जळगाव : गुगल जॉब या पोर्टलवर नोकरीसाठी नोंदणी केलेल्या तरुणाची दोन लाख रुपयात फसवणूक झाल्याप्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमोल रामचंद्र चव्हाण असे ऑनलाईन फसवणूक झालेल्या जळगाव तालुक्यातील म्हसावद येथील तरुणाचे नाव आहे.
अमोल रामचंद्र चव्हाण या तरुणाने गेल्या मार्च महिन्यात गुगल जॉब या पोर्टल वर नोकरी साठी ऑनलाईन नोंदणी केली होती. त्यानंतर 25 मार्च रोजी त्याला वेगवेगळ्या क्रमांकावरुन कॉल आले. पलीकडून बोलणा-या अरोरा व रेश्मा या दोघांनी त्याला नोकरी मिळणार असल्याचे सांगितले. मात्र त्यासाठी प्रोसेस करण्याकामी एचडीएफसी बॅंकेत सिंगल व जॉईंट असे दोन प्रकारचे खाते उघडण्यास सांगितले. तसेच त्या खात्यात दोन लाख रुपये जमा करण्यास सांगण्यास पलीकडून बोलणारे विसरले नाही. पलीकडून फोनवर मिळालेल्या माहितीनुसार अमोल चव्हाण याने 7 जून रोजी दाणा बाजार शाखेतील एचडीएफसी बॅंकेत दोन खाते उघडले व त्यात दोन लाख रुपये जमा केले. त्याला मिळालेल्या माहितीनुसार त्याने सिंगल खात्याचे एटीएम कार्ड काढले.
त्यानंतर अरोरा नामक व्यक्तीने पलीकडून बोलतांना त्याला पैसे जमा केलेल्या खात्याचे स्टेटमेंट व एटीएम कार्ड मागीतले व ते अमोल चव्हाण याने त्याला कुरीअरने लखनऊच्या पत्यावर पाठवले. त्यानंतर 8 जून रोजी अमोल चव्हाण याच्या जॉईंट खात्यातील 1,99,786.35 रुपये सिंगल खात्यात वळते झाले. त्यानंतर सिंगल खात्यातून 8 व 9 जून रोजी टप्याटप्याने दोन लाख रुपयांची कटोती झाली. त्यानंतर अरोरा व रेश्मा या दोघांनी त्याच्याशी संपर्क तोडला. आपली फसवणूक झाल्याची खात्री झाल्यानंतर अमोल चव्हाण याने एमआयडीसी पोलिस स्टेशनला रितसर कायदेशीर तक्रार दाखल केली. अमोल चव्हाण याने एक प्रकारे चोरांच्या हाती तिजोरीच्या चाव्या दिल्याचा हा प्रकार म्हणावा लागेल.