जळगाव : एक महिन्यापासून माहेरी धुळे येथे गेलेल्या शिक्षीकेच्या घरातून दहा महागड्या साड्यांची चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी शिक्षीकेच्या तक्रारीनुसार एमआयडीसी पोलिस स्टेशनला साड्या चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वृंदा गणपतराव गरुड या जिल्हा परिषद शाळेत शिक्षीका असून त्यांचे निवासस्थान पाचोरा रस्त्यावरील गुंजन मंगल कार्यालयासमोर जिवनमोती कॉलनीत आहे. शिक्षीका गरुड यांचे पती पुणे येथे त्यांच्या मुलीकडे गेले होते. दरम्यान वृंदा गरुड या गेल्या एक महिन्यापासून माहेरी धुळे येथे घर कुलुपबंद करुन गेल्या होत्या. घराच्या चाव्या त्यांच्याकडेच होत्या. दरम्यान एक महिन्यापासून घर बंद असल्याचे बघून चोरट्यांनी त्यांच्या घराच्या दाराचा कडीकोंडा तोडून आत प्रवेश मिळवला. घरातील कपाटातून चोरट्यांना त्यांच्या घरातून दोन ते चार हजार रुपये किमतीच्या महागड्या साड्या गवसल्या. या दहा साड्यांची एकुण किंमत 25 हजार 300 रुपये आहे.
घराचा दरवाजा उघडा असल्याचे शिक्षीका वृंदा गरुड यांच्या पुतण्याच्या निदर्शनास आले. पुतण्याने त्यांना या घटनेची माहिती दिली. माहीती मिळताच त्या धुळे येथून लागलीच जळगावला परत आल्या. घराची पाहणी केली असता साड्यांची चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल असून पुढील तपास सुरु आहे.