जळगाव : जळगाव औरंगाबाद महामार्गावरील लहान पुलांच्या निर्मीतीसाठी लागणा-या लोखंडी प्लेटसह इतर साहित्याची चोरी करणा-या व ते विकत घेणा-या चौघांना एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्या ताब्यातून चोरीच्या लोखंडी प्लेट व गुन्ह्यात वापरलेली रिक्षा जप्त करण्यात आली आहे.
शेख रफीक शेख रऊफ या ठेकेदाराने जळगाव ते फर्दापूर दरम्यान लहान पुलांच्या निर्मीतीचा सब कॉंन्ट्रॅक्ट घेतला आहे. या ठेकेदाराचे एमआयडीसी हद्दीतील मानराज शोरुम नजीक लहान पुलाचे काम सध्या सुरु आहे. या कामासाठी लागणा-या साहित्याची रखवाली करण्यासाठी ठेकेदार शेख रफीक याने कुसुंबा येथील रहिवासी दिलीप पाटील यांना वॉचमन म्हणून ठेवले आहे.
12 जूनच्या रात्री बांधकामासाठी लागणा-या साहित्याची चोरी झाल्याचे वॉचमन दिलीप पाटील यांच्या लक्षात आले. चोरटे रिक्षाने पळून जातांना त्यांना दिसले. दिलीप पाटील यांनी चोरट्यांच्या रिक्षाचा पाठलाग केला. मात्र त्यात त्यांना यश आले नाही. या घटनेची माहिती त्यांनी ठेकेदार शेख रफीक यास सकाळी 13 जुन रोजी दिली. बांधकामासाठी लागणा-या पन्नास हजार रुपये किमतीच्या दहा लोखंडी प्लेट, या प्लेटला सपोर्ट देणारे 9 लोखंडी जॅक, 3 एमएस पाईप, दहा क्रिप्स असा एकुण 94 हजार 500 रुपये किमतीचा माल चोरीला गेल्याचा प्रकार उघडकीस आला होता. या प्रकरणी ठेकेदाराने दिलेल्या फिर्यादीनुसार एमआयडीसी पोलिसात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याच्या तपासादरम्यान भंगार साहित्य खरेदी करणा-या दुकानांवर पाळत ठेवण्यात आली. दरम्यान सुप्रिम कॉलनी परिसरातील गोपाल दाल मिल नजीक असलेल्या आनंद बॅटरी या भंगार दुकानावर चोरटे चोरीचे साहित्य विक्री करण्यास येणार असल्याची माहिती पो.नि.शिकारे यांना समजली. माहिती मिळताच सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, किशोर पाटील, चेतन सोनवणे, मुकेश पाटील, सुधीर साळवे, असीम तडवी, मुदस्सर काजी, सचिन पाटील आदींना रवाना करण्यात आले.
पथकाने सागर फुलचंद जाधव (19) रा. पाणी पुरवठा ऑफीस जवळ, रामेश्वर कॉलनी, जळगाव व धिरज जगदीश ठाकुर (21) रा. श्रीकृष्ण नगर, शिरसोली, जळगाव ह. मु. खेडी बु. ता.जि. जळगाव या दोघांना चोरीच्या मालाची विक्री करतांना ताब्यात घेत चौकशी केली. चौकशीअंती त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांच्याकडून 25 हजार रुपये किमतीच्या लोखंडी प्लेट व 1 लाख रुपये किमतीची गुन्ह्यात वापरलेली रिक्षा जप्त करण्यात आली आहे. चोरीचे साहित्य त्यांनी आनंद बॅटरी या भंगार दुकानाचा मालक पुर्नवासी प्रल्हाद पासवान याला विकला होता. काही माल त्यांनी आर.एल. चौफुलीच्या पुढे असलेला भंगार व्यावसायिक इम्रान सादीक खाटीक याला देखील विकला होता. त्यामुळे चोरीचा माल विकत घेणा-या मालक पुर्नवासी प्रल्हाद पासवान व इम्रान सादीक खाटीक यांना देखील काल 13 जुन रोजी अटक करण्यात आली. तपास अधिकारी चेतन सोनवणे यांनी न्या. प्रीती श्रीराम यांच्यासमक्ष अटकेतील चौघांना हजर केले. त्यांना दोन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले.