औरंगाबाद : मुंबई पोलिस दलातील सहायक पोलिस निरिक्षक महिलेने आपल्यावर झालेल्या अत्याचार प्रकरणी पवई पोलिसात तिघांवर गुन्हा दाखल केला होता. यातील एकाने अत्याचार केला होता तर इतर दोघांनी त्या घटनेचे चित्रीकरण केले होते. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी एकाला औरंगाबाद येथून अटक केली आहे. एमआयडीसी सिडको परिसरात सदर अटकेची कारवाई करण्यात आली आहे. अत्याचाराच्या चित्रीकरणाच्या बळावर दोघांनी सहायक पोलिस निरीक्षक महिलेस तिघांनी ब्लॅकमेल केल्याचे उघड झाले आहे.
संदीप भारत ठाकूर (38) रा. श्रद्धा कॉलनी, म्हाडा कॉलनी औरंगाबाद असे अटक करण्यात आलेल्या संशयीत आरोपीचे नाव आहे. संदीपची पत्नी त्याला सोडून माहेरी निघून गेली होती. त्यामुळे विवाह जुळवून देणा-या वेब साईटवर लग्नास इच्छुक म्हणून नावाची नोंदणी केली होती. पिडीत सहायक पोलिस निरीक्षक महिलेने देखील तिच्या पतीपासून काडीमोड घेतला आहे. तिने देखील विवाह जुळवून देणा-या वेब साईटवर नोंदणी केली होती. या माध्यमातून तिचा संदीप सोबत परिचय झाला. आपण बॅंकेत कामाला असल्याचे त्याने स.पो.नि. महिलेस कथन केले होते. दोघांची मैत्री दिवसेंदिवस वाढत होती. दोघे एकमेकांना मुंबईत भेटले होते. त्यावेळी संदीपने तिला पिण्यास दिलेल्या कोल्ड ड्रिंकमधे गुंगीचे औषध टाकल्याचा आरोप आहे. त्यावेळी संदीपने स.पो.नि. महिलेवर केलेल्या अत्याचाराचा अन्य दोघांनी एक व्हिडीओ तयार केला. त्यानंतर संदिपची पत्नी पुन्हा त्याच्यासोबत राहण्यास आली. त्यामुळे दोघातील संबंध संपुष्टात आले. दोघे विभक्त होत आपल्या मार्गाला लागले.
काही दिवसांनी सहायक पोलिस निरीक्षक महिलेचे सैन्यातील एका जवानासोबत विवाह ठरला. याबाबत संदिपला समजताच त्याने त्याच्याजवळ असलेला अत्याचाराचा व्हिडीओ तिच्या भावी सैनिक पतीला पाठवला. त्यामुळे संतप्त झालेल्या सहायक महिला पोलिस निरीक्षकाने 12 जून रोजी पवई पोलिस स्टेशनला तिघा जणांविरुद्ध तक्रार दाखल केली. त्यानुसार पवई पोलिसांचे एक पथक औरंगाबादला दाखल झाले. त्यांनी सापळा रचत मुख्य संशयीत आरोपी संदीप भारत ठाकुर याला अटक केली.