सोयाबिन परस्पर विकून जमा केली रक्कम ! — ट्रकचालकाच्या खूनाचा तपास झाला भक्कम!!

अमरावती : नारायण गणेश घागरे हा मध्य प्रदेशातील छिंदवाडा येथील रहिवासी होता. तो भाड्याच्या घरात रहात होता. काहीतरी व्यवसाय करुन चांगले पैसे कमावण्याचे त्याचे उद्दीष्ट होते. त्याच्याकडे पाच एकर शेत होते. शेत विकून व्यवसाय करण्याचे त्याने मनाशी ठरवले होते. दोन वर्षापुर्वी त्याने त्याचे पाच एकर शेत विक्रीस काढले. शेत खरेदी करणारा चांगला ग्राहक त्याला मिळाला. या व्यवहारात नारायण घागरे याला चांगली रक्कम मिळाली. या रकमेतून त्याने दोन ट्रक खरेदी करण्याचे ठरवले. ट्र्क खरेदीसाठी काही रक्कम कमी पडत होती. त्यामुळे त्याने बॅंकेतून कर्ज काढून रकमेची तरतूद करत दोन ट्रक खरेदी केल्या. दोन ट्रक खरेदीच्या व्यवहारात त्याच्याकडील पैसे संपले होते. शिवाय बॅंकेचे हप्ते देखील सुरु झाले होते. दोन ट्रकचा मालक नारायण घागरे हा अद्याप भाड्याच्या घरातच रहात होता. त्यामुळे स्वत:च्या घरात जाण्याचे देखील त्याचे स्वप्न होते. या स्वप्नपुर्तीसाठी तो प्रयत्नशील होता.

हळूहळू तो ट्रकद्वारे मालवाहतूकीच्या व्यवसायात रुळला. छिंदवाडा येथीलच रहिवासी असलेले प्रकाश साहू आणि नंदकिशोर उईके हे दोघे जण त्याच्या ट्रकवर चालकाचे काम करत होते. दोघा चालकांच्या बळावर नारायण घागरे याचा मालवाहतूकीचा व्यवसाय व्यवस्थित सुरु होता. मात्र कालांतराने देशात सर्वत्र लॉकडाऊन सुरु झाले. जेमतेम रुळावर आलेली अनेकांची व्यवसायाची गाडी लॉकडाऊन कालावधीत बिघडली. त्याला नारायण घागरे हा देखील अपवाद नव्हता.

लॉकडाऊन संपल्यानंतर पुन्हा व्यवसायाची गाडी रुळावरुन धावण्यास सुरुवात झाली. ट्रकच्या कर्जाचे हप्ते सुरु झाले होते. तरीदेखील भाड्याच्या घरातून स्वत:च्या घरात जाण्याचा नारायणचा मोह काही केल्या सुटत नव्हता. त्यासाठी काहीही करुन झटपट श्रीमंतीचा मार्ग पत्करण्याची त्याने मनाशी तयारी चालवली होती. त्याच्या मनात विविध कुविचार येण्यास सुरुवात झाली होती. मोह हे दुखा:चे कारण असते. अती मोह मनुष्याला विनाशाच्या दिशेने घेऊन जात असतो. याची जाणीव मनुष्याला वेळीच होणे गरजेचे असते. मात्र कित्येक जण मोहाच्या पाशात गुरफटत जातात. त्यांना मोहाच्या व्यतिरिक्त दुसरे जग दिसतच नाही. अशीच काहीशी अवस्था नारायण घागरे याची झाली होती. 

झटपट पैसे मिळवण्यासाठी त्याने आपल्याच दोघा चालकांची मदत घेण्याचे ठरवले. अकोला येथे माल घेऊन गेलेल्या ट्रकला परतीच्या प्रवासात नागपूरसाठी सोयाबिन वाहतूकीचे भाडे मिळते हे नारायण याच्यासह त्याच्या दोन्ही चालकांना चांगल्या प्रकारे माहित होते. अकोला येथे ट्रकने माल वाहतूकीचा योग आला तर परस्पर सोयाबीन चोरी करुन परस्पर विक्री केल्यास आपल्याला मोठी रक्कम मिळू शकते असा कुविचार त्याच्या मनात चमकून गेला. अकोला येथे ट्रिप लागण्याची गेल्या दिड महिन्यापासून तो आतुरतेने वाट बघत होता. अखेर त्याला अकोला येथील मालवाहतुकीची ट्रिप लागली.  त्यामुळे ट्रकमालक नारायण घागरे, चालक प्रकाश साहू व नंदकिशोर उईके या तिघांनी सोयाबिन परस्पर विक्रीचा आणि ते सोयाबीन चोरी झाल्याचे सांगायचे, असा कट रचला.

मयत नंदकिशोर उईके

4 जून रोजी छिंदवाडा येथून दोघा चालकांनी ट्रकमधे वालपुट्टी भरली. दोन्ही ट्रकमधे भरलेली वालपुट्टी त्यांना अकोला येथे रिकामी करुन द्यायची होती. अकोला येथे वालपुट्टीने भरलेला ट्रक रिकामा झाल्यानंतर मिळेल त्या भावात सोयाबीनची ट्रिप नागपुरसाठी घ्यायची होती. ठरल्यानुसार दोघे चालक वालपुट्टीने भरलेले ट्रक घेऊन अकोलाच्या दिशेने रवाना झाले. वालपुट्टी अकोला येथे रिकामी केल्यानंतर दोघांनी 250 क्विंटल सोयबीन ट्रकमधे भरली. हे सोयाबीन त्यांना नागपुरनजीक बुटीबोरी येथील एका कारखान्यात नेवून द्यायचे होते. मात्र त्यांनी पुर्वनियोजनानुसार सोयाबीनची डिलीव्हरी केलीच नाही.  सोयाबीनने भरलेले ट्रक प्रकाश व नंदकिशोर या दोघांनी संगनमताने नांदगाव पेठ आणि वरुडमार्गे छिंदवाडा येथे नेले. हा चोरीचा पुर्वनियोजित कट असल्यामुळे नंदकिशोर याने अगोदरच छिंदवाडा येथील एका व्यापा-याशी खरेदी विक्रीचा व्यवहार सुरु केला होता. मात्र हा चोरीचा माल असल्याचे लक्षात आल्यामुळे तो व्यापारी मनातून घाबरला. त्याने ऐनवेळी तो 250 क्विंटल सोयाबीनचा माल घेण्यास नकार दिला. आता काय करावे हे दोघा चालकांना सुचेना. प्रकरण अंगाशी येऊ शकते असे लक्षात आल्यामुळे ट्रकमालक नारायण घागरे याने ते सोयाबीन नियोजीत नागपुर – बुटीबोरी येथील कारखान्यावर पोहोचवून देण्यास दोघा चालकांना सांगितले. मात्र दुसरा चालक प्रकाश साहू याने दुस-या व्यापा-यासोबत सोयाबीन विक्रीचा व्यवहार करण्यास सुरुवात केली. साडे अठरा लाखाचे सोयाबीन बारा लाखात छिंदवाडा येथील एका व्यापा-याला विकण्यात आले. 5 जून रोजी दोन्ही ट्रक रिकामे करण्यात आले.

हातात लाखो रुपयांची रक्कम आल्यानंतर ट्रकमालक नारायण घागरे, चालक प्रकाश साहू व नंदकिशोर उईके असे तिघे जण मध्यप्रदेशातच एका जागी बसले. तिघांनी तेथे यथेच्छ मद्यपान करत भोजन केले. मद्यपान करत असतांना ट्रकमालक नारायण घागरे व प्रकाश साहू यांना नंदकिशोर याच्यावर संशय येऊ लागला. त्याचे कारण म्हणजे नंदकिशोर उईके हा अति प्रमाणात मद्य सेवन करणारा होता. मद्याच्या नशेत गोपनीय गोष्टी सार्वजनीक ठिकाणी कथन करण्याची त्याल सवय होती. त्यामुळे हा सोयाबीन चोरीचा व विक्रीचा प्रताप तो मद्याच्या नशेत कुठेही बरळू शकतो अशी शंका दोघांना आली. त्यामुळे नंदकिशोर उईके याला या जगातून कायमचे घालवण्याचा दोघांनी विचार केला. आपले बिंग नंदकिशोरच्या माध्यमातून केव्हाही बाहेर येऊ शकते ही चिंता दोघांना सतावत होती. त्यामुळे प्रकाश साहू व नारायण घागरे या दोघांनी मिळून मध्यप्रदेशातील जामसावलीच्या जवळपास नंदकिशोरचा दोरीने गळा आवळून खून केला. प्रकाशने त्याचा मृतदेह तेथून जवळपास 110 किलोमिटर अंतरावर मोर्शी मार्गावर ट्रकने आणून रस्त्याच्या कडेला फेकला. दरम्यान ट्रकमालक नारायण घागरे हा कारने ट्रकच्या मागेमागेच होता. मयत नंदकिशोरचा चेहरा कुणाला समजू नये म्हणून दगडाने ठेचून विद्रुप करण्यात आला. मृतदेह रस्त्याच्या कडेला फेकून दिल्यानंतर प्रकाश साहू याने तो ट्रक नांदगाव पेठनजीक मुद्दाम बेवारस सोडून दिला. या घटनाक्रमानंतर प्रकाश साहू व ट्रकमालक घागरे हे दोघे जण कारने छिंदवाड्याला परत गेले.

त्यानंतर 8 जून रोजी सकाळी शिरखेडच्या हद्दीत नंदकिशोर उईके याचा मृतदेह परिसरातील लोकांना आढळून आला. या घटनेची माहिती शिरखेड पोलिसांना कळवण्यात आली. माहिती मिळताच शिरखेड पोलिस स्टेशनचे पोलिस पथक घटनास्थळी हजर झाले. पोलिसांसह सर्वांच्याच दृष्टीने नंदकिशोरचा मृतदेह अनोळखी होता. मयताच्या हातावर नंदकिशोर असे गोंदलेले होते. त्याची हत्या झाल्याचे दिसून येत होते. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध शिरखेड पोलिस स्टेशनला खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. सदर गुन्हा भाग 5 गु.र.न. 172/21 भा.द.वि. 302, 201 नुसार दाखल करण्यत आला. दरम्यान शिरखेड पोलिसांनी शोधपत्रिकेच्या माध्यमातून मयताचा फोटो प्रसिद्ध करुन ओळख पटवण्याचा प्रयत्न केला.

आपल्या ट्रकचालकाचा कुठेही थांगपत्ता लागत नसल्याचे भासवत ट्रकचालक नारायण घागरे हा नांदगाव पेठ पोलिस स्टेशनला स्वत:हून हजर झाला. आल्यावर त्याने पोलिसांना सांगितले की माझ्या मालकीचा ट्रक हा नांदगाव पेठजवळ उभा आहे. मात्र त्यावरील चालक नंदकिशोर सकुल उईके हा गायब आहे. चर्चेअंती शिरखेड पोलिसांनी प्रसिद्ध केलेली शोधपत्रीका व त्यावरील मयताचा फोटो त्याला दाखवला. त्यावर हा आपलाच बेपत्ता चालक नंदकिशोर असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले.  मयत हा ट्रकचालक असून त्याचे नाव नंदकिशोर सकुल उईके (रा. छिंदवाडा – मध्यप्रदेश) असल्याचे पोलिसांसाठी निष्पन्न झाले.

अमरावती ग्रामीण पोलिस अधिक्षक हरी बालाजी एन यांच्या मार्गदर्शनाखाली या गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. तपन कोल्हे यांच्याकडे देण्यात आला. पो.नि. तपन कोल्हे यांनी या गुन्ह्याच्या तपासकामी आपली तपासचक्रे वेगाने फिरवण्यास सुरुवात केली. पोलिसांना माहिती देणारा ट्रकचालक किती प्रमाणात खरे व किती प्रमाणात खोटे बोलत आहे याची सत्यता पडताळून पाहण्यास त्यांनी सुरुवात केली. तपासादरम्यान परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. अकोला मार्गावरील एका पेट्रोलपंपावर असलेल्या सीसीटीव्हीच्या फुटेज तपासले असता मयत नंदकिशोरसोबत अजून एक जण होता. त्यामुळे पोलिस पथकाचा नारायण घागरेवरील संशय बळावला. त्याची कसून चौकशी केली असता त्याने आपला गुन्हा कबुल केला. दरम्यान दुसरे पथक 12 जून रोजी छिंदवाडा येथे जावून धडकले. तेथे त्यांच्या हाती प्रकाश साहू लागला. प्रकाश साहू यास चौकशीकामी ताब्यात घेण्यात आले. त्याला पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर त्याने देखील सत्य उलगडले. दोघांनी कबुल केल्याप्रमाणे छिंदवाडा येथून चोरीचे विक्री केलेले सोयाबीन जप्त करण्यात आले.

अशा प्रकारे अमरावती ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि.तपन कोल्हे यांच्यासह स.पो.नि. गोपाल उपाध्याय, पो.उ.नि. विजय गराड, सुरज सुसतकर, आशिष चौधरी यांनी कठोर परिश्रम घेत हा गुन्हा उघडकीस आणला. घर बांधण्यासाठी रक्कम हवी असल्यामुळे ट्रक मालक नारायण घागरे याने आपल्या चालकांच्या मदतीने सोयाबीनचा माल परस्पर विकून लाखो रुपये मिळवले. बिंग उघडकीस येऊ नये म्हणून चालक नंदकिशोर उईके याचा खून केला. मात्र एवढे करुन नारायण घागरे याच्या हाती काहीच आले नाही. त्याचा एक चालक त्याच्यासोबतच जेलमधे गेला. त्याला भाड्याच्या घरातून जेलमधे जाण्याची वेळ आली. त्याच्या ट्रकच्या कर्जाचे हप्ते सुरुच राहिले. झटपट श्रीमंत होण्यासह नविन घर बांधण्याचे स्वप्न नारायण पुर्ण करु शकला नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here