या प्रमाणात वाद निर्माण झाला होता. हा वाद मिटवण्यासाठी योगिताचे काका व काकू आले होते. वाद शमत नसल्याचे बघून योगिताला तिच्या काका व काकूंनी मिळून रामेश्वर कॉलनीतील त्यांच्या राहत्या घरी नेले होते. जवळपास सहा महिने योगिता तिच्या काका व काकूंच्या रामेश्वर कॉलनीतील घरी मुक्कामी राहीली. त्यानंतर तडजोडीअंती योगिता पुन्हा आपल्या पती व सासूकडे पिंप्राळा येथील मयुर कॉलनीत राहण्यास आली. काही दिवस चांगले गेल्यानंतर पुन्हा ये रे माझ्या मागल्या या उक्तीप्रमाणे सासू व सुनेत किरकोळ कारणावरुन वाद होण्यास सुरुवात झाली.

Dipak sonar

मयुर कॉलनीतील राहत्या घराची जागा घेण्यासाठी लोटन पाटील, मुकेश व दिपक या तिघांनी मिळून आर्थिक हातभार लावला होता. मात्र या जागेच्या सातबारा उता-यावर दिपकने आपले नाव लावले होते असे म्हटले जाते. या जागेवर बांधकाम करण्यासाठी दिपकने त्याच्या नावावर बॅकेचे कर्ज प्रकरण केले होते. मयुर कॉलनीतील राहते घर आपल्या नावे करण्यासाठी योगिताने पती मुकेशसोबत वाद घालण्यास सुरुवात केली होती. सन 2015 – 16 पासून सुरु असलेला हा वाद सुरुच होता. हा वाद मिटवण्यासाठी दिपकने त्याचा भाऊ मुकेश याच्या नावे मयुर कॉलनीतील राहते घर बक्षीसपत्र म्हणून करुन दिले असल्याचे देखील म्हटले जाते. त्यानंतर देखील घरात कुरबुरी काही केल्या संपत नव्हत्या. योगीताला वाटत होते की या घरात केवळ तिने आपल्या पती व मुलासह रहावे. आपले सासू – सासरे व दिर यांनी दुसरीकडे राहण्यास जावे असा काहीसा सुर योगिता तिच्या पतीकडे आवळत होती. एकंदरीत घरातील  वातावरण दुषित झाले होते. पुन्हा एकदा लोटन पाटील, मुकेश व दिपक या तिघांनी मिळून पैसे जमा करुन निमखेडी शिवारात एक जागा विकत घेतली. ती जागा मुकेशच्या नावे करण्यात आली असे म्हटले जाते.

दि. 31 ऑगस्ट 2020 रोजी मुकेश आपल्या सराफी व्यवसायाच्या निमीत्ताने यावल तालुक्यात गेला होता. त्याच दिवशी दिपक हा  देखील त्याच्या कंपनीच्या कामानिमीत्त जळगाव शहरातील पांडे चौकात गेला होता. त्याचवेळी सकाळी सव्वा नऊ वाजेच्या सुमारास दिपकच्या मोबाईलवर यावल पोलिसांचा एक निरोप आला. त्यादिवशी दिपकचा भाऊ मुकेश याचा चुंचाळे गावानजीक रस्ता अपघात झाला होता. त्या अपघातात मुकेश गंभीर जखमी झाल्याचा तो निरोप होता.

आपल्या भावाचा गंभीर अपघात झाल्याचा निरोप मिळताच दिपक, योगिता व तिचे सासु सासरे व काही निवडक नातेवाईक असे सर्वजण यावलच्या दिशेने रवाना झाले. सर्वजण यावल येथे गेल्यावर त्यांना समजले की मुकेशचे अपघाती निधन झाले आहे. मुकेश रस्ता अपघातात मृत्युमुखी पडला होता. सर्व कायदेशीर सोपास्कर आटोपल्यानंतर मुकेशचा मृतदेह ताब्यात घेत सर्वजण जळगावला आले. मुकेशवर अंत्यसंस्कार करण्यात आले. पती निधनानंतर योगितासह सर्वच जण दुखा:त होते. मुकेशच्या निधनाची दुर्दैवी घटना घडून गेली होती. आल्या प्रसंगाला तोंड देणे गरजेचे होते. मुकेशचे उत्तरकार्य पार पडले.

मुकेशच्या निधनाचा धक्का लोटन सोनार सहन करु शकले नाही. मुकेशच्या निधनानंतर आणि उत्तरकार्य आटोपल्यानंतर लागलीच 16 सप्टेबर 2020 रोजी लोटन सोनार यांचे निधन झाले. एकापाठोपाठ घरातील दोन कर्ते पुरुष हे जग सोडून अनंताच्या वाटेवर निघून गेले होते. आता घरात दिपक हाच एक कर्ता पुरुष राहिला होता. दिपकचे वडील लोटन सोनार यांचे उत्तरकार्य आटोपल्यानंतर सोनारी काम करण्यासाठी कुणी राहिले नव्हते. त्यामुळे उत्तरकार्य आटोपल्यानंतर दहा दिवसांनी सोनारी कामाचे दुकान रिकामे करण्याचा निर्णय योगिताने घेतला. तिने दिर दिपक यास दुकानावर फोन करुन बोलाऊन घेतले. त्यावेळी तिच्यासमवेत तिची बहिण आणि वहिणी असे सर्वजण हजर होते. दुकानातील सामान आणि तिजोरी विकुन आलेली रक्कम योगिताने आपल्या ताब्यात घेतली व दुकान संबंधीत मालकाच्या ताब्यात देत त्याचा व्यवहार पुर्ण केला.

या घटनेनंतर किरकोळ कारणावरुन झालेला वाद मिटवण्यासाठी जवळचे नातेवाईक घरी आले होते. त्यावेळी चर्चेतून दिपक यास समजले की योगिता हिस पती मुकेशच्या जिवन विमा पॉलीसीची काही लाखात रक्कम मिळाली आहे. ती रक्कम योगिताने पोस्टात ठेवली आहे. त्या रकमेच्या व्याजावर योगिताने स्वत:चा खर्च भागवावा आणि शिवाय सासूला देखील दरमहा चार हजार रुपये द्यावा असे सुचवण्यात आले. एकंदरीत मालमत्तेचा वाद सुरु झाला होता. तो वाद सामंजस्याने मिटण्याऐवजी त्याला विविध फाटे तयार होण्यास वेळ लागत नव्हता. त्यामुळे वातावरण कलुषित झाले होते.  त्यावर दिपकने जमलेल्या नातेवाईकांना सुचवले की आम्ही वहिणी योगिताचा विवाह करुन देतो व तिचा हिस्सा देखील तिला देतो. त्यावेळी दिपकच्या या प्रस्तावाला उपस्थित एका नातेवाईकाने नकार दिल्याने तो प्रस्ताव तेथेच बारगळला. या सर्व चर्चेनंतर सर्व नातेवाईक आपापल्या घरी निघून गेले. त्यानंतर घरात काही दिवस शांतता असली तरी अंतर्गत धुसफुस सुरुच होती. घरात तणावपुर्ण शांतता असली तरी ती सध्या तरी आटोक्यात होती. मात्र 21 मे 2021 रोजी या शांततेचा विस्फोट झाला.

21 मे 2021 रोजी दिपक कामावरुन सायंकाळी घरी परत आला. फ्रेश झाल्यानंतर तो थोडा वेळ बाहेर फिरण्यासाठी गेला. रात्री आठ वाजेच्या सुमारास जेवण आटोपल्यानंतर त्याने त्याच्या कर्जविषयक कागदपत्रांची पाहणी करण्यास सुरुवात केली. त्या कागदपत्रात इतरही काही जुने कागदपत्र, लग्नपत्रिका, झेरॉक्स आदींचा समावेश होता. कामाची कागदपत्रे एका बाजुला व अनावश्यक कागदपत्रे दुस-या बाजुला ठेवण्याचे काम दिपक करु लागला. दिपक कागदपत्रांची छाननी करत असतांना योगिताचे लक्ष त्याच्याकडे गेले. तिने दिर दिपक यास विचारले की भाऊ तुम्ही काय करताय? त्यावर दिपकने वहिणी योगिताला चिडून म्हटले  की तुमचा काय संबंध? त्यावर योगिता म्हणाली की त्या कागदपत्रात माझे देखील कागदपत्र आहेत. योगिताच्या बोलण्याचा दिपकला राग आल्याने तो म्हणाला की तुमची कागदपत्रे मागच्या खोलीत असतील तिकडे बघून घ्या.

दिपकचे बोलणे योगिताला योग्य वाटले नाही. तिने मुलगा आर्यन यास म्हटले की “बघ रे आर्यन…. कसे बोलत आहे तुझे काका.”  त्यावर दिपकने देखील आर्यनकडे बघून म्हटले की “बाळा …… त्यांना समजाऊन दे, त्यांना मागच्या खोलीत कागदपत्र असतील ती तुम्ही बघून घ्या.”  दिर व वहिणी यांच्यात सुरु असलेल्या वादात आता सासु प्रमिलाबाई यांनी मध्यस्ती करत म्हटले की ते सर्व कागदपत्र दिपकची आहेत. त्यावर योगिता अजुनच चिडली. तिने सासु प्रमिलाबाई यांना म्हटले की “तुम्ही बोलू नका, तुम्हाला माहिती नाही”. आई प्रमिलाबाईला असे बोलण्याचा दिपकला राग आला. त्याने वहिणी योगिताला म्हटले की “माझ्या आईसोबत तुम्ही मोठ्या आवाजात बोलू नका, मी जर मोठ्याने बोलला तर काहीतरी होऊन जाईल”.

दरम्यान संतापलेल्या दिपकने हातातील कागदपत्र बाजुला ठेवली. बेड सरकवत त्याखाली असलेली कु-हाड त्याने बाहेर काढली. कु-हाडीचा एकच जोरात घाव त्याने संतापाच्या भरात वहिणी योगिताच्या डोक्यात टाकला. आपल्या आईवर कु-हाडीने हल्ला झाल्याचे बघून आर्यन मनातून घाबरला. परंतू तरीदेखील प्रसंगावधान राखत आपल्या आईचा जिव वाचवण्यासाठी तो पुढे सरसावला. त्याने काका दिपकच्या तोंडात हात टाकून त्याचे गाल ताणले. आर्यन याने काका दिपकचा जोरदार चावा घेत त्याला पुन्हा हल्ला करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी घरातील कांद्यावर योगिताचा पाय पडल्याने ती खाली पडली व तिचे डोके घराच्या उंबरठ्याच्या बाहेर पडले. एकाच वेळी डोक्यावर कु-हाडीचा हल्ला व डोक्यावरच खाली आपटले जाण्याची घटना जुळून आली. यामुळे योगिताच्या डोक्यातून मोठ्या प्रमाणात रक्त वाहू लागले. आपल्या आईला जखमी अवस्थेत बघुन आर्यन मोठमोठ्याने रडू लागला. त्याने काका दिपकच्या हातातील कु-हाड हिसकावत बाजुला फेकली.

त्यावेळी दिपकने त्याचा पुतण्या आर्यन यास म्हटले की बाळ आता सर्व संपले आहे. काकाच्या बोलण्याचा लहानग्या आर्यन यास खुप राग आला. त्याने रागाच्या भरात दिपकच्या छातीला चावा घेतला. भयभीत आर्यनने त्याच्या मोबाईलवरुन पोलिसांच्या शंभर या क्रमांकावर फोन लावण्याचा प्रयत्न केला. मात्र तो लागला नाही. त्यामुळे त्याने त्याची मावशी प्रियंका व आत्या सुदर्शना व आजीला फोन करुन घटनेची माहिती दिली. माहिती देतांना त्याला हुंदके आवरले जात नव्हते.

या घटनेमुळे निर्माण झालेला हल्लकल्लोळ आणि भांडणाचा आवाज ऐकून घराजवळ राहणा-या वडनेरे परिवारातील सुनिल वडनेरे व सोनु वडनेरे हे दोघेजण मदतीला धावून आले. या घटनेची माहिती मिळताच पोलिस अधिक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलिस अधिक्षक चंद्रकांत गवळी, रामानंद नगर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक अनिल बडगुजर, स.पो.नि. संदिप परदेशी या अधिकारी वर्गाने घटनास्थळी लागलीच धाव घेतली. या अधिका-यांच्या मदतीला हे.कॉ. शिवाजी धुमाळ, पोलिस नाईक विजय खैरे, पो.कॉ. जितेंद्र तावडे, उमेश पवार, संतोष गिते, अतुल चौधरी असे सर्वजण देखील घटनास्थळी दाखल झाले.

संतापच्या भरात वहिणीची कु-हाडीने हत्या केल्यानंतर पश्चाताप झाल्यागत तो जोरजोरात असंगत बडबड करत होता. पोलिस पथकाने सर्वप्रथम त्याला ताब्यात घेतले. घटनास्थळी फॉरेंन्सिक लॅबचे पथक दाखल झाले. या पथकाने घटनास्थळावरील रक्ताच्या डागांचे नमुने हस्तगत केले. अशाप्रकारे कायदेशीर प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली.

मयत योगिताचा मृतदेह उत्तरीय तपासणीकामी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रवाना करण्यात आला. या सर्व घटनेने आठवीत शिक्षण घेणारा आर्यन भेदरला होता. त्याला पोलिस पथकाने धिर देत शांत केले. याप्रकरणी मयत योगिताचा आठवीतील मुलगा आर्यन याने दिलेल्या फिर्यादीनुसार रामानंद नगर पोलिस स्टेशनला खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. सदर गुन्हा भाग 5 गु.र.न. 148/21 भा.द.वि. 302 नुसार दिपक लोटन सोनार याचेविरुद्ध दाखल करण्यात आला. दिपक सोनार यास अटक करण्यात आली. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने सुरुवातीला त्याला पोलिस कोठडी सुनावली. पोलिस कोठडीदरम्यान त्याने आपला गुन्हा कबुल केला. घराच्या मालमत्तेच्या वादातून निर्माण झालेला वाद योगिताच्या जिवीतापर्यंत गेला. त्यातून तिचा जिव गेला. कधी कधी मालमत्ता एखाद्याच्या जिवावर उठू शकते. या गुन्ह्याचा पुढील तपास पो.नि. अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे. त्यांना तपासकामी स.पो.नि. संदिप परदेशी यांच्यास हे.कॉ. शिवाजी धुमाळ, पोलिस नाईक विजय खैरे, पो.कॉ. जितेंद्र तावडे, उमेश पवार, संतोष गिते यांचे सहकार्य लाभत आहे. संशयित दिपक सोनार सध्या न्यायालयीन कोठडीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here