राजभवनात भुताटकी? अंगारा ! धुपारा !! “बारा”चा उतारा

महाराष्ट्राच्या राज्यपाल भवनात सध्या भुताटकीचा खेळ सुरु झाल्याचे म्हणतात. आता भुतावळीचा खेळ म्हटला म्हणजे जुन्या पद्धतीप्रमाणे अंगारा – धुपारा असा उपाय सुचवला जातो. त्यामुळे लॉकडाऊनचा फटका बसलेल्या “भगतां”ना म्हणे कोंबड – बोकडबळीचा लाभ होतो. अलिकडे अंधश्रद्धा निर्मुलनवाले सक्रीय झाले आणी राज्याची विधानसभा जादू टोणा विरोधी कायदा संमत करुन बसलीय. त्यामुळे की काय राज्य सरकारने राज्यपालांकडे पाठवलेली कथित बारा संभाव्य आमदारांच्या नावांची यादी अचानक गायब होऊन पुन्हा अवतरली. खर तर याचे श्रेय माननीय अण्णा हजारे यांनाही द्यायला हवे.

या अण्णांनी माहिती अधिकाराचा कायदाच जनसेवेत रुजू केल्याने राज्यपालांनी नियुक्त करावयाच्या संभाव्य बारा आमदारांच्या यादीचे अचानक गहाळ होणे आणि पुन्हा प्रकट होणे असे दोन चमत्कार घडले. या बारा जणांच्या यादीला राज्यपालांनी संमती दिल्यानंतर महाराष्ट्राच्या 15 कोटी लोकांच्या कल्याणासाठी स्वत:ला जुंपून घेणा-या विधानसभेच्या 288 आमदारांच्या संख्येत आणखी “बारा”ची भर पडून तब्बल 300 आमदारांची फौज दिसून आली असती. महाविकास आघाडी सरकारच्या शपथविधीपासूनच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याशी संघर्ष पेटल्याचे दिसते. हे राज्यपाल महोदय तसे पहाटेच्या शपथविधी समारंभापासूनच गाजताहेत.

अत्यंत तडफदार माणूस. “आराम हराम है” चा पालनकर्ता. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीतून अशीच देशप्रेमी – कर्तव्यपरायन माणसं घटात म्हणे – विचारा नितीन गडकरींना, देवेंद्र फडणवीसांना, एकनाथराव खडसेजींना. भाजपात राहून खडसेजी पाटबंधारे मंत्री बनले होते. फडणवीस राजवटीत तर त्यांनी बारा खात्यांचा कारभार केवळ दोन हातांनी हाताळला होता. हे बघून तेव्हा महाराष्ट्राला व्ही. शांताराम निर्मीत “दो आखे बारा हात” चित्रपटाची आठवण झाली असावी. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची महत्वाकांक्षी स्वप्न उराशी बाळगून तस जाहीरपणे सांगून टाकणा-या या बिनधास्त नेत्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात आमदारकीचे पुनर्वसन होण्याआधीच त्यांना रोखण्यासाठी भानामती – भुताटकी प्रयोग करणा-या नतद्रष्टांना काय म्हणावे?

शांताराम बापूंचा सुधारणावादी विशाल मनाचा चित्रपट आठवण्याऐवजी यांना “एक गाव बार भानगडी” आठवतो. राज्यात तिन राजकीय पक्षांचे तिन विचारांचे सरकार जनतेच भल करण्यासाठी सत्तेत येऊन बसलं. त्यापुर्वी दिल्ली ते मुंबई असा मोठ्ठा कानठळ्या बसवणारा धमाका गाजला. “बंद दारा” आडच्या भेटीत दिलेला शब्द पाळत नाहीत म्हणजे काय? कोण म्हणजे स्वत:ला कोण समजतात हे? असली बेईमानी शिवबांचा महाराष्ट्र कधीच सहन करणार नाही! आमचा स्वाभीमानाचा इतिहास आहे. आमच्या “राजांनी” अफजलखानाचा “कोथळा” काढलाय! शाहीस्तेखानाची बोटं तोडली. महाराजांच्या ईमानी सेवकाने “सय्यद बंडा”चा हात उडवलाय. अशा जाज्वल्य इतिहासाच्या साक्षीनं आमच्या रोमारोमात स्वाभिमान भिनलाय. आमच्या धमन्यांमधून केवळ रक्त नव्हे तर स्वाभिमान सळसळतो. गद्दारी दिसली रे दिसली की अंगाची लाहीलाही होते. म्हणूनच मागील एका खेपेला “युती” तोडण्याची घोषणा करणाराच्या “सातशे पिढ्यांचा” उद्धार केला होता.

कधी काळी जिथं चांदण्या वेचल्यात तिथे त्यांच्यावर “गोव-या” वेचण्याची वेळ आल्याची जाणीव आमच्या “भाला फेकीच्या” शार्प शूटरने करुन दिली होती. आमची सत्ता येताच त्यांनी ही मुंबईत धाव घेऊन सरकारला शुभेच्छा दिल्यात. मनाचा मोठेपणा दाखवला. त्यांची ही कृतीही यांना खुपली. उद्याच्या भवितव्याची बेगमी म्हणून नतद्रष्ट करवादले (बोंबलले). कायदेशीर तरतुदीच्या वापरातून प्रत्येकी चार आमदार वाढतात म्हटल्यावर शिल्पकाराच्या रचनेतून पुढे आलेल्या बारा जणांची यादी आम्हीही मोठ्या मनाने पाठवून दिली. लगेच यांच्यातल्या “दुश्मनी – पार्ट 2” ने उसळी मारली. कधी म्हटले यादी गायब – गहाळ झाली, उंदरांनी कुरतडली. उंदरांनी खाल्ली की राजभवनात भुताटकी संचारली? आता म्हणतात यादी सापडली. मग करा की मंजूर?

महाराष्ट्रावर कोविडचे संकट कोसळल. लागलीच दोन मंत्र्यांची विवाहबाह्य प्रेमप्रकरणं गाजली. एकाची विकेट गेली. शंभर कोटीच्या प्रकरणात वाझे – परमबीर गाजले. आता आणखी एका मंत्र्यामागे तिनशे कोटीच्या भ्रष्टाचाराच लचांड लाऊ पाहताहेत. या भानगदिने महाराष्ट्र पार हैरान झालाय. यांचा “मिडीयासेल” रोज सरकार पाडण्याच्या भाकडकथा पेरतोय. तेव्हा महाराष्ट्राच्या सेवेसाठी 288 आमदारांची नव्हे आमची 217 ची ताकद कमी पडतेय. हे बघून तरी भुताटकी – अंगारा – धुपारा या गोष्टी बंद करुन महाराष्ट्राच्या सेवेत “बारा”चा उतारा रुजू करायला काय हरकत आहे. त्यात देखील या श्रेय नामावलीबद्दल “पण – परंतू” वाटलेच तर केंद्र सरकारकडे पॉवरफुल्ल “ईडी” “सीबीआय”, “एनसीबी” आहेच की?    

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here