जळगाव : मध्यरात्री बारा वाजेच्या सुमारास जळगाव शहरातून जाणा-या महामार्गावरील लढ्ढा फार्म हाऊस नजीक झालेल्या अपघातप्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लोकेश धनाजी बेंडाळे (रा. पुणे) हे आपल्या परिवारासह मध्यरात्री बारा वाजेच्या सुमारास कारने हॉटेल कस्तुरीच्या मागे जात होते. दरम्यान लढ्ढा फार्म हाऊसनजीक पलीकडून भरधाव वेगात येणा-या कारचालकाने लोकेश बेंडाळे यांच्या ताब्यातील कारला जोरदार धडक दिली. या धडकेत लोकेश बेंडाळे यांच्या ताब्यातील कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तसेच त्यांच्यासह त्यांची मेहुणी यांना मुकामार लागला. यावेळी धडक देणा-या मद्याच्या नशेतील कारचालकाने लोकेश बेंडाळे यांना शिवीगाळ देखील केली.
या घटनेप्रकरणी आज पहाटे अडीच वाजता एमआयडीसी पोलिस स्टेशनला कारचालक सिद्धार्थ अर्जुन कांबळे (रा. गुजराल पेट्रोल पंपच्या मागील बाजूस जळगाव) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्हा भाग 5 गु.र.न. 403/2021 भा.द.वि. 279, 337, 427, 504 तसेच मोटार वाहन कायद्यानुसार दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळाला हे.कॉ. विनोद बोरसे यांनी भेट दिली. पोलिस नाईक संतोष पवार यांनी गुन्हा दाखल केला असून पो.नि. प्रताप शिकारे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास हे.कॉ. संजय भोई करत आहे.