अमरावती : अमरावती ग्रामीण पोलिस स्टेशन हद्दीत मोटार सायकल चोरीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले होते. दिवसेंदिवस मोटार सायकल चोरीचे वाढते प्रकार हा पोलिस प्रशासनाच्या दृष्टीने चिंतेचा विषय झाला होता. त्या अनुषंगाने अमरावती ग्रामीण पोलिस अधिक्षक हरी बालाजी यांच्या निर्देशाखाली या चोरीच्या तपासाचे एक अभियान राबवण्यात आले होते. त्यानुसार गोपनीय पद्धतीने कामकाज सुरु होते. त्या कामकाजाला यश आले असून मोटार सायकल चोरीचे मोठे रॅकेट उघडकीस आले आहे.
चांदुरबाजार, ब्राम्हणवाडा थडी व शिरजगाव कसबा या पोलिस स्टेशनच्या माध्यमातून तपासाचे संयुक्त अभियान राबवण्यात आले. चोरी होत असलेल्या मोटारसायकलींबाबत तांत्रीक व खबरींच्या माध्यमातून तपास सुरु होता. मिळालेल्या माहितीच्या आधारे तिघा पोलीस स्टेशनच्या अधिकारी व कर्मचा-यांनी सर्वप्रथम उज्वल दिलीपराव बोराडे, (22) रा. सोनोरी, ता. चांदुर बाजार यांस ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडे सदर चोरीस गेलेल्या मोटारसायकल बाबत विचारणा केली असता त्याने चोरी केलेल्या मोटारसायकली पवन मनोहर वाहाने (25) रा. माधान, ता. चांदुर बाजार याच्याकडुन घेतल्याचे त्याने कथन केले. त्यानंतर पवन वाहाने यांस ताब्यात घेवुन विचारणा केली असता त्याने चोरी केलेल्या आणखी काही मोटारसायकली संकेत किशोर मेश्राम (21) रा. पिंपरी, ता. चांदुर बाजार व नौशाद अली रहमान शाह (27) रा. शिरजगाव बंड यांस दिल्याचे सांगीतले.
त्याबाबत तपासाची चक्रे गतीमान करुन तिघा पोलिस स्टेशन स्तरावर विविध पथके तयार करण्यात आली. नौशाद अली रहमान शाह याने चोरीच्या मोटारसायकली आणखी दोन एजंटला विक्री करण्यास दिल्याबाबत माहीती मिळाली. त्या माहीतीच्या आधारे देवानंद विजय नागपुरे (28) रा. हैदतपुर वडाळा, ता. चांदुरबाजार व एजंट अन्सार शहा दिलबर शहा (27) रा. शिरजगाव बंड, ता. चांदुर बाजार यांस ताब्यात घेवुन मोठयाप्रमाणात चोरीच्या दुचाकी जप्त करण्यात आल्या. ताब्यातील सर्व आरोपींकडुन माहीती घेतली असता चोरी केलेल्या मोटारसायकलच्या डुप्लीकेट आरसी तयार करण्याचे काम सरफराज मन्सुर अली शहा (24) रा. शिरजगाव बंड, ता. चांदुर बाजार यांने केल्याचे तपासात उघड झाले.
त्यावरुन सदर सरफराज मन्सुर अली शहा यांस पथक पाठवुन ताब्यात घेण्यात आले. त्याने चोरीच्या वाहनांची डुप्लीकेट आरसी बनवुन ग्राहकांना देत असल्याचे कबुल केले. वरील सर्व आरोपीकडुन विविध कंपनीच्या एकुण 29 दुचाकी किंमत अंदाजे किंमत 20 लाख 30 हजार रुपयांचा मुददेमाल पोलीसांनी जप्त केला आहे. ताब्यातील आरोपींकडे अजून विचारपुस करुन अधिक दुचाकी जप्त करण्याकामी पथके रवाना करण्यात आली आहेत. चोरी गेलेल्या मोटारसायकल मधे पोस्टे चांदुरबाजार, पोस्टे ब्राम्हणवाडा थडी, पोस्टे शिरजगाव कसबा, पोस्टे परतवाडा, पोस्टे मोर्शि, पोस्टें शिरखेड तसेच पोस्टे बडनेरा, अमरावती शहर व पोस्टे आणि जिल्हा यवतमाळ येथील मोटारसायकल चोरीचे मोठया प्रमाणात गुन्हे उघड झाले आहेत.
पोलीस अधिक्षक हरी बालाजी एन, अप्पर पोलीस अधिक्षक श्याम घुगे, उपविभागीय पोलीस अधिकारी पी. जे. अब्दागिरे, अचलपुर विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनिल व्ही. किनगे, सहायक पोलीस निरीक्षक दिपक वळवी, सहायक पोलीस निरीक्षक पंकज व्ही. दाभाडे, सहा. पोलीस निरीक्षक नरेंद्र पेन्दोर, पोलिस उपनिरीक्षक संजय शिंदे, पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र टेकाडे, पोलिस उपनिरीक्षक दादाराव पंधरे, हवालदार साहेबराव राजस, रविंद्र शिंपी, किसन सपाटे, विनोद इंगळे, मधुकर भास्कर, सुरेश धाकडे, संजय मांडोकार, मालेंद्र रोडे, नापोका दिनेश वानखडे, कैलास खेडकर, प्रशांत भटकर, विरेंद्र अमृतकर, निकेश नशिबकर, भुषण पेठे, पुरुषोत्तम माकोडे, विजय आसोलकर, पोकॉ महेश काळे, महेंद्र राउत, राहुल मोरे, नितेश वाघ, अंकुश अरबट, अभय हरदे, विनीत शिरसागर यांनी कारवाईत सहभाग घेतला.