ठेकेदाराची लुट करणारा तिसरा अटकेत

जळगाव : जळगाव औरंगाबाद महामार्गावरील पुल निर्मीतीचे काम हाती घेतलेल्या ठेकेदाराची लुट करणा-या तिस-या आरोपीस एमआयडीसी पोलिसांच्या शोध पथकाने अटक केली आहे. आकाश अशोक गायकवाड असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

ठेकेदार सुधीर व्यंकटेश्वर रवीपती (आंध्रप्रदेश) यास 3 एप्रिलच्या मध्यरात्री तिघांनी मिळून मारहाण केली होती. एकाने लिफ्ट मागण्याच्या बहाण्याने कारमधे बसून इतर दोघांनी वाहन अडवून ठेकेदार सुधीर रवीपती याची मारहाणीसह लुट केली होती. या घटनेत सुधीर रवीपती याच्या गळ्यातील 16 ग्रॅम वजनाची सोन्याची चेन, पाच ग्रॅम वजनाच्या प्रत्येकी दोन अंगठ्या व रोख रक्कम असा 1 लाख 2 हजार दोनशे रुपयांचा ऐवज लंपास करण्यात आला होता. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेतील निवृत्ती उर्फ भगवान शांताराम बाविस्कर व राहुल रामदास कोळी (दोघे रा. मेस्को माता नगर जळगाव) यांना 5 एप्रिल रोजी अटक करण्यात आली असून दोघे न्यायालयीन कोठडीत आहेत. फरार आकाश अशोक गायकवाड (रामेश्वर कॉलनी जळगाव) यास 20 जून रोजी अकरा वाजता अटक करण्यात आली आहे. गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल तपासकामी जप्त करण्यात आली आहे.

गुन्हा घडल्यापासून आकाश गायकवाड हा फरार होता. तो रहात असलेल्या मुळ गावी बुलढाणा येथे पोलिस पथक   त्याच्या शोधार्थ गेले होते. मात्र त्याने पोलिसांना गुंगारा देत तेथून पलायन केले होते. तो काही दिवस पंजाब राज्यात पळून गेला होता. तो जळगाव शहरात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक प्रताप शिकारे यांना समजली. त्याला अजिंठा चौफुली येथून सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, आनंदसिंग पाटील, किशोर पाटील, मुकेश पाटील, चेतन सोनवणे, आसीम तडवी, योगेश बारी, सचिन पाटील यांच्या पथकाने ताब्यात घेत अटक केली. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल मोरे व रतिलाल पवार करत आहेत. यापूर्वी देखील आकाश याने अशाच स्वरुपाचे गुन्हे केले आहेत. त्याच्याकडून बरेच गुन्हे उघडकीस येणार असल्याचे म्हटले जात आहे. आकाश यास न्या. ए.एस.शेख  यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले असता त्यास दोन दिवस पोलिस कोठडी सुनावण्यात आली. सरकारतर्फे अ‍ॅड. प्रिया मेढे यांनी कामकाज पाहिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here