जळगाव : भवानी फाटा नेरी ते औरंगाबाद रोड बायपास या सुमारे विस किलोमिटर अंतराच्या रस्ता कामासाठी अवैध वाळूचा वापर होत असल्याबाबतची तक्रार सामाजिक कार्यकर्ता तथा माहिती अधिकार कार्यकर्ता दीपककुमार गुप्ता यांनी ई मेलच्या माध्यमातून महसुल विभागाकडे केली होती.
दीपककुमार गुप्ता यांच्या तक्रारीनुसार सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांना जिल्हा खनिकर्म विभागाच्या मदतीने या कामावरील वाळूसाठ्याचे परिमाण मोजण्यासह अचुक अहवाल सादर करण्याची सुचना अप्पर जिल्हाधिकारी प्रविण महाजन यांनी दिली होती. 3 जुलै रोजी या कामाची मोजणी केली असता 1005 ब्रास वाळूचा साठा आढळून आला. महसुल व बांधकाम विभागाच्या अधिकारी वर्गाच्या मदतीने दीपककुमार गुप्ता यांच्यासमक्ष ठेकेदार कंपनीच्या सुनसगाव येथील साईटवर 1005 ब्रास वाळूसाठ्याचा पंचनामा करण्यात आला. याप्रकरणी ठेकेदार कंपनीने प्रशासनाला खुलासा सादर केला. त्या खुलाश्यानुसार कंपनीने 184 ब्रास वाळू शेगांव जि.बुलढाणा येथून उचल केल्याचे सांगण्यात आले.
जिल्हा खनिकर्म अधिकारी बुलढाणा यांच्याकडे या वाळूबाबत पडताळणी केली असता ही वाळूची उचल शेगाव ते बारामती व आळंदी येथे केल्याचे आढळून आले. जामनेर तालुक्यातील या ठेकेदार कंपनीची साईट असलेल्या सुनसगांव येथील कोणतीही पावती आढळून आली नाही. त्यामुळे सदर 184 ब्रास वाळूची वाहतुक अवैध उत्खननाच्या माध्यमातून झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे तहसीलदार जामनेर जमिन महसूल अधिनियम 1966 – कलम 48 (7) नुसार दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
सदर ठेकेदार कंपनीस 184 ब्रास वाळूचे प्रति ब्रास बाजारमुल्य, रॉयल्टीची रक्कम तसेच पाचपट दंडात्मक रक्कम अशी एकुण 38 लाख 4 हजार 16 रुपये शासकीय तिजोरीत जमा करण्याचे आदेश तहसीलदार जामनेर अरुण शेवाळे यांनी स्पायरोधारा जे. व्ही. कंस्ट्रक्शन लि.सुनसगाव जिल्हा जळगाव या ठेकेदार कंपनीस दिले आहेत. सामाजिक कार्यकर्ता दीपककुमार गुप्ता यांनी याप्रकरणी एक वर्षापासून पाठपुरावा सुरु ठेवला होता.