धुळे : हातात पिस्तूल घेऊन टीकटॉक वर फिल्मी स्टाईल डायलॉगबाजीचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला होता. हा व्हिडीओ पोलिस अधिक्षक चिन्मय पंडीत यांच्या हाती लागताच संबंधीत तरुणांना अद्दल घडली.
धुळे येथील भीमनगर परिसरात राहणा-या दीपक शिरसाट या तरुणाने हातात गावठी कट्टा घेत टिक टॉकवर व्हिडीओ तयार केला होता. तो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. तो व्हिडिओ पोलिस अधिक्षक चिन्मय पंडीत यांच्यापर्यंत गेला.
पोलिस अधिक्षक चिन्मय पंडीत यांच्या आदेशाने स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक शिवाजी बुधवंत यांनी कारवाईला सुरुवात केली. दिपक शिरसाठ यास ताब्यात घेण्यात आले. त्याला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने त्याच्या दोघा साथीदारांची नावे उघड केली.
त्यानुसार पंकज परशराम जिसेजा व अभय दिलीप अमृतसागर यांना देखील ताब्यात घेण्यात आले. अभयकडून एक गावठी पिस्तूल व दोन जिवंत काडतुसं जप्त करण्यात आली. आरोपींविरोधात धुळे शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.