जळगाव महानगर पालिकेत कचरा संकलनाच्या ठेक्यातून करोडोचा मलिदा ओढण्यासाठी नगरसेवकांच्या गटागटात साठमारी सुरु झाली आहे. साफसफाईचा सध्याचा ठेका सव्वा कोटीच्या भ्रष्टाचाराने गाजतोय. खरच तेवढा भ्रष्टाचार झाला किंवा नाही? केला असल्यास कुणी किती लाख लाटले असतील? अशा एक ना अनेक प्रश्नांचे मोहोळ उठले आहे.
याची वादग्रस्त ठिणगी मनपा विरोधी पक्षनेते सुनिल महाजन यांनी केलेल्या आरोपातून पडली. या साफसफाईच्या ठेक्यात सव्वा कोटीचा भ्रष्टाचार झाला असा सरळसरळ हल्ला सुनिल महाजन यांनी एका पत्रकार परिषदेतून जाहिरपणे केला. त्यामुळे वादाला तोंड फुटले आहे.
जळगाव महापालिका सत्ताधा-यांनी सहा महिन्यापासून “वॉटरग्रेस” कंपनीचे काम थांबवून एस.के.कॉन्ट्रॅक्टर यांना हे काम दिले आहे. यासाठी मनपाने 2 कोटी 40 लाख रुपये दिले आहेत. कागदपत्रांची तपासणी न करता दिलेल्या ठेक्यात सत्ताधा-यांचा सहभाग दिसतो असे सुनिल महाजन यांचे म्हणणे आहे.
आता भानगडीच्या मुळाकडे गेल्यास पुर्वीच्या वॉटरग्रेस कंपनीचा ठेका मंजूर करणारे तेव्हाचे पदाधिकारी ही पार्श्वभूमी लक्षात घ्यावी लागेल. जळगाव मनपात गेल्या अनेक वर्षापासून माजी मंत्री आमदार सुरेशदादा जैन यांच्या गटाची सत्ता होती. घरकुल प्रकरणानंतर त्यांच्या गटाची ताकद घटली. गेल्या मनपा निवडणूकीत त्यांच्या गटासह भाजपातीलच प्रतिस्पर्धी गटाची देखील गच्छंती करण्यात आली.
मनपात 57 जागा जिंकून भाजपाने सत्ता काबीज केली. त्याचे शिल्पकार अर्थातच माजी मंत्री गिरीषभाऊ महाजन ठरले. सतेच्या वाटपात आमदार सुरेश भोळे यांच्या पत्नी सीमाताई भोळे यांना महापौर पदाची सुत्रे देण्यात आली. त्यानंतर मनपाने वॉटर ग्रेसला साफसफाईचा ठेका दिल्याचे प्रकरण पुढील काळात चांगलेच गाजले. विशेष म्हणजे याच वॉटरग्रेसने धुळ्यात तेव्हा 17 कोटी रुपयांचा साफसफाईचा ठेका मिळवला होता.
मध्यंतरीच्या काळात मनपा महापौरपदाची धुरा सौ.भारतीताई सोनवणे यांच्याकडे आली. वॉटरग्रेसचा ठेका देण्याच्या प्रकरणात कुण्या बड्या नेत्याने 1 कोटीचे कमिशन हाणल्याचा जोरदार आरोपही झाला. त्यामुळे वॉटरग्रेसचे समर्थक – विरोधक असे दोन गट मनपात बघायला मिळाले. याच वेळी बडे नेते पदाधिकारी “विश्वासात घेत नाही” अशी टीकेची झोड उठली. परंतू ते 1 कोटीचे कमिशन घेणारा कोण? त्या नावाचा जाहीर उल्लेख कुणी केला नाही.
जळगाव मनपा क्षेत्रातील प्रचंड कचरा व त्याची साफसफाई करण्याच्या ठेकेदारीत म्हणजे कच-यातून करोडो रुपयांची कमाई होत असल्याचा साक्षात्कार नगरसेवक मंडळींना झाला. त्यामुळे कथित “टक्कीवारीचा मलीदा” कोण एकटाच ढापतो त्यावर लक्ष ठेवण्यासह या मुद्द्यावर जळगावसह धुळे येथे वादंग माजू लागले आहे.
कचरा उचलून शहर स्वच्छ करणारे ठेकेदार मनपाच्याच घंटा गाड्या वापरुन बांधकामाचे वेस्ट मटेरियल, रेती, खडी, डबर, अशा वस्तू उचलून वजन वाढवतात असे आरोप झाले. शिवाय अशा ठेक्यांमधे कुणाकुणाची टक्केवारी किंवा भागीदारी असू शकते या वादाला तोंड फुटले.
सहा महिन्यापुर्वी वॉटरग्रेसचा ठेका रद्द केल्यानंतर हे काम एस.के. कॉन्ट्रॅक्टरला दिले. सुनिल महाजन यांच्या म्हणण्यानुसार चार महिन्यात ठेकेदाराला 2 कोटी 40 लाख रुपयांचे बिल देण्यात आले. त्यात 1 कोटी 20 लाख रुपयांचा भ्रष्टाचार निदर्शनास आला. तात्पुरत्या स्वरुपाच्या या ठेक्यात भाजपाच्या काही पदाधिकरी सत्ताधिकारी नगरसेवकांची भागीदारी असल्याचे म्हटले जाते. वॉटरग्रेसच्या ठेक्यात नगरसेवकांना काही मिळाले नसल्याने असंतोष होता.
3 लाखावरील कामासाठी टेंडर आवश्यक असते. परंतू टेंडर न काढताच एस.के.कॉन्ट्रॅक्टरला काम देण्यात आले. प्रशासनाची मंजुरी नसतांना सफाईसाठी 400 आणि वाहनचालक 250 असे 650 कामगार पुरवण्याचा मक्ता दिला. ठेकेदाराने 95 टक्के बोगस हजेरी दाखवली. वॉटरग्रेस कंपनीला 2 कोटीची सॉल्व्हंसी होती. परंतू सध्याच्या कंपनीची बॅंक गॅरंटी देखील नाही.
शिवाय 650 कामगार पुरवण्याचा परवाना तरी आहे का? असे अनेक प्रश्न महाजन यांनी उपस्थित केले आहेत. वॉटरग्रेसला हाकलून देण्यासाठी आघाडीवर असणारे काही नेते नरमले तरी कसे? असेही प्रश्न उपस्थित होत आहे. वॉटरग्रेसकडून काही मिळाले नाही म्हणणा-यांनादेखील सध्याच्या ठेकेदाराकडून लाभ दिसत नसल्याचे म्हटले जात आहे.
त्यामुळे याचीही हकालपट्टी करुन पुन्हा वॉटरग्रेस किंवा दुस-या कुणा टक्केवारीचा वाटा देणा-यांच्या प्रतिक्षेत आहे काय? असेही प्रश्न उपस्थित होत आहेत. भाजपाच्या सुत्रधारांनी विश्वासात न घेतल्यास मनपातील भाजपाच्या 57 पैकी 32 नगरसेवकांचा वेगळा गट निर्माण करण्याच्या इशारा देखील देण्यात आला आहे. त्यामुळे या बंडोबांना चॉकलेट किंवा रसगुल्ले देवून त्यांचे मन वळवले जाते की भाजपात फुट पडते याची प्रतिक्षा राहणार आहे.
सुभाष वाघ (पत्रकार)
8805667750