धुळे : शिरपुर जिल्हा धुळे येथे 9 जून रोजी मुंबईच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाने धाड टाकली होती. या धाडीत कोट्यावधी रुपयांचा बनावट मद्यसाठा सापडला होता. तो सर्व मद्यसाठा जप्त करण्यात आला होता. या कारवाईची गांभीर्याने दखल घेत वरिष्ठांनी दखल घेत धुळे येथील राज्य उत्पादन शुल्क विभागातील अधिकारी व कर्मचारी अशा पाच जणांना निलंबित केले आहे. या निलंबन कारवाईमुळे उत्पादन शुल्क विभागात खळबळ माजली आहे.
शिरपूर तालुक्यातील अजंदे शिवारातील पद्मावती जिनींगमधे बनावट मद्यनिर्मीतीचा कारखाना खुलेआम सुरु होता. मुंबई येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने या जागी धाड घातली होती. या कारवाईत सुमारे एक कोटी रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला होता. सदर कारखाना उध्वस्त करण्यात आला.
धुळे जिल्ह्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात बनावट मद्यनिर्मीती सुरु असतांना स्थानिक अधिका-यांना हा प्र्कार माहीत नाही काय असा सवाल या धाडीच्या निमीत्ताने निर्माण झाला होता. या कारवाईची दखल घेत राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वरिष्ठ अधिका-यांनी धुळे येथील राज्य उत्पादन शुल्क विभागातील निरीक्षक, दुय्यम निरीक्षक, जवान अशा एकुण पाच जणांना निलंबित केले आहे.