प्रवाशाची लुट करणारा रिक्षाचालक अटकेत

जळगाव : रिक्षातील प्रवाशांच्या ताब्यातील रक्कम जबरीने काढून घेण्याच्या विविध घटना उघडकीस आल्या आहेत. काही घटनांमधे रिक्षा चालकाचे लुटारु साथीदार अगोदरच प्रवाशांच्या रुपात रिक्षात बसून नव्याने दाखल झालेल्या प्रवाशाची वाटेत लुटमार करत असल्याचे निष्पन्न झाले आहे. काही घटनांमधे एकटा रिक्षा चालकच प्रवाशाला दमदाटी करुन त्याच्याकडील पैसे हिसकावण्याचे प्रकार करत असतो. अशा घटनांमुळे प्रवासी वर्गात रिक्षा चालकांबद्दल साशंकता निर्माण झाली आहे. काही दिवसांपुर्वी एका रिक्षा चालकाने प्रवाशाच्या ताब्यातील सात हजार रुपये हिसकावल्याची घटना घडली. या घटनेतील रिक्षा चालकाला एमआयडीसी पोलिसांच्या पथकाने ताब्यात घेत अटक केली आहे.

संजय नेहरु शिसोदीया हा तरुण मुळचा बडवाणी (मध्यप्रदेश) येथील रहिवासी आहे. तो एमआयडीसी  येथील एका कंपनीत कामाला आहे. मुलीची तब्येत बघण्यासाठी व पत्नीची भेट घेण्यासाठी तो 19 जून रोजी गावी जाण्यास निघाला. काशिनाथ लॉज चौकातून तो एकटाच बस स्थानकावर जाण्यासाठी एकटाच रिक्षात बसला. त्याला सोडण्यासाठी त्याचा भाऊ मंजु, चुलत भाऊ भिका असे आले होते. रिक्षाने बस स्थानकावर जात असतांना वाटेत  रिक्षा चालकाने रिक्षा उभी केली. दमदाटी करत त्या रिक्षा चालकाने संजय शिसोदीया याच्या खिशातील सात हजार रुपये जबरीने काढून घेत खाली उतरवून दिले. संजय शिसोदीया यास गावी जाणे गरजेचे होते. त्यामुळे त्याने वाचलेल्या थोड्या फार रकमेच्या बळावर गाव गाठले. प्रवासादरम्यान त्याने घडलेला प्रकार भाऊ मंजू यास कथन केला. त्याचा भाऊ मंजू याने रिक्षाचा क्रमांक टिपलेला होता. गावाहून परत आल्यावर संजय याने भाऊ मंजू याच्यासह एमआयडीसी पोलिस स्टेशन गाठत फिर्याद दाखल केली.

एमएच 19 सीडब्ल्यु 1676 या रिक्षा क्रमांकाच्या आधारे पोलिस निरीक्षक प्रताप शिकारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकाने रिक्षा चालक शाहरुख पटेल याला सुप्रिम कॉलनी परिसरातून ताब्यात घेतले. सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, किशोर पाटील, मुकेश पाटील, इमरान सैय्यद, चेतन सोनवणे, मुदस्सर काझी यांनी या पथकात सहभाग घेतला. अटकेतील शाहरुख पटेल यास न्यायालयात हजर करण्यात आले. न्या. ए.एस.शेख यांच्या न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. सरकारतर्फे अ‍ॅड. प्रिया मेढे यांनी न्यायालयीन कामकाज पाहिले. अटकेतील शाहरुख पटेल याने गुन्ह्यात वापरलेली रिक्षा तपासकामी ताब्यात घेण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विशाल सोनवणे व त्यांचे सहकारी संदीप पाटील करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here