जबरी चोरी करणारे तिघे घातक हत्यारासह अटकेत

जळगाव : राष्ट्रीय महामार्गावर चार चाकी वाहनांना रोखून वाहनचालकांकडील रक्कम जबरीने लुटणा-या तिघांना जळगाव तालुका पोलिसांनी अटक केली आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या चार तासात या गुन्ह्याचा उलगडा जळगाव तालुका पोलिसांनी लावला आहे. अटकेतील तिघांकडून गावठी कट्टा, चॉपर व चाकू अशा घातक हत्यार जप्त करण्यात आले आहेत.

आतिक बिलाल खान हे मुक्ताईनगर येथील रहिवासी 10 जून रोजी धुळे ते मुक्ताईनगर असा प्रवास त्यांच्या चारचाकी वाहनाने करत होते. प्रवासादरम्यान दुपारी साडेतीन वाजता महामार्गावरील खोटे नगर नजीक हॉटेल राधिकासमोर त्यांच्या वाहनाला चौघांनी अडवले. दोन मोटार सायकलवर चौघे जण त्यावेळी त्यांच्या चारचाकी वाहनाला आडवे आले होते. आतिक बिलाल खान यांच्याकडील रोख सहाशे रुपये चौघांनी मिळून हिसकावले होते.

आतिक बिलाल खान यांनी मुक्ताईनगर येथे गेल्यावर मुक्ताईनगर पोलिस स्टेशनला या जबरी चोरीची फिर्याद दाखल केली. सदर गुन्ह्याचे घटनास्थळ जळगाव तालुका पोलिस स्टेशन हद्दीतील होते. त्यामुळे हा गुन्हा जळगाव तालुका पोलिसात वर्ग करण्यात आला. या गुन्ह्यात भा.द.वि. 394, 34 नुसार कलम लावण्यात आले.
गुन्हा दाखल झाल्यानंतर पो.नि. रविकांत सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक कल्याण कासार, पो.हे.कॉ. सतिष हाळणोर, पो.हे.कॉ. वासुदेव मराठे, पो.ना. विजय दुसाने, ललित पाटील, प्रविण हिवराळे, सुशिल पाटील, अनिल मोरे, पो.कॉ. दिपक कोळी, दिपक राव यांच्य्या पथकाने तपासाची चक्रे वेगाने फिरवण्यास सुरुवात केली. पो.नि. रविकांत सोनवणे यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार या घटनेतील जबरी लुट करणारे टप्प्यात आले.

या गुन्ह्यातील रोहन उर्फ रॉनी मधुकर सपकाळे (दांडेकर नगर पिंप्राळा जळगाव) हा एका सिल्व्हर रंगाच्या सॅन्ट्रो कार (एमएच 19 क्यु 990) मधून खोटेनगर नजीक महामार्गावर फिरत असल्याचे पो.नि. रविकांत सोनवणे यांना समजले. त्यांनी तात्काळ आपल्या सहका-यांच्या मदतीने त्याला ताब्यात घेतले. त्याच्या ताब्यातील कारची तपासणी केली असता त्यात गावठी बनावटीचे पिस्तुल, एक धारदार चॉपर व एक लोखंडी धारदार चाकू तसेच जबरी चोरीतील सहाशे रुपये असा एवज मिळून आला. त्याची सखोल चौकशी केली असता त्याने त्याच्या साथीदारांची नावे कबुल केली. अनिकेत मधुकर सपकाळे (दांडेकर नगर जळगाव) व सतिष रविंद्र चव्हाण (ओमशांती नगर पिप्राळा रोड जळगाव) अशी नावे त्याने उघड केली. उर्वरीत दोघांना देखील ताब्यात घेत अटक करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here