जळगाव : चाळीसगाव लघु पाटबंधारे कार्यालयातील चोकीदाराने मागीतलेली पाचशे रुपयांची लाच त्याच्या अंगाशी आल्याची घटना आज चाळीसगाव येथे घडली. सदर चौकीदार दबा धरुन बसलेल्या एसीबीच्या जाळ्यात अलगद अडकला.
सुरेश बेनीराम वाणी असे एसीबीच्या जाळ्यात अडकलेल्या चौकीदाराचे नाव आहे. या प्रकरणातील तक्रारदारास त्याची शेतजमीन लाभ क्षेत्रात येत नसल्याबाबत ना हरकत दाखला हवा होता. तक्रारदारास लागत असलेला ना हरकत दाखला उप विभागीय अधिकारी लघु पाटबंधारे बांधकाम विभाग पाचोरा यांचेकडून तयार करुन आणून देण्याकामी चौकीदार सुरेश वाणी यांनी पाचशे रुपयांची मागणी केली. मात्र तक्रारदारास चौकीदारास पाचशे रुपये देण्याची अजिबात इच्छा नव्हती. तक्रारदाराने रितसर धुळे एसीबीचे कार्यालय गाठत तक्रार दाखल केली.
एसीबीची सापळापुर्व कारवाई व खात्री झाल्यानंतर व ठरल्यानुसार आज धुळे एसीबीने सापळा रचला. या सापळ्यात पाचशे रुपयांची लाच घेतांना चौकीदार सुरेश बेनीराम वाणी (58) हा अलगद अडकला. सेवानिवृत्तीच्या जवळ आलेला चौकीदार एसीबीच्या जाळ्यातून बाहेर पडण्यासाठी खटाटोप करत होता. मात्र त्याचा खटाटोप निरर्थक ठरला. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया सुरु झाली. धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उप अधिक्षक सुनिल कुराडे यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्य सापळा अधिकारी प्रकाश झोडगे व सहायक सापळा अधिकारी पोलिस निरीक्षक मंजितसिंग चव्हाण, पोलीस निरीक्षक यांच्यासह राजन कदम, कैलास जोहरे, कृष्णकांत वाडीले, प्रशांत चौधरी, भुषण खलानेकर, भूषण शेटे, चालक सुधीर मोरे आदींनी या कारवाईत सहभाग घेतला.