मुंबई : वयाच्या सत्तराव्या वर्षी एकटेपणा घालवण्यासाठी आजोबांचे लग्न ठरले. नातवंडांसोबत वेळ घालवण्याच्या दिवसात सत्तर वर्षाच्या आजोबांनी 44 वर्षाच्या पत्नीसोबत संसार थाटण्याचे ठरवले. आजोबांच्या मित्रांनी त्यांचे लग्न जुळवण्यासाठी प्रयत्न केला व त्यात यश देखील आले.
मात्र लग्नासाठी आवश्यक असलेले कायदेशीर सोपास्कार पुर्ण करण्याआधीच नववधूने घरातील दीड लाख रुपये, दागिने आणि मालमत्तेची कागदपत्रे घेऊन फरार होण्याचे काम केले. आजोबा आता पोलिस स्टेशनच्या चकरा मारत आहेत.
राजस्थानचे मुळ रहिवासी असलेले आजोबा उत्तर मुंबईत वास्तव्याला आहेत. सन २०१८ मध्ये त्यांच्या पत्नीचे निधन झाले. मूलबाळ नसल्याने आजोबा निराधार झाले होते. ते विविध व्याधींनी त्रस्त झाले होते. त्यामुळे मित्रांच्या सल्ल्याने त्यांनी लग्न करण्याचे ठरवले.
जयपूर येथील ४४ वर्षाच्या घटस्फोटित महिलेसोबत ते लग्न करण्यास तयार झाले. ते स्थळ त्यांना आवडले होते. विवाहापुर्वीच आजोबांनी कपाटाच्या चाव्या नियोजीत वधूच्या हाती सोपवल्या होत्या. मात्र लग्नापुर्वीच त्यांची भावी पत्नी मुद्देमालासह फरार झाली. गेल्या वर्षी झालेल्या या फसवणूकीची तक्रार नुकतीच काही दिवसांपुर्वी आजोबांनी पोलिस स्टेशनला दाखल केली आहे.