स्पेक्ट्रम इलेक्ट्रीक कंपनीतील चोरीप्रकरणी दोघे अटकेत

जळगाव : एमआयडीसीतील स्पेक्ट्रम इलेक्टीक कंपनीतील दोघांनी छोटा हत्ती या वाहन चालकाच्या मदतीने तांब्याच्या पट्टया व पितळी कॉईलच्या चोरीचा प्रयत्न 20 जून रोजी केला होता. मात्र ड्युटीवरील सिक्युरिटीच्या सतर्कतेत्ने चोरीचा हा प्रयत्न उघड झाला होता. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशनला रितसर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

घटनेच्या दिवशी चालक दिपक यशवंत चौधरी यास त्याच्या ताब्यातील व गुन्ह्यात वापरलेले वाहन मुद्देमालासह पोलिसांनी ताब्यात घेत अटक केली होती.तो सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. घटनेच्या दिवसापासून जिवन चौधरी (सुपरवायझर) व हितेश कोल्हे (कामगार) हे दोघे फरार झाले होते. पोलिस त्यांच्या मागावर होते. 2 लाख 52 हजाराचा मुद्देमाल तपासकामी हस्तगत करण्यात आला आहे. दोघे फरार आरोपी गुन्हा केल्यापासून सोबतीने फिरत होते. ते जळगाव शहरात आल्याची गुप्त माहिती पोलिस निरीक्षक प्रताप शिकारे यांना समजली होती. सहायक फौजदार अतुल वंजारी, गफ्फार तडवी, सचिन पाटील, मुकेश पाटील, किशोर पाटील यांनी दोघांना शिताफीने ताब्यात घेत अटक केली. त्यांना आज न्यायमूर्ती ए. एस. शेख यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना दोन दिवस पोलीस कोठडी सुनावली. सरकारतर्फे अ‍ॅड. प्रिया मेढे यांनी कामकाज पाहिले. दोघा आरोपींनी यापूर्वी देखील कंपनीत चोरी केल्याचा संशय आहे. ते बऱ्याच वर्षापासून स्टोअर विभागात कामकाज करत होते. या कंपनीमध्ये मोठ्या प्रमाणात तांबे व पितळेची मागणी असल्यामुळे त्यांनी त्याच वस्तूंची चोरी केली आहे. गुन्हा घडल्यानंतर कंपनी व्यवस्थापनाने ऑडीट करुन घेतले असता त्यात 2 लाख 36 हजार रुपयांचा मुद्देमाल कमी आढळून आला. हा फरकाचा माल या त्रिकुटाने चोरला अगर विकला यादृष्टीने तपास सुरु आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here