जळगाव : जळगाव एमआयडीसीतील स्पेक्ट्रम या कंपनीतील अधिकारी व कर्मचा-यांच्या संगनमताने चालकाच्या माध्यमातून होणारी चोरी सिक्युरिटीमुळे उघडकीस आली आहे. या प्रकरणी तांब्याच्या पट्ट्या व पितळी कॉईलचा मुद्देमाल चोरी होण्यापासून बचावला आहे. या घटनेप्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशनला रितसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेतील चालकास अटक करण्यात आली असून कंपनीतील दोघे फरार आहेत. पोलिस त्यांच्या मागावर आहेत.
भुषण प्रकाश कोळी हे स्पेक्ट्रम कंपनीत सिक्युरिटीची नोकरी करतात. 20 जून रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास ते ड्युटीवर हजर होते. रात्री सव्वा आठ वाजेच्या सुमारास दिपक यशवंत चौधरी या चालकाने त्याच्या ताब्यातील छोटा हत्ती (एमएच 19 सीवाय 370) हे वाहन कंपनीच्या गेटवर आणले. सिक्युरिटी भुषण कोळी यांनी कंपनीतील स्टोअर सुपरवायझर जिवन चौधरी यांची संमती मिळाल्यानंतर सदर छोटा हत्ती हे रिकामे वाहन आत सोडण्यात आले. काही वेळाने भरलेल्या वाहनासह स्टोअर किपर जिवन चौधरी व कर्मचारी हितेश कोल्हे असे दोघे देखील गेटवर आले. वाहन गेटवर आल्यानंतर भुषण कोळी यांना संशय आला. त्यांनी भरलेले वाहन तपासण्यास सुरुवात केली असता स्टोअर किपर जिवन चौधरी यांनी आडकाठी आणली. भरलेल्या वाहनाची तपासणी केली असता त्यात तांब्याच्या पट्ट्या व पितळी कॉईल असा 2 लाख 52 हजार रुपयांचा मुद्देमाल आढळून आला. दरम्यान प्रकरण अंगलट येत असल्याचे दिसताच जिवन चौधरी व हितेश कोल्हे हे दोघे कंपनीतून निघून गेले.
या घटनेची माहिती भुषण कोळी यांनी सिक्युरिटी अधिकारी महेंद्र माळी व प्लांट एचआर अजय कावडे यांच्या निदर्शनास आणून दिली. या घटनेची कंपनीतून माहिती मिळाल्यानंतर पोलिस निरीक्षक प्रताप शिकारे यांनी सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, गफ्फार तडवी, हेमंत पाटील, सचिन पाटील, सतीश गर्जे, हेमंत कळसकर, चंद्रकांत पाटील आदींना घटनास्थळी रवाना केले. या घटनेप्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशनला जिवन चौधरी (स्टोअर सुपरवायझर), हितेश कोल्हे (वर्कर) व दिपक यशवंत चौधरी (ड्रायव्हर) या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. चालक दिपक चौधरी यास त्याच्या छोटा हत्ती या वाहन व मुद्देमालासह ताब्यात घेत अटक करण्यात आली. इतर दोघांचा शोध सुरु आहे. अटकेतील चालक दिपक चौधरी यास न्या. ए.एस. शेख यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले असता एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. सरकारतर्फे अॅड. प्रिया मेढे यांनी न्यायालयीन कामकाज पाहिले.